नमस्कार

नमस्कार

Pages

Saturday 21 May 2011

कोर्टाची पायरी...भाग ६

भाग १
भाग २
भाग ३
भाग ४
भाग ५

अख्खं २००३ चं वर्ष...
काय नाही झालं ह्या वर्षात...

८ ऑक्टोबर २००३
रत्नागिरी
सकाळी साडे अकरा वाजता, २४ मार्चला दिलेली पाटलांच्या वारसांची नावे हायकोर्टात लावण्यासाठी, शर्मा बाईच्या पावसकरांनी, ऑक्टोबरच्या २४ तारखेला रत्नागिरी कोर्टात अर्ज दाखल केला. तब्बल सहा महिने त्या कागदावर पावसकर विश्रांती घेत होते. भुर्क्यांनी सदर मुदतवाढ दिली जाऊ नये ह्यासाठीचा अर्ज कोर्टाला सादर केला. दुपारचे भोजन करून झाल्यावर जज्ज भोसले ह्यांच्यापुढे सुनावणी. १८ ऑक्टोबर ही अलीकडची तारीख दिली गेली.

१८ ऑक्टोबर
रत्नागिरी
दुपारी एक वाजता कोर्टात खटला चालू. भुर्के गैरहजर. मी जज्ज समोरच. आत्तापर्यंत ह्या कारभाराची सवय झाली होती. मार्च ते ऑक्टोबर. जसा, आठ महिन्यांचा एक शॉर्ट कोर्स. जज्जनी माझ्याकडे विचारणा केली. "तुमचे वकील कुठे आहेत."
उत्तर द्यावयास फलटणकर सरसावले. सामान्य माणूस बोलायला उठला तर जज्जना त्याचे म्हणणे ऐकणे भाग असते. हा माझ्यासाठीचा एक नवीन धडा.
"आम्ही जागेचा कब्जा मिळवण्यासाठी दरखास्त केली आहे. समोरच्या पार्टीने अजूनही त्यांचे म्हणणे मांडलेले नाही. हाय कोर्टात त्यांनी अपील केलेले नाही. तसेच त्यांचे रिट पिटीशन देखील हाय कोर्टाने दाखल करून घेतलेले नाही. वारसांची नावे त्यांना कळवून देखील ६ महिन्यांत त्यांनी खटल्याला ती नावे जोडलेली नाहीत. म्हणून आता कोर्टाने त्यांना अधिक वेळ देऊ नये." भुर्के नव्हते...बरेच झाले. एव्हढे सगळे ते बोलले असते की नाही तेच जाणे.
"ठीक आहे. शेवटची संधी म्हणून त्यांना ३१ ऑक्टोबर ही तारीख मी देतो. आणि त्यादिवशी ऑर्डर देऊ."

पहाटे चार वाजता दादर सोडावे. सकाळी ११ वाजता रत्नागिरी कोर्टासमोर गाडी लावावी. कोर्टात पुढील तारीख घ्यावी व तडक मुंबईच्या रस्त्याला लागावे...एक मात्र खात्री करावी...कोर्ट पुढची तारीख जर देणारच आहे तर ती सर्वात नजीकची मिळवावी. आता चार/सहा महिन्यांनंतरची तारीख मला कबूल नव्हती. जज्ज समोर उभे रहावे...आणि देणारच आहात तर सर्वात जवळची तारीख मागावी.

३१ ऑक्टोबर
रत्नागिरी
११ वाजता कोर्टात हजर. १२ वाजता शर्मा बाईचे म्हणणे फाईल केले गेले. आज भुर्के हजर. बाईचे म्हणणे वाचून भुर्के यांनी बाई ताबा देण्याबाबात व केस चालवण्याबाबत मुद्दाम चालढकल करत असल्याने आम्हांला त्वरित ताबा देण्यात यावा असे कोर्टाला सांगितले. त्यावर ? त्यावर पुढील तारीख. शर्मा बाईच्या वतीने वादविवाद करण्यासाठी पुढील तारीख. मग आम्हीं कुठली तारीख मान्य करावी ? लगेचची ! दूर जा कशाला ? आम्हांला उद्याचीच तारीख द्या. आम्ही मुंबईहून येतो. परत जाऊन येणे आता शक्य नाही. तेव्हा कोर्टाने उद्याची तारीख द्यावी. कोर्टाने तारीख दिली १ नोव्हेंबर.

१ नोव्हेंबर
रत्नागिरी
तो शनिवार होता. ११ वाजता कोर्टात हजर. १ वाजता बाईच्या वकिलाचा, पावसकारांचा १ आठवड्याच्या रजेचा अर्ज कोर्टाकडे आला. थंडीतापाने ते अचानक आजारी पडले होते. आमचे भुर्के अचानक मुंबईला गेलेले होते. पुन्हा फलटणकर. "जर समोरच्या पार्टीचे वकील आजारी असल्यास त्यांनी प्रत्यक्ष हजर न रहाता लेखी आर्गुमेंट जमा करावे."
पुढील तारीख. सोमवार दिनांक ३ नोव्हेंबर. "जर त्या दिवशी त्यांनी आर्गुमेंट न दिल्यास कोर्टाने ऑर्डर द्यावी." आता दोर खेचावयाचेच होते. घट्ट धरावयाचे होते. कुठेही थोडीही ढील न देता. सहनशक्तिचा कडेलोट.
कोर्टातून तडक मुंबईचा रस्ता. पहाटे कधीतरी घरातील बिछान्याला पाठ लागली.

सोमवार
दिनांक ३ नोव्हेंबर.
पहाटे ४ वाजता रत्नागिरीचा रस्ता. ११ वाजता कोर्ट. दुपारचे २.३०. पावसकारांची पुढील चाल.
आता हाय कोर्टात मॅटर रिफर केले गेल्यामुळे व तिथे ७ नोव्हेंबर तारीख असल्याने, खालील कोर्टाने १४ नोव्हेंबरपर्यंत खटला प्रलंबित केला.

बॅडमिन्टनचे जसे शटल. इथून तिथे. पावसकारांनी ही अशीच वीस वर्ष खाल्ली होती. बाबांच्या आयुष्यातील. काय माझे बाबा शटल होते ? ह्या शर्मा बाईला मीच पुरून उरेन. रत्नागिरी ते मुंबई गाडीचा रस्ता एव्हांना तोंडपाठ झाला होता. उन्हाळ्यातील पिवळे व पावसाळ्यातील हिरवे कोकण. येता जाता गाडीबाहेर एकटक बघत बसे. मी डोक्यात राख घालून घेऊन काहीच होणार नव्हते. काय करू शकत होते मी...? एकच...मी एकच करू शकत होते. दर वेळी कोर्टात हजर रहाणे...जवळची तारीख घेणे. तरच मी दिनदर्शिकेला चाकं लावू शकत होते. इतकी वर्षे पावसकर कासवावर स्वार झाले होते...नाही त्यांना सश्यावर बसवले तर नावाची अनघा नाही मी ! नाही शर्मा बाईला नाचवली तर पाटलांची अनघा नाही मी !

आणि १५ जानेवारी २००४.
तब्बल एक वर्षानंतर, मुंबई हाय कोर्टात रिट पिटीशनची सुनावणी होऊन खटला पुन्हा खालील कोर्टात पाठवला गेला.

हाय कोर्टाच्या निकालावर खाली भिडे खुष होते. "आता भाडे बाईने नीट न भरल्याच्या मुद्द्यावर देखील दावा करता येईल. बाईची दुसरी जागा आहे हा मुद्दा आपल्या बाजूचा आहे. तो आता योग्य प्रकारे मांडू. पुढली तारीख ७ एप्रिल आहे. ५ ला मला फोन करा तुम्हीं."

पुढे एप्रिल, मे, जून, जुलै ?...तारखा घेतल्या.

१० ऑगस्ट.
रत्नागिरी. दुपारी दोन वाजता खटला चालला. भिड्यांचे मुद्दे हे असे- मध्येमध्ये न भरलेले भाडे हे नियमित भरलेले भाडे होऊ शकत नाही. त्यांनी उदाहरणादाखल सुप्रीम कोर्टाचे दाखले बरोबर आणले होते. जज्ज, "पुढील तारीख १७ ऑगस्ट. त्या दिवशी निकाल सांगितला जाईल."

मग काय झाले १७ ऑगस्टला ? आम्हीं दादरहून ४.३० ला निघालो व रत्नागिरी कोर्टात ११.३० ला पोचलो. वेळ सवयीची होती. रस्ता नेमिचा होता. जज्ज ? ३ दिवस सुट्टीवर गेले होते. मग ? पुढील तारीख २१ ऑगस्ट. मग २१ तारखेला पुढील तारीख. २५ ऑगस्ट. मग २५ ऑगस्टला पुढील तारीख. २७ ऑगस्ट.

आणि पुन्हा एकदा १ सप्टेंबरला रत्नागिरी कोर्टात निकाल लागला.

आता पर्यायी जागेच्या मुद्द्यावर बाबा जिंकले.
२००२ साली बाबा दोन मुद्द्यावर जिंकले होते. व बाकी मुद्दे रत्नागिरी कोर्टाने वाऱ्यावर सोडून दिले होते. मग जानेवारी २००४ साली हाय कोर्टाने त्या वाऱ्यावरच्या मुद्द्यांचा देखील विचार करण्याचे आदेश दिले. आणि १ सप्टेंबर २००४ रोजी रत्नागिरी कोर्टाने न्यायाची बाजू उचलून धरली.

बाबा पुन्हा जिंकले.

तारखा लवकर पाडून घेतल्या.
किमान ३ ते ४ वर्षे खटला अलीकडे खेचला.

पावसकरांना सश्यावर बसवले.
पाठी शर्मा बाई...
धापा टाकत !

मागला अनुभव.
पुन्हा हाय कोर्टात कॅव्हिएट दाखल करणे गरजेचे.

7 comments:

रोहन... said...

तारीख पे तारीख...
तारीख पे तारीख...
तारीख पे तारीख...

तुझा सनी देओल झाला होता असे दिसतंय... खरच. इथे वाचून प्रचंड मनस्ताप होतोय... तू तर हे सर्व भोगले आहेस... :(

पुन्हा हायकोर्टात जायची पाळी नाही आली ना?? खटला संपला ना? आता ते घर तुमच्या ताब्यात आहे ना? कोण असते तिथे? काय केलंय त्याचे?

Anagha said...

मला देखील तेव्हा सनी देओलच्या त्या डायलॉगचीच आठवण येत असे रोहणा.

आज शेवटचा भाग टाकलाय बघ... :)

Pankaj - भटकंती Unlimited said...

हे अतिबेष्ट झाले.

"बाबा पुन्हा जिंकले.
तारखा लवकर पाडून घेतल्या.
किमान ३ ते ४ वर्षे खटला अलीकडे खेचला.
पावसकरांना सश्यावर बसवले.
पाठी शर्मा बाई...
धापा टाकत !"

थ्री चियर्स...
on a lighter note मुंबई-रत्नागिरी रस्त्यावर खायला कुठे चांगले मिळते? ;-)

Anagha said...

आईशप्पत ! पंकज, तू असं विचारलंस तर मी एकदम विचारातच पडले ! खरंच ! रत्नागिरी रस्त्यावर कुठे मिळतं मस्त जेवण ?? :(

Shriraj said...

पंकज, चिपळूणला आहेत न हॉटेल्स.... ते हॉटेल गॅलक्सी, हॉटेल शुभ अभिषेक, हॉटेल मधुरा ...रोड-ला लागुनच आहेत

Anagha said...

हा श्रीराज ! अभिषेक ! मी येताजाता बऱ्याचदा जेवलेले तिथे ! आठवेचना एकदम ! :)

हेरंब said...

माझी या भागावरची प्रतिक्रिया दिसत नाहीये..

काय दिली होती ते आता मलाही आठवत नाहीये.. जाउदे :)