नमस्कार

नमस्कार

Pages

Thursday 19 May 2011

कोर्टाची पायरी...भाग २

भाग १.

१३ मार्च २००३.

जेव्हां अकस्मात आभाळ कोसळले आहे व आपण एका युद्धाच्या मुखाशीच उभे आहोत, हे सत्य जबडा वासून उभे रहाते, त्यावेळी आधारासाठी आसपास कोण आहे ह्यावर आपसूकच नजर जाते. असे कधीही कुठल्याही वेळेला धावून येणारे एक व्यक्तिमत्व.
"तू कधीही फोन कर ग...मी कितीही कामात असलो तरीही तुझा फोन उचलतोच की नाही ?"
"हो. ते माहितेय मला संदीपदादा...पण..."
"काय झालं ?"
"तो बाबांचा खटला. रत्नागिरीतला."
"त्याचं काय ?"
"तो बाबा जिंकल्याचं म्हणत होते. पण आता पुढे काय करायचं ते काही मला कळत नाहीये."
"ठीक. एक काम कर. जरा त्या खटल्याचे डीटेल्स मला नीट लिहून दे. मग बघू काय करायचं ते."

चार दिवसांनी संदीपदादांचा फोन.
"मुंबई हायकोर्टाने शर्मा बाईंचं रिट पिटीशन फाईल करून घेतलं आहे."
"हो ? म्हणजे ? आता ?"
"रिट पिटीशन म्हणजे विनंती अर्ज. खालच्या कोर्टाकडून तिच्यावर अन्याय झाला आहे व त्या निकालाविरुद्ध तिचे म्हणणे, मुंबई हाय कोर्टाने ऐकून घ्यावे असा विनंती अर्ज."
"मग आता मी काय करू संदीपदादा ?"
"उद्या शनिवार. मी तुला एक नाव देतो. हाय कोर्टात जाऊन त्यांना उद्या भेट. व त्या रिट पिटीशनची एक झेरॉक्स कॉपी मिळव. ती मिळवणे आपल्याला जरुरीचे आहे."
"जाते."

चार दिवसांनी हीच नकल घेऊन मी फोर्टातील त्या ओळखीच्या जेष्ठ वकिलांसमोर बसले होते. श्री. कपाडिया.

"See. All this is very time consuming. And you cannot be sure about anything. But we are going to try. Right ?"
"Right"
"ठीक. तर आता एक कर. जेव्हा रत्नागिरीला जाशील त्यावेळी शर्मा बाईंना, विश्वास पाटलांच्या सर्व वारसांची नावे व पत्ते दे. त्या कागदाची एक नकल स्वत:बरोबर ठेव व त्यावर तिची सही घे. त्यामुळे तिने दाखल केलेल्या रिट पिटीशनमध्ये ती नावे टाकणे तिला भाग पडेल. तिच्या सहीच्या कागदाची नकल काढ. ती नकल शर्मा बाईंचे वकील श्री. पावसकर ह्यांच्याकडे पोचती कर."
"बरं."
"मे मध्ये कोर्टाला उन्हाळी सुट्टी असते. त्यामुळे एप्रिल संपायच्या सुमारास शर्मा बाई, मुंबई हाय कोर्टात, जज्ज पुढे येऊ शकतात. मे महिना संपेपर्यंत खालील कोर्टाच्या निकालावर १ महिन्याचा 'स्टे' आणू शकतात. आणि मग पुन्हा जेव्हा कोर्टाचे कामकाज सुरु होईल त्यावेळेस कोर्टाचा निकाल होईल. मला सध्या तरी वाटत नाही, हाय कोर्ट हा खटला दाखल करेल..."

"अनघा, हे तुला एकटीला जमणारे नाहीये."
"पण हे आता पुढे न्यायला तर लागेलच ना ? अर्धवट तर नाही सोडून देऊ शकत आपण. मग काय करुया ?" मी माझ्या धाकट्या बहिणीच्या नवऱ्याला विचारलं.
"माझा मित्र आहे. बालपणीचा. अॅडव्होकेट आहे. त्याची आपण मदत घेऊया."
"कुठे असतात ते ?"
"ठाण्यात."
"ठाण्यात ?! मग कसं जमणार ते मला ? मी दादरला...ते ठाण्यात !"
"Nothing doing ! राजू फलटणकरच ही केस सांभाळणार !"

२४ मार्च.

दुपारी अकराचा सुमार. मी व अॅडव्होकेट राजीव फलटणकर, शर्मा बाईच्या दारात होतो. कपाडियांनी सांगितल्याप्रमाणे आम्हां वारसांचे माहितीपत्र तिच्या हातात दिले. त्यावर तिची सही व अंगठ्याचा शिक्का घेतला.
"मी काय म्हणत होते..."
तशी बुटकी. गोरी. इथेतिथे अंगावर सोने. नजर बेरकी. मी ताडकन तिच्या दारातून बाहेर पडत असता तिचा तो थोडा पुरुषी आवाज कानावर पडला. मी वळून मागे बघितले. फलटणकरांच्या स्त्री सौजन्याचा फायदा घेत बाईने त्यांना अडवले होते.
"मी म्हणते...आपण हा मॅटर सेटल करूयात ना...."
"सेटल करुया ? म्हणजे ? म्हणजे काय करुया ?" मी वळून विचारले.
"मी काय म्हणत होतु....ते तुमचे वडील उगाच ओ भांडत बसले. ते तर गेले नाही का आता...मग किती वर्स भांडणार आपण...."
"झालीत....वीस उलटून गेलीत."
"तेच तर म्हणतुय मी....हे घर तुम्ही विकून टाका...मी घेते ना ! देते तुम्हांला पैसे मी..."
डोक्यात गेली माझ्या...
"माझे मालक गेल्यावर मी एकटीच आहे हो...मी एकटीच कारखाना सांभाळते....बघा...तुम्ही पण बघा भाव मार्केटला...पण मी चार लाख देते तुम्हांला. विकून टाका मला तुम्ही !"
"व्वा ! म्हणजे माझे बाबा गेले आणि ज्यासाठी ते खटला चालवत राहिले...ते त्यांचे घरच तुम्हांला विकू मी ? वाट्टेल ते तोंडाला येईल ते बोलू नका !"
फलटणकर मला हाताने थांबवू लागले.
"हे बघा बाई. ह्या मॅडम काही एकट्याच निर्णय घेऊ नाही शकणार हा...त्यांना त्यांच्या आईला विचारायला हवे...नाही का ? आणि बहिणी पण आहेत त्यांना...त्यांच्याशी बोलतील त्या...मग बघू...तुम्ही या मुंबईला...तेव्हा बोलू..."
तरातरा मी बाहेर...
"नंतर काय बोलू ? मी काय ह्या बाईला विकणार आहे बाबांचं घर ? मीच काय...आई आणि माझ्या बहिणी पण नाही विकणार कधी !"
"नाहीच विकायचं आपण...तिला आपलं मी उगाच म्हटलं...बघू ना अजून काय अक्कल चालवते ती !"
डोकं फिरवून बसलेल्या माझ्यासाठी हा पहिली गनिमी कावा...

पोस्टात जाऊन बाईच्या वकिलासाठी, पावसकारांसाठी, एक पत्र रजिस्टर पोस्ट केले. आता विरुद्ध पार्टीशी करावयाचा सर्व पत्रव्यवहार हा पोस्टाच्या मदतीने, रजिस्टर एडी नेच करावयाचा होता. ह्यालाच पुरावे तयार करणे व गोळा करणे म्हणतात. अतिशय आवश्यक गोष्ट. जे जे लेखी आहे ते ते कोर्टात महत्त्वाचे ठरू शकते...एक धडा...

त्यानंतर भिडे वकिलांच्या सहकाऱ्याची गाठ...भुर्के वकील.
"मी काय म्हणत होतो...ती शर्मा बाई मला मध्ये भेटायला आली होती."
शर्मा बाई...ह्यांना भेटायला ?
"ती हा कोर्ट मॅटर बाहेर सेटल करायचं म्हणतेय....विकत घ्यायचं म्हणतेय ती ते घर..बघा...विकून टाका...किती वर्ष भांडत रहाणार....तुमचे बाबा भांडत राहिले ठीक आहे...पण तुम्ही सुद्धा भांडत राहिलं पाहिजे असं काही नाहीये...चार लाख म्हणतेय ती...आणि मी केली चौकशी मार्केट मध्ये...मी पण इथलाच आहे....बरोबर भाव सांगतेय ती...कमी नाहीये...पैसे घ्या...घर देऊन टाका...आणि संपवा आता हे..."
हा बाबांचा वकील ?!
"ती कितीही लाख देईना का...आम्ही हे असलं काहीही करणार नाही !"
संताप संताप...डोक्यात...भुर्के वकील...माझ्या डोक्यात...
ताडताड निघाले...
आम्ही मुंबईच्या मार्गी लागलो....

चार दिवसांनी दादरच्या घरातला फोन वाजला...
"मी रत्नागिरीहून मयेकर बोलतोय."
"कोण मयेकर ?" मी विचारलं...
"मी रत्नागिरीत सर्वेअर आहे..."
"बोला...काय काम होतं..?"
"तुम्ही कोण बोलताय...?"
"मी विश्वास पाटलांची मुलगी बोलतेय...बोला तुम्ही..."
"अहो...तुम्हांला काही चांगलं सांगायला फोन केलाय.."
"हं...सांगा..."
"ते तुमचं घर आहे ना...शर्मा बाई रहातेय ते..."
"त्याचं काय?"
"अहो, किती वर्ष तुमचे वडील खटला चालवत राहिले...आता तर ते गेले...तर मी काय म्हणतोय...ती बाई सेटल करायचं म्हणतेय तर करून टाका ना..."
"म्हणजे काय करू?"
"विकून टाका ना तिला ते घर !"
"माझे बाबा इतकी वर्ष खटला चालवत होते...ते काय मूर्ख होते काय ?"
"बघा...बाई, तुम्ही उगाच वाकड्यात जाताय...सगळ्या गोष्टी भावनांनी होत नसतात...तुम्ही अजून लहान आहात...तुमच्या आईशी बोला...बहिणींशी बोला...आणि विकून टाका ते घर तिला..."
"झालं तुमचं बोलून ? ह्यात मला, माझ्या आईला आणि बहिणींना विचारण्याची काहीही आवश्यकता नाही...कारण मला माहितेय...माझ्या बहिणी आणि माझी आई असं काहीही करणार नाहीत ज्यामुळे माझ्या वडिलांचा अपमान होईल."
"अहो, अपमान काय त्यात...पैश्याचा मामला आहे मॅडम !"
"ठेवा आता फोन मयेकर साहेब....तुमच्याशी बोलण्यात मी माझा वेळ दवडावा इतके तुमचे, माझ्या आयुष्यात महत्त्व नाही..."

घ्या हो घ्या....माझ्या बाबांचा स्वाभिमान विकत घ्या...
माझ्या बाबांची वीस वर्ष विकत घ्या...
माझ्या बाबांची अक्कल विकत घ्या...!

विद्यार्जनात तासनतास रमून जाणाऱ्या माझ्या बाबांचा स्वाभिमान...
लाखमोलाचा.

बाई गं...तुझे चार लाख...
कवडीमोलाचे.

16 comments:

हेरंब said...

सगळी मिलीभगत !! मुळीच सोडू नकोस या लोकांना !! पुढच्या भाग कधी?

Gouri said...

अवघड आहे. आपल्याच वकिलाकडून असा ‘शहाणपणाचा सल्ला’ ऐकून घ्यायचा?

Unique Poet ! said...

लोकं सगळंच पैशात मोजायला जातात....


पुढे काय झालं.... हा प्रसंग २००३ साली घडलाय ना..?

रोहन... said...

बापरे.. २००३ म्हणजे मी पुन्हा कॉलेजात.शेवटच्या वर्षाला.. :) लिही भरभर पुढे.. आता उत्सुकता वाढली गं... आणि राजीव काका तिथपासून ओळखीचे काय... :) ह्यावेळी ठाण्यात आलो की त्यांना भेटायचे आहे.. :) s

Anagha said...

हेरंब...सहनशक्तीचा कितीदा कडेलोट...

लिहिते...आजच प्रयत्न करते... :)

Anagha said...

हो गौरी...म्हणजे, मी अनुभवाचे अधिक पावसाळे बघितलेत...म्हणून तुम्हांला तुमच्या भल्यासाठीच सांगतोय... हा असा आव !

Anagha said...

किती खरंय समीर...पण खरं तर पैसे कधीच होत्याचे नव्हते होऊन जातात...परंतु, आपल्या भावना किती खोलवर रुजून रहातात...हो ना ? :)

Anagha said...

:) रोहणा, अजून जग बघायचं होतं नाही का म्हणजे ? :)

लिहिते लिहिते...मी ते मुद्दाम एकेका मुद्द्यावर थांबवतेय... :)

भानस said...

खरेच किती मिलीभगत! तुला सगळे मिळून दडपण आणू पाहत होते. बाबा नाही बधले कदाचित लेक तरी...

Anagha said...

:) अगदी ग भाग्यश्री...पण त्यांना 'पाटील परवडले' अशी परिस्थिती निर्माण करण्यात यश मिळवलं होतं मी...हळूहळू...! :)

BinaryBandya™ said...

बाई गं...
तुझे चार लाख...

हो कवडीमोलाचेच.
पैशात थोडीच पाहिजे ते मिळतंय

त्यांना 'पाटील परवडले' अशी परिस्थिती निर्माण करण्यात यश मिळवलं होतं मी...हळूहळू...! :)

हाहा

सौरभ said...

ओऽऽऽऽऽऽहह्ह्ह्ह... ठाण्याचे राजू फलटणकर का... मी ओळखतो त्यांना. वकील आणि माणूस म्हणूनदेखिल फार चांगले आहेत. म्हणजे माझे काही केस नाही त्यांच्याकडे.. (अजून तरी माझी केस माझ्याच डोक्यावर आहेत) पण तुमची 'केस' त्यांच्याकडे आहे म्हटल्यावर चिंता नाही. गुंतागुंतीची 'केस' सोडवण्यात पटाईत आहेत.

Anagha said...

बंड्या... :)

Anagha said...

सौरभा, तुझी कुठली 'गुंतागुंतीची' केस सोडवली त्यांनी ? 'गुंतता हृदय हे' का ?? :)

Pankaj - भटकंती Unlimited said...

तर इथे आहे फलटणकरांची एंट्री.
आता सगळे वाचून काढतो.

Anagha said...

:) हो...पंकज.

मी अधिक छोटं नाही करू शकले हं....आशा आहे की तुम्हीं सगळे समजून घ्याल. :)