नमस्कार

नमस्कार

Pages

Friday 20 May 2011

कोर्टाची पायरी...भाग ३

भाग १
भाग २

बाई मुंबईपर्यंत पोचली होतीच.
माझ्या भोळसट मनाचा उगाच एक भ्रम...रत्नागिरीत असेल तुझी वट...पण मुंबई माझी आहे...!

दुर्दैवाने, अजून पुष्कळ धडे बाकी होते...

२८ मार्च...
कॅव्हिएट तयार झालं...तयार करून ठेवू, गरज भासली तरच दाखल करू...उगाच का खर्च...कपाडिया म्हणाले.
कॅव्हिएट केल्याने शर्मा बाईने केलेल्या विनंती अर्जाचा ( रिट पिटीशन ) विचार करीत असता, मुंबई कोर्ट आम्हांला न कळवता कोणताही निर्णय घेऊ शकणार नव्हते. तो दिलासा होता अदमासे १० हजार रुपयांचा.

"I feel Anagha, आता आपण रत्नागिरीत decree execute करावयास हवी. डिसेंबरपासून भरपूर वेळ गेलेला आहे." श्री. कपाडिया म्हणाले. एखादा माणूस आपल्याला भेटतो...व विश्वास देऊन जातो. तसेच काहीसे कपाडियांबद्द्ल म्हणता येईल. साठीच्या आसपास असावेत. थोडी स्थूल शरीरयष्टी. गोल तजेलदार चेहेरा. साईसारखा...
"decree execute ? म्हणजे ?"
"म्हणजे रत्नागिरीच्या कोर्टात पाटलांच्या बाजूने निकाल लागला...बरोबर...? मग आपण तो निकाल धरून घर रिकामे करून घेण्यासंदर्भात त्या कोर्टाकडून ऑर्डर का मिळवू नये ?"
"असं करू शकतो का ? मग करुया..."
"आणि ती बाई तुझ्याकडे तुझं घर विकत मागते ना...? मग तू तिलाच सांग ना...की मी तुला पैसे देते...तू तुझीच सगळी जागा आम्हांला दे...!"
मी हसले..."नको....तिच्याशी काहीही व्यवहार नको आपण करायला...हेच कोर्ट मॅटर संपवूया आपण लवकर...."
"ठीक ठीक. हे असं देखील तुम्हीं करू शकता हे आपलं मी सांगतोय तुम्हांला."
"बरोबर."
...इतक्या वर्षांचे घरमालक भाडेकरूचे नाते...कुठल्याही प्रकारे ग्राहक व विक्रेता ह्यात रुपांतरीत होणारे नव्हते.

हाय कोर्टातून अधिक माहिती मिळाली...हा खटला जज्ज राधाकृष्णन ह्यांच्याकडे लागला आहे. मे पर्यंत तरी त्याचं काहीही होणार नाही. व खालील कोर्टाच्या निकालावर 'स्टे' आलेला नाही. खटला 'पेंडिंग' ठेवला गेला आहे. जर कोर्टाला दाखल केलेले कागदपत्र पुरेसे वाटले नाहीत तर कोर्ट ह्या प्रकारे खटला पेंडिंग ठेवते...

२२ एप्रिल. रत्नागिरी.
वकील भुर्के ह्यांना भेटून घराचा ताबा मिळवण्यासाठी कोर्टाची ऑर्डर घेण्यासंदर्भातील अर्जावर मी सह्या केल्या.

...आता ताबा घेण्यासाठी मला कोर्ट ऑर्डर देणार...आणि मी बाबांच्या घराचा ताबा घेणार....चला...बाबांची इतक्या वर्षांची चिंता आता मिटतच आली की...मांडे...मांडे...! अज्ञानातील सुख...!

घरी गेले...बाबांच्या नातलग गृहस्थांच्या सुनेने शेवटी बाबांना त्रास देऊन का होईना...पण बाबांचे घर रिकामे करून दिले होते...व समोरच एक मजली बांधलेल्या स्वत:च्या घरी बस्तान हलवले होते. बाबा कायम स्वरूपी मुंबईत असल्याचा किती जणांचा फायदा. त्या घरात होता एक मोठा पितळी जड भक्कम लामणदिवा...आई म्हणाली होती. मी कुलूप उघडून आत गेले...तर लहानश्या देवघरात लाकडी चौरंगावर सर्व देव, शंख, धुळीत बसून राहिले होते...चार लंगडे बाळकृष्ण...कलंडलेले. किती दिवसांत त्यांना अंघोळ नव्हती, कोण जाणे. एक छोटासा लामणदिवा, धूळ खात पडलेला. घरासमोरची विहीर. त्यावर सुनबाईचा पंप.
पुढील कालावधीत एकदा, ज्यावेळी सर्व जागेची मोजणी झाली, त्यावेळी ती विहीर आली आमच्या वाट्याला...व त्यावर सुनबाईचा पंप ! "हा पंप तर आम्ही लावलाय...आम्हांला तुम्हीं विका ही विहीर...पन्नास हजार देते मी तुला..."
"मी काही बोलले का तुम्हांला...दिसतंय ते मला की विहीर आमची आहे व पंप तुमचा आहे...आणि पाणी तुम्हीं वापरताय..."
मुंबईला पोचले त्याच दिवशी संध्याकाळी फोन वाजला. "काय ग जागेची मोजणी करून घेतलीस ना?"
"हो. आत्या. झाली मोजणी."
"एक सांगते तुला...त्या बाबाच्या सुनेचं पाणी तोडू नकोस तू ! बाबाला तुझ्या नाही पटणार ते ! वापरू दे तिला ती विहीर..."
"पण मी असं काहीच तर म्हटलं नाही ! तीच म्हणाली...पन्नास हजार देत होती ती मला !"
"पाणी विकणार आहेस का तू ? बाबाची मुलगी ना तू ?"
"अगं आत्या, मी असं कुठे म्हटलं काही ? मी तिला वापर चालूच ठेवायला तर सांगून आलेय !"
"हं...बरोबर केलंस मग तू !"
म्हणजे माणसं चांगलं वागू शकतात हे त्या लबाड सुनबाईच्या काही ध्यानात नव्हतं. तिचा नवरा खुद्द सर्वेअर...म्हणजे त्यांना हे तर माहितीच होतं ना...की विहीर आमची आहे...पाणी तर कित्येक वर्ष वापरतायत...अर्थात बाबांवर कदाचित विश्वास असेलही...पण बाबांच्या मुलींवर कुठून विश्वास ? मी तिथून निघाले नाही तर मुंबईला फोन...!
बाबांचे देव चकचकीत झाले...स्वच्छ न्हाऊन...दादरला विराजमान झाले...

३ मे.
मुंबईहून भुर्केंना फोन केला...रत्नागिरी कोर्टाने सुनावणीची तारीख दिली आहे...१५ जुलै.

६ मे.
"मी अनघा बोलतेय." कपाडियांना तारीख कळवायची होती.
"बोल बोल..."
"१५ जुलैची तारीख दिलेय खालच्या कोर्टाने."
"१५ जुलै ? It's too late Anagha ! तोपर्यंत इथे हाय कोर्टात तिचा विनंती अर्ज मान्य झाला तर काय करणार आपण ?"
"अं ?....हो का ? मग काय करू आता ?"
"त्या भुर्केला फोन लाव...आणि त्याला सांग अलीकडची तारीख घ्यायला ! मात्र जर भुर्के नाही म्हणाला तर नाही काही करू शकत आपण...आपली केस मुंबई हाय कोर्टात दाखल होता कामा नये...कारण अनघा, जर तसे झाले, तर पुढची १० वर्ष विसरून जा तू ! चालू राहील इथे ती केस ! बसशील तारखा घेत !"

२७ जून...
गरज उभी राहिली...काळजीचा ढग तरंगू लागला...
मुंबई हाय कोर्टात आमचं कॅव्हिएट दाखल झालं...

...डाव त्याचा होता...
फासे त्याचे होते....
तो ते गेली वीस वर्षे टाकत होता...
त्यात रंगून गेला होता....
डाव त्याला सोडवत नव्हता...
खेळ त्याला मोडवत नव्हता...
अजून एक फासा...
पडायचा होता.

18 comments:

हेरंब said...

बाप रे... केवढं क्लिष्ट प्रकरण आहे हे.. किती टेक्निकॅलिटीज !!

भानस said...

अरे देवा! मग, पुढे काय झालं??

आत्याबाईंनाही बरी आत्ताच ’ बाबांची ’ थोरवी आठवावी... :(

Anagha said...

अगदी अगदी हेरंब ! म्हणून तर त्या काळात ह्या खटल्यासंदर्भात एक वहीच करून ठेवली होती. व त्यात प्रत्येक नोंदी लिहून ठेवल्या होत्या...आता हे सगळं लिहायला घेतलंय तर मला देखील ते परत नीट कळतंय...त्याची एकत्र लिंक लावता येतेय. त्यातील details नीट कळतायत...

Anagha said...

हम्म... :)
अगं, खरं तर वाटलं नव्हतं ग भाग्यश्री की इतके भाग करावे लागतील...पण सगळं एक दोन भागात संपवणे कठीणच वाटले...प्रकरण क्लिष्ट आहे...व ते सोप्पं, माझ्यासारख्या कधीही कायद्याशी असा जवळून संबंध न आलेल्या बाईच्या नजरेतून, ते लिहायचा प्रयत्न आहे...
:)

रोहन... said...

रत्नागिरी कोर्टाने तुमच्या बाजूने निकाल दिला आणि घर सुद्धा तुझ्या ताब्यात आले होते ना... आता फक्त चिंता होती ती त्या बाईने पुन्हा अर्ज वरच्या कोर्टात केला तर... मला आधी कळेचना.. निकाल तुझ्या बाजूने लागलेला असताना तुला मुंबई च्या कोर्टात केस टाकायची गरज काय... गोंधळलो होतो.. :D

Anagha said...

रोहणा, खालच्या कोर्टाने बाबांच्या बाजूने निकाल तर दिला होता...परंतु, तसा निकाल दिल्याने माझ्यावर अन्याय झाला आहे आणि म्हणून माझी बाजू ऐकून घेतली जावी अश्या प्रकारचा विनंती अर्ज शर्मा बाईने मुंबई हाय कोर्टात दाखल केला होता....तिथून पुढे सगळा वेळखाऊपणा होता....
मी मुंबई कोर्टात केस नव्हती घातली. तर तिने केलेल्या विनंती अर्जाचा निकाल मला कळवल्याशिवाय दिला जाऊ नये ह्या साठी 'कॅव्हिएट' दाखल केले होते....ती हाय कोर्टात गेल्याने मला तिला तिथे थांबवणे भाग होते....
:)

BinaryBandya™ said...

कोर्ट म्हणजे सगळे काही अनझेपेबल :(:(

Unique Poet ! said...

कोर्टाची पायरी...कोर्ट म्हंटले की टेक्निकॅलिटीज तर आहेतच.... प्रचंड वेळ... पैसा..... खर्च होतो.... शिवाय मनस्ताप वेगळा.... पण यात सुयोग्य वकिली सल्ला मिळणे फार गरजेचे........
कायद्याचा विद्यार्थी असल्याने या सगळ्या बाबी मीही थोड्‍याफार प्रमाणात अनुभवतो आहे....
बर्‍याचदा... अशिलाची फरफटच जास्त होते.....

Anagha said...

खरंय बंड्या....पण जर अंगावर आलंच ना कधी दुर्दैवाने...तर कधी धीर सोडू नये...शेवटी अन्यायाविरुद्ध आपण लढा द्यायलाच हवा ना ? :)

Anagha said...

अरे व्वा ! तू लॉ करतोयस का समीर ?
समाजाच्या दृष्टीने किती चांगलं...नाही का ? कोणी संवेदनशील व तरीही खंबीर असा माणूस ह्यात उतरला तर आमच्यासारख्यांचे भलेच ! हो ना ? :)

Unique Poet ! said...

हो अनघाताई ! मी लॉ करतोय.... :)

संवेदनशील...खंबीर..... :)
इतरांप्रती तर असेनच ... पण स्वत:शीही प्रामाणिक राहण्याचा सतत प्रयत्न करेन हे नक्की...!

Anagha said...

मला अभिमान आहे समीर तुझा....आणि ह्या तुझ्या प्रवासासाठी तुला मनापासून शुभेच्छा ! मला जाणीव आहे समीर...रस्ता कठीण आहे. :)

BinaryBandya™ said...

हो लढा तर द्यायलाच हवा :)

Unique Poet ! said...

अनघाताई................! पुढील रस्ता कसाही असला तरी दोन गोष्टी नेहमीच आपल्या हातात असतात... निवड करण्याचे स्वातंत्र्य आणि अखेर पर्यंत लढत राहण्याची जिद्द...... आपला निर्णय घेतला म्हणजे त्यासाठी प्रसंगी लढ्ण्याचीही तयारी करावी लागते हे सदैव लक्षात राहील माझ्या...!

तुमच्या शुभेच्छांसाठी मनापासून धन्यवाद....!

अभिमान..... :) आभार्स अगेन ...... माझी जबाबदारी वाढलीयं.... नाही...? :) खांदे एकदम जडजड वाटायला लागले... ;)

सौरभ said...

"हॅलो... हॅलो हा.. अनघा मॅडम आहेत का???"
"बोलत्ये.."
"मी बेशर्मा बोलतोय..."
"बोला"
"तुमचं ते घर आहे ना..."
"हां... त्याचं काय???"
"ते विकून टाका की मला.."
"(राग राग राग)"
"अवो ऐका तर... मी पैसे देतोकी... ५ लाख..."
"(राग राग राग)"
"अवो.. समजून तर घ्या... अवो... हॅलो... हॅलो......." (बेशर्माचे स्वगत - श्या राव... फोन कट केला. ५ लाखातला एक रुपया वाया गेला. घर घ्यायला आता फक्त ४,९९,९९९/- रुपये उरलेत :-S)

Anagha said...

हेहे ! सौरभा ! बेशर्मा ?!! :D :D :D

Pankaj - भटकंती Unlimited said...

आता कोर्टाचे nomeclature उघडून बसलो आहे.

Anagha said...

हेहे ! पंकज ! मी फलटणकरांना एकच गोष्ट दहादा सांगायला लावायचे ! :p