नमस्कार

नमस्कार

Pages

Sunday 22 May 2011

कोर्टाची पायरी...भाग ७

भाग १
भाग २
भाग ३
भाग ४
भाग ५
भाग ६

आज ३० सप्टेंबर २००४
मुंबई
खालील कोर्टाने निकाल आपल्या बाजूने दिलेला आहे. परंतु, शर्मा बाईचे कर्तृत्व आपण ओळखून असल्याने आज आपण हाय कोर्टात आपले कॅव्हिएट पुन्हा एकदा नव्याने दाखल केले आहे. लिमयांचा पूर्वीचा अनुभव काही फारसा उत्तेजनार्थक नाही. त्यांना ऐन वेळी घाम फुटतो व बोलती बंद होते हे आपण आपल्या डोळ्यांनी बघितले आहे. व पुन्हा पायावर धोंडा पाडून घेण्याची आपली हौस तर बिलकुल नाही. हौस नाही व तेव्हढा आपल्याकडे वेळही नाही. मग आता आपला खटला मुंबईत कोण चालवणार ? फलटणकरांचे बालपणाचे सवंगडी. ठाण्यातील हाय कोर्टातील प्रख्यात वकील राम आपटे. आज त्यांनीच आपले 'कॅव्हिएट' दाखल केलेले आहे. "खालील कोर्टाने शर्मा बाईचे अपील फेटाळलेले आहे. त्यावर पुढे अपील करण्यासाठी त्या कोर्टाने मुदत दिलेली नाही. त्यामुळे आता आपण २००३ मधला जागेचा ताबा मिळवण्याचा अर्ज पुनरजीवित (रिव्हाईव्ह) करावा. असे केल्याने त्याविरुद्ध भाडेकरूला हाय कोर्टात 'रिट पिटीशन' दाखल करावे लागेल. मात्र ते करण्यास कुठलेही कालावधीचे बंधन नाही. त्यामुळे कॅव्हिएटची मुदत चालू असतानाच ताबा मिळवण्याचा अर्ज तातडीने पुढे चालवावा. हे तुम्हीं तातडीने भिड्यांना कळवा."

३० ऑक्टोबर २००४
रत्नागिरी
पावसकर गैरहजर. अडीच वाजता ऑर्डर तयार करतो असे जज्ज म्हणाले. ४.३० वाजता जज्जनी सांगितले,"मूळ १९८५ च्या दाव्याच्या नकलेची प्रत व डिक्रीची प्रत हजर केल्याशिवाय कोर्ट तुम्हांला ताब्याची ऑर्डर देऊ शकत नाही. कारण आताचा अर्ज हा अपील अर्जावर असल्याने व अपील पूर्णत: फेटाळले गेल्याने, २००३ च्या अर्जावर दुरुस्ती करून मूळ दाव्याच्या निकालावर ऑर्डर देता येईल."...सदर निकाल प्रत आपल्या हाती आहे परंतु डिक्रीची नक्कल नाही. भिड्यांच्या नव्या सहकारी वकील बाई पोतनीस. काळसर मध्यम उंचीच्या बाई. एखादी स्त्री अशी काही जबाबदारीची कामे करताना दिसली की कौतुक वाटते. हा आमच्या जागेचा ताबा आम्हांला लवकर मिळवायचा आहे...व हा खटला अजून कुरवाळत बसण्याची काडीचीही इच्छा नाही हे सर्वप्रथम पोतनीस बाईंच्या कानावर घातले. आता त्यांना तातडीने ती डिक्रीची (विनंती अर्ज) नक्कल मिळवणे आवश्यक होते. २ नोव्हेंबरला प्रतिज्ञा पत्र, दुरुस्ती अर्ज व निकालाची प्रत कोर्टामध्ये समक्ष सादर करण्यास आम्हांला कोर्टाने सांगितले. पुढील तारीख २ नोव्हेंबर.


२ नोव्हेंबर २००४
रत्नागिरी
पहाटे ४ ला मुंबईहून निघून ११.३० वाजता रत्नागिरी कोर्टात हजर. शर्मा बाईने आजच्या घटकेपर्यंत कोर्टाकडे जमा केलेली भाड्याची रक्कम व घराचा ताबा ह्याविषयीचा अर्ज कोर्टात दाखल केला. पुढील तारीख...६ नोव्हेंबर २००४. सदर दुरुस्ती मंजूर होण्याविषयी त्या दिवशी विचार होईल असे कोर्टाने सांगितले.

६ नोव्हेंबर २००४
रत्नागिरी
पहाटे ४.३० ला मुंबईहून निघून १२ वाजता रत्नागिरी कोर्टात हजर.
४ वाजता कोर्टात आमचा नंबर लागला. कोर्टाने आम्ही सांगितलेली दुरुस्ती मंजूर केली व शर्मा बाईच्या उत्तरासाठी पुढील तारीख पडली. १६ नोव्हेंबर २००४. "त्यादिवशी तिचे उत्तर न आल्यास आपल्याला ताबा देण्याबाबत ऑर्डर मिळेल काय ?" भोळसटासारखे प्रश्र्न विचारायची माझी खोड अजूनही गेलेली नव्हती. फलटणकर हसून दुर्लक्ष करण्यास आता शिकले होते.

१६ नोव्हेंबर २००४
रत्नागिरी
पुढली तारीख २५ नोव्हेंबर.

२५ नोव्हेंबर २००४
रत्नागिरी
आज ताबा देण्याची ऑर्डर झाली.
व त्याप्रमाणे लेखी ऑर्डर मिळून त्याप्रमाणे 'बेलीफांना' (कायद्याचा व्यवस्थापक) आदेश होऊन ताबा देण्याबाबत देखील आदेश झाला. या सर्व गोष्टींची माहिती २४ डिसेंबरपर्यंत कोर्टास द्यावयाची होती.

१ डिसेंबर २००४
रत्नागिरी
दुपारी बारा वाजता कोर्टात हजर. घराचा ताबा घेण्याची लेखी ऑर्डर हातात मिळाली. ती बेलीफाला दिली. एक वाजता बेलीफ श्री. गुरव ह्यांना घेऊन घरी गेलो. तिथे ? तिथे शर्मा बाई गायब. घराला कुलूप. शेजारी चौकशी केली तर कळले तर बाई ३ दिवसांपूर्वीच गावी गेली आहे. बेलीफाने ही नोंद कोर्टाकडे दुपारी २.३० वाजता दाखल केली. आम्ही त्यानंतर कोर्टाला अर्ज केला, कुलूप तोडून व सामान बाहेर काढून आम्हांला घराचा खुला ताबा देण्यात यावा. कोर्टाने ५ वाजता तोंडी आदेश दिला...तोडून सामान ताब्यात घेऊन ताबा दिला जावा. मात्र लेखी आदेशाची प्रत ही दुसऱ्या दिवशी सकाळी ११ वाजता मिळेल असे सांगण्यात आले. त्याप्रमाणे बेलीफाला सांगितले. त्याने लेखी आदेश मिळाल्यास ताबा मिळवून देऊ असे आश्वासन आम्हांला दिले.

२ डिसेंबर २००४
लेखी आदेश मिळेस्तोवर संध्याकाळचे ४ वाजले. परंतु, आता सामानाची मोजदाद करून सूर्यास्ताच्या आधी प्रक्रिया पूर्ण होणे शक्य नाही म्हणून ताबा ४ तारखेला देऊ असे सांगण्यात आले.

४ डिसेंबर २००४
ताबा घेण्यासाठी कोर्टात पोचलो तेव्हा शर्मा बाईच्या वकिलाने, पावसकारांनी, हाय कोर्टात रिट पिटीशन दाखल केल्याने सदर प्रक्रियेस १५ दिवसांची स्थगिती मागितली. कोर्टाने मंजुरी दिली. १८ डिसेंबरपर्यंत स्थगिती.

१८ डिसेंबर २००४
चार वाजता मुंबई सोडून ११ वाजता रत्नागिरी कोर्ट. जज्ज साहेब रजेवर. पुढील तारीख ४ जानेवारी २००५. परंतु, एक गोष्ट आम्ही कशी दुर्लक्षित करणार ? 'स्टे' १८ तारखेपर्यंतच होता ! त्यापुढे नाही. कोर्टात पुन्हा विनंती अर्ज. दुसरे जज्ज शिंदे ह्यापुढे आमचा अर्ज सुनावणीस आला. पावसकारांच्या नजरेस ही गोष्ट आणून दिल्यावर त्यांचा सुनावणीस उभे रहाण्यास सपशेल नकार. दुपारी जज्ज शिंदे, "शर्मा बाईने हाय कोर्टाचा स्थगिती आदेश ४ जानेवारी पर्यंत न आणल्यास ताबा देण्याची प्रक्रिया सुरु करावी."

विषारी साप आता ठेचत आणलेला होता...त्याची जोरदार तडफड चालू होती...
समोर मी होते...
न्यायाची बाजू माझी होती.

२६ एप्रिल २००५
मुंबई हायकोर्ट
शर्मा बाईचे वकील शेट्ये ह्यांनी असा विवाद केला: खालील कोर्टाने संपूर्ण अपिलावर फेर सुनावणी घेतली हे चूक होते. कारण हायकोर्टाने फेरसुनावणी घ्यावी हे सांगताना संपूर्ण अपिलाची घ्यावी असा काही आदेश दिला नव्हता.
त्यावर न्या.रंजना देसाई यांनी म्हटले: तुमचे म्हणणे जरी मान्य केले तरी खालील कोर्टात तुमच्या वकिलांनी ही हरकत न घेता स्वतः संपूर्ण अपिलावर सुनावणी दिली असल्याने आता ती तुम्हांला मान्य नाही हा मुद्दा येथे गैरलागू होतो ! सबब तुमचे रिट पिटीशन आता फेटाळले जात आहे.

म्हणजेच शर्मा बाईचे हे हाय कोर्टात दाखल केलेले दुसरे रिट फेटाळले गेले. मात्र त्यांना घर खाली करण्यास २ महिन्याची मुदत दिली गेली. त्या मुदतीत घर खाली करून देऊ असे शपथपत्र घरातील प्रत्येक माणसाने, २ आठवड्यांत करून, हायकोर्टात दाखल करावे असा आदेश देखील हाय कोर्टाने दिला.

२७ जून २००५
रत्नागिरी
हाय कोर्टाचा हा आदेश आता खाली रत्नागिरी कोर्टात आलेला होता. समोर न्यायाधीशांच्या आदरणीय खुर्चीत बसलेले शिंदे ह्यांनी आदेशाची पाने वरखाली केली. समोर मी व फलटणकर हजर. "हा हाय कोर्टाचा आदेश इंग्रजीत आहे. तो काही मला कळत नाही. तुम्हीं सांगा पाहू मराठीत."
फलटणकर...त्यांचे कायद्याचे ज्ञान व शुद्ध मराठी. संपूर्ण आदेश त्यांनी शिंद्यांना समजावून सांगितला.
"छे छे ! नाही हो ! काहीच कळत नाहीये ! मला नीट वाचावे लागेल. व त्यासाठी मी तुम्हांला पुढील तारीख देतो."
तारीख ३ आठवड्यांनंतरची !

त्या दिवशी, परतीचा रस्ता मला तोडफोड करून उद्ध्वस्त करावासा वाटला...
"का केलं हे असं त्या न्यायाधीशांनी ?"
"काय माहित ? पावसकारांनी काय खेळ खेळला होता...कोण जाणे ?"
"आणि आपण का काही नाही करू शकलो ?"
फलटणकरांनी समोरून अंगावर येणाऱ्या ट्रकला रस्ता दिला व आमची गाडी अधिक वेगाने समोरील अंतहीन रस्त्यात दामटवली.

त्यानंतर...
जुलै २००५ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे, हायकोर्टाने शर्मा बाईला २६ सप्टेंबर २००५ पर्यंत मुदत वाढून दिली...

९ नोव्हेंबर २००५
रत्नागिरी
सकाळी १० वाजता कोर्टात हजर.
ऑर्डर ताब्यात घेऊन दुपारी ३ दिवस घरी पोचलो. बाईला अजून दोन दिवस हवे होते.
"अनघा, बाई अजून दोन दिवस मागतायत." अंगणाबाहेर मी उभी होते. फलटणकर तिचा निरोप मला सांगत होते.
"तिला सांगा, गुमान निघायला. नाहीतर मी आत शिरेन आणि हाताला धरून बाहेर काढेन तिला !" माझ्या अंगातील मावळी रक्त बऱ्याचदा मला उसळ्या मारताना जाणवतं.
बाईने घर रिकामं करायला सुरुवात केली. सूर्यास्त झाला.

१० नोव्हेंबर २००५
सकाळी ८.३० वाजता बेलीफांना सोबत घेतले व घरी पोचलो. त्यांनी त्यांची चार माणसे कामाला लावली. एकेक करून तिचे घरातील मोठे सामान बाहेर पडू लागले. शेजारपाजार जमला. गाजावाजा झाला. मी आमच्या गाडीपाशी उभी होते. हातात बाबांचा फोटो होता. रक्त उसळ्या मारत होतं. डोकं गरम झालं होतं. आम्ही म्हणे खरे साळुंके. गावची पाटीलकी आम्हांला शिवाजी महाराजांच्या काळात दिली गेली होती...आणि म्हणून आम्हीं पाटील. आज त्याची आठवण झाली.
जानेवारी २००३ ते नोव्हेंबर २००५. जवळजवळ ३ वर्षे. जशी संथ संथ गतीने रत्नागिरी कोर्टात वीस वर्षे तारखा घेतल्या त्याच गतीने हाय कोर्टात तारखा घ्याव्यात...म्हणजे आयुष्यभर राहून घ्यावं...हा बाईचा अंदाज असावा...हेच मनचे मांडे असावेत. तीन वर्षांत युद्ध आटोपले. कित्येकदा संताप झाला...अनेकदा धीर सुटला. एकूण गेला बाजार, चाळीस ते पन्नास तारखा घेतल्या. सहा महिन्यांत. लाखभर रुपये खर्च झाले. एकाच वेळी रत्नागिरी व मुंबईत युद्ध झालं. युद्धही असं, एकही शस्त्र माहित नसलेलं. पण प्रत्येक क्षणी मनात धगधगतं ठेवलेलं. आज मी गाडीपाशी उभी आहे आणि ती दिसते एकेक चीजवस्तू बाहेर काढताना. दुरून ती माझ्याकडे बघते त्यावेळी माझी नजर तिला आरपार करते. ती तरातरा तिच्या तिने बांधलेल्या घरात निघून जाते.
सूर्यास्त झाला. घर रिकामे झाले. हाताशी सुतार घेतले. पत्रे लावून पडवी बंद केली. रात्रीचे ११ वाजले होते. काळोख दाट होता. हिरव्या दोरीला लटकणारा पिवळा दिवा मंद पसरला होता. पत्र्याचा व हातोडीचा आवाज घुमत होता. बघे अजूनही येतजात होते. "हे तू बरं केलंस. बाई माजली होती !" शेजारीण बोरकर कुजबुजली.

"हे होणारच होतं...! माझे बाबा कधीच हरत नाहीत !"

चांदण्या रात्री चमचमणाऱ्या त्या पत्र्याच्या दारावर मी माझ्या बाबांचे नाव रेखले.
विश्वास पाटील.

परतीचा अंधारलेला रस्ता उजळून गेलेला...


41 comments:

Raj said...

हॅट्स ऑफ, मानलं तुम्हाला. नुसते वाचतानाच सहनशक्तीची परिसीमा झाली, तुम्हाला अनुभवताना काय झाले असेल याची कल्पनाच करू शकतो. मन:पूर्वक अभिनंदन.

sanket said...

"शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये " >> आता लक्षात आले !
किती मानसिक-शारीरिक-आर्थिक त्रास झाले असेल ना ?
निर्धाराने लढा देऊन ३ वर्षांत विजय खेचून आणला ! जबरा !! मानले बुवा. अभिनंदन हो !

श्रद्धा said...

धन्य तुमच्या जिद्दी आणि चिकाटीची! तुमचे हे ७ भाग संपेस्तोवर माझ्याच जीवात जीव उरत नव्हता... तुम्ही आणि तुमच्या बाबांनी मिळून इतकी वर्षं कुठल्या बळावर कशी काढलीत?

देव सत्याच्या मागे उभा असतो, याची खात्री पटते मात्र - तुमच्यासारखी माणसं पाहिलीत की... अगदी मनापासून सांगतेय अनघा - "देव नेहेमी तुझी सदसदबुद्धि अशीच जागृत ठेवो आणि तुझं नेहेमीच 'भलं' होवो." :)

रोहन... said...

ऐ. शाब्बास... :) सच और साहस है जिसके मनमे... अंतमे जीत उसीकी हो...

ह्या सर्व तारखा आणि इतर नोंदी तेंव्हाच घेऊन ठेवल्या होत्यास ना... बघ पोस्ट लिहिताना किती कमी आल्या... :D

सौरभ said...

मानाचा मुजरा... त्रिवार मुजरा...

THEPROPHET said...

मानलं तुला आणि तुला ज्यांनी ज्यांनी मदत केली त्या सर्वांना!!!
आणि हो त्या शर्मा बाईलासुद्धा (वेगळ्या कारणानं) :P
बाकी रोहन +१ ;)

Anagha said...

राज, आभार... :)
खरोखर सहनशक्तीचा कडेलोट ! :)

Anagha said...

संकेत, बाबा होते न पाठीशी ? म्हणून झालं सगळं... :)

धन्यवाद हं. :)

Anagha said...

बाबा होते तेव्हा काही सुद्धा माहित नव्हतं ग हे सगळं...कसे एकटे लढत होते ते त्यांचं त्यांनाच माहित !

श्रद्धा, देव सत्याच्या मागे उभा असतो हे मात्र तुझं अगदी खरं ग... आणि खरं सांगू ? आपली बाजू सत्याची आहे म्हणूनच तर अधिक बळ येतं. :)

श्रद्धा, ह्या तुझ्या प्रार्थनेने डोळे भरून आले...

Anagha said...

हो रोहणा, अरे काही कळायचंच नाही आजूबाजूला काय घडतंय ते ! म्हणून मग प्रत्येक दिवशी नोंद करून ठेवायला सुरुवात केली !
त्यादिवशी ती वही पुन्हा हाताशी आली...आणि पुन्हा सगळं आठवलं...
मग म्हटलं तुम्हांला सगळ्यांना तर हे सांगायलाच हवं ! :)

Anagha said...

सौरभा ! :)

Anagha said...

अगदी अगदी विद्याधर, हे सगळं मला झेपणारं नव्हतंच ! अरे, नुसती जिद्द घेऊन काय कामाची ! जर बरोबरची माणसे नीट नसती मिळाली तर काही खरं नव्हतं ! :)

Pankaj - भटकंती Unlimited said...

हुर्रेर्रेर्रे...!!!

Anagha said...

:D मला पण आता वळून बघताना अस्संच वाटतंय पंकज !! :)

rajiv said...

सत्याची बाजू , सकारात्मक दृष्टीकोन आणि जिद्द या गोष्टी जर एकत्र आल्या तर विजय मिळवण्यासाठीच्या इतर सर्व आवश्यक गोष्टी आपोआप तिथे गोळा होतात, अगदी परमेश्वर पण ..... जे या अनघाच्या लढ्यात झालेय !!

Unique Poet ! said...

"हा हाय कोर्टाचा आदेश इंग्रजीत आहे. तो काही मला कळत नाही. तुम्हीं सांगा पाहू मराठीत."
फलटणकर...त्यांचे कायद्याचे ज्ञान व शुद्ध मराठी. संपूर्ण आदेश त्यांनी शिंद्यांना समजावून सांगितला.
"छे छे ! नाही हो ! काहीच कळत नाहीये ! मला नीट वाचावे लागेल. व त्यासाठी मी तुम्हांला पुढील तारीख देतो."
तारीख ३ आठवड्यांनंतरची !"

हा केव्हढा अंत पाहणारा जोक आहे... आणि तो ही एका न्यायाधीशाकडून????

अभिनंदन !!!! :)

आणखी एक.... तुम्ही लढवलेल्या या खटल्यात श्री. फलटणकरांचा रोल बराच महत्वाचा, मदतीचा ठरला....नाही !!!! :)

Anagha said...

:) काही बोलत नाही मी आता ह्यावर राजीव फलटणकर...जिद्द खरी, पण ह्या तुमच्या कायद्याच्या गोष्टी आम्हां सामान्यांच्या डोक्यावरूनच जातात ! त्यामुळे तुम्हीं आमच्या बरोबर नसतात तर ह्या लढ्यात आमचं काय झालं असतं ते देवालाच ठाऊक ! :)

Anagha said...

समीर, त्या तीन वर्षांतील तो दिवस सर्वात वाईट होता ! म्हणजे माझा विश्वासच बसत नव्हता घडलेल्या गोष्टीवर ! :(

आणि अगदी खरं आहे समीर तुझं...मी वर म्हटलंय त्याप्रमाणे...हे सगळे कायदे आम्हां सामान्यांना नाही कळत...डोकं फिरायची पाळी येते !
जर तेव्हां फलटणकर आमच्या बरोबर नसते तर काहीही खरं नव्हतं !
पहिल्यांदाच, न्यायाधीश चंद्रचुडांनी हाय कोर्टात खटला दाखल करून घेतला असता आणि मग तिथेच आमची पुढली वीस वर्ष भरली असती ! !
:)

सगळं वाचून काढलंस !...आभार :)

rajiv said...

देवाला ठाऊक होते म्हणून तर त्याने, माझ्या बालमित्राच्या तर्फे ही कामगिरी मला दिली :)

Anagha said...

:)

panda said...

महाsssन, मानले बुवा !!! खरोखर नुसते वाचताना देखील दमछाक झाली. कधी एकदाचे त्या शर्मा बाई "पानिपत" होते, त्याची वाट बघत होतो. मन:पूर्वक अभिनंदन.

Anagha said...

पंकज, नाव बदलूया का कामगिरीचे ?
'पानिपत ! शर्मा बाईचे !' :द

आभार रे सर्व वाचल्याबद्दल ! न वैतागता ! :)

हेरंब said...

>> "हे होणारच होतं...! माझे बाबा कधीच हरत नाहीत !"
चांदण्या रात्री चमचमणाऱ्या त्या पत्र्याच्या दारावर मी माझ्या बाबांचे नाव रेखले.
विश्वास पाटील.

जबरदस्त !! मस्तच.. जिओ.. हुर्रे !!! "पुत्री व्हावी ऐशी गुंडी" :D

आवरागिरी : कुठलाही लढा लिहायला ७ भाग लागतातच :)

Anagha said...

:) आता हे सगळं लिहिलं ना हेरंबा, तर असं वाटतं..की बाप रे हे सगळं कसं काय झालं ?! :)

न कंटाळता वाचल्याबद्दल खरोखर धन्यवाद हेरंब ! :)

अपर्णा said...

अनघा हुर्रे....सर्व भागांसाठी एकाच प्रतिक्रिया देतेय...अग धाप लागली वाचताना..प्राण कंठाशी आले....कस जगलीस हे सगळं...तुला सलाम बाई....

नेहमी 'तारीख पे तारीख' हा चित्रपटात येणारा डायलॉग प्रत्यक्षात अनुभवला. बाप रे....आपला कायदा फक्त आंधळा नाही तर लहरी पण आहे हे त्या न्यायाधीशाच्या उदा. वरून सांगता येईल...

तुझ कौतुक ग...

Anagha said...

अपर्णा, कधीकधी एखादा कठीण गड चढताना आपण मनाशी म्हणतो न...अजून एक पायरी...अजून एक पायरी....तसं काहीसं झालेलं माझं...
आता लिहिलं की हे सगळं माझ्या देखील अंगावरच येतंय !

धन्यवाद गं ! :)

Shriraj said...

तर साळुंख्यांनी गड राखला म्हणायचा... अनघा आणि राजीव ग्रेट जॉब...
अनघा हे सर्व लिहिताना किती त्रास झाला? हे सर्व लिहिताना तू पुन्हा ते क्लेशदायक क्षण जगते आहेस असे प्रत्येक भागात वाटत होते

Anagha said...

:) हो रे श्रीराज, ती वही उघडली आणि एकदम फ्लॅश बॅक सुरु झाला !!! :)
आणि तारखा पडण्याच्या आपल्या 'सिस्टीम'मुळे कथेतील सस्पेन्स आपोआपच राखला गेला ! :D

नीरजा पटवर्धन said...

राग राग येत होता सगळ्या वेळखाउपणाचा वाचतानाही. तुझं काय झालं असेल!
हिंमतीची गं तू!

Anagha said...

अगदी गं नीरजा...अंत बघितला सगळ्याने...पण सोडायचा प्रश्र्नच नव्हता ना ! बघू तर किती तारखा देता ते...असंच ठरवलं होतं ! :)

आणि एक सांगू, हे असं काही नेटाने केलं आणि सार्थकी लागलं ना की बघ आपल्यालाच अधिक बळ येतं ...आत्मविश्वास वाढतो. हो न ? :)

Anonymous said...

>>>>> "हे होणारच होतं...! माझे बाबा कधीच हरत नाहीत !"
चांदण्या रात्री चमचमणाऱ्या त्या पत्र्याच्या दारावर मी माझ्या बाबांचे नाव रेखले.
विश्वास पाटील.

अनघा किती छान वाटलं हे वाचताना सांगू .... मस्त मस्त मस्त... आपण बाबांना हरू द्यायचच नसतं हो ना...
एक प्रसंग आठवला बघ लहानसा,परवा अमित म्हणाला पायाला लागलय काहितरी, मी आणि ईशान नुसते हं म्हणालो, गौरी उठून धावत गेली आणि Nivea घेऊन आली आणि अमितच्या पायाला लावू लागली... बाबांनी जिंकायचंच असतं ना अनघा!! :)

मानलं तूला आणि तुझी मदत करणाऱ्या सगळ्यांना :)

BinaryBandya™ said...

बाप रे !!!
असो शेवटी जिंकला तुम्ही :)
एवढे सगळं करायला केवढी सहनशक्ती हवी ..
धन्य आहात तुम्ही ...

अजून एक
"शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये "
ह्यात अजून एक भर घाला
""शहाण्याने SBI कडे होमलोन मागू नये"

Raindrop said...

Nikaal mala mahit hota pan ewadhe kashta ghetles tu tya sathi...he nhawata maahit. Hats off to u!!!

ऍडी जोशी said...

भन्नाट. सातही भाग एका दमात वाचले. अनुभव प्रचंड ताकदीने पोचवला आहे तुम्ही.

Anagha said...

तुझ्या लेकीची किती छान आहे ही आठवण तन्वे ! तिच्या बाबाचे डोळे भरून आले का ? :)

आभार गं इतकं वाचल्याबद्दल ! :)

Anagha said...

बंड्या, कोडं सुटलं का तुझं SBI चं ???

Anagha said...

हो न वंदू...नेहेमी फक्त तारीख पडली तारीख पडली असं सांगत राहिले तुला...पण इतकं कधी तपशीलवार सांगणं नाही झालं ! वाचलंस ना गं बाई सगळं ! मानलं तुला ! :)

Anagha said...

ऍडी, आभार आभार ! :)

Raindrop said...

now I know what Sunny Deol meant by 'tareekh pe tareekh, tareekh pe tareekh'....

Prof. Sumedha said...

शहाण्यांनी कोर्टाची पायरी चढावी...कितीही दमछाक झाली तरी ...चढत राहावी...आणि जिंकावेच...
प्रचंड सहनशक्ती,तरीही अगतिकतेची सोबत , पण त्याच बरोबर बाबांबद्दलचे प्रेम, विश्वास, जिद्द आणि योग्य व्यक्तींचे मार्गदर्शन आणि सहकार्य ...सगळ्याचा हा मिलाफ...
People should be led by example...हे तुमच्यावरून अगदी मनापासून पटले.

Anagha said...

सुमेधा, खूप मोठं काही बोलून गेलीस.
आपण म्हणतो शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये...पण मग अन्याय होत असताना शहाण्याने काय करावे ? उलट आपण जर 'योग्य मार्गदर्शन घेऊन' ( हे फार महत्त्वाचे) अन्यायाविरुद्ध लढलो नाही तर मग कोण लढणार ?

खूप खूप आभार गं. :)