नमस्कार

नमस्कार

Pages

Tuesday 17 May 2011

कोर्टाची पायरी...भाग १

माणसाला, आयुष्यात अनेक भूमिका जगावयास लागतात. मनात असो वा नसो. माझ्या अभ्यासू वृत्तीच्या बाबांची एक भूमिका होती घरमालकाची. खुद्द रत्नागिरीतील त्यांची वडिलोपार्जित शेतीभाती, घर, गोदाम हे सर्व मागे सोडून ते बौद्धिक गरजेसाठी मुंबईत स्थायिक झाले होते. त्या त्यांच्या जमीनजुमल्याची देखभाल, त्यांनी तिथेच रहाणाऱ्या नातलग गृहस्थांवर, मोठ्या विश्वासाने सोपवली होती. त्यात भाताची शेती, माड, आंबा, फणस ह्याही गोष्टी होत्याच. कधी एखाद्या उन्हाळी सुट्टीत आंब्याच्या पेट्या मुंबईतील आमच्या घरी येत असत. कधी माश्याच्या लाल कालवणाबरोबर, लालसर दिसणारा चवदार भात आई ताटात वाढत असे.
आम्हां तिघी बहिणींना घेऊन आई, एकदाच गावी पोचली होती. त्या तिच्या सहलीचा तिचा अनुभव बहुधा फारसा सुखावह नसावा. त्यामुळे, त्यानंतर आम्हीं तिथे कधी पोचलो नाही. बाबा मात्र वर्षातून दोनतीनदा पहाटेची एसटी पकडून गावी जात असत. आठवडाभराने पहाटेच घरी परतत असत. तिथे रहाणारे त्यांचे ते नातलग गृहस्थ मुंबईत वास्तव्याला येत तेव्हा आमच्या घरी उतरत.

आणि मग कधीतरी अगदी १९८५ साली, रत्नागिरी कोर्टात बाबांचा खटला उभा राहिला. नातलग गृहस्थांनी, १९६५ साली बाबांना न विचारताच गोदाम रहातं करून तिथे एक कुटुंब, भाड्याला लावून टाकलं होतं. शर्मा. धंदा सुतारीचा. बाबांना कधीही तो शर्मा पटला नाही. आवडला नाही. त्याला निघून जाण्यासाठी विनंत्या करून झाल्या. पत्रव्यवहार करून झाला. परंतु, शर्मांनी खांब चांगलेच रोवले. भारतीय कोर्टातील खटला. रीतिरिवाजानुसार तारखा पडू लागल्या. माझा सहभाग ह्यात शून्य. फक्त बाहेर गेलीस की ह्या कागदाची एक नकल काढून आण...हे इतकेच मला झेपणारे काम बाबा मला सांगत असत. बाकी काही थांगपत्ता नसे. त्यांच्याकडून लिहिल्या जाणाऱ्या व नाक्यावरील पोस्टाच्या लालबुंद पत्रपेटीत पडणाऱ्या प्रत्येक कागदाची नकल मात्र निघतच असे. ती व्यवस्थित फायलीत जाऊन विसावत असे.

तारखेवर तारीख. वर्षांवर वर्षे. वीस वर्षे.

मध्यंतरीच्या काळात शर्मा वारले. बायको खमकी. तिने आमच्या घराच्या बाजूला दुसरे घर विकत घेतले. तिथे भाडेकरू लावला. व आमच्या घरात ऐसपैस वास्तव्य चालू राहिले. २००२ साल उजाडलं. गावच्या कोर्टात केस जिंकल्याचे बाबा म्हणाले. आणि त्याच वर्षी डिसेंबरमध्ये बाबा गेले. तिसऱ्या दिवशी शर्मा बाईंचा घरी फोन आला. पाटील गेल्याच्या आमच्या दु:खात ती सहभागी असल्याचे तिने मला सांगितले. आत्या म्हणाली, "ही बाई जादूटोणा करते. माझा भाऊ हिनेच खाल्ला." ती बाई काळी का गोरी, अजून पर्यंत थांगपत्ता नव्हता.
बाबांची दूरध्वनी क्रमांकाची वही अतिशय चोख. त्यात त्यांच्या रत्नागिरीतील वकिलांचा नंबर सहज मिळाला. भिडे वकील.
"मी विश्वास पाटलांची मुलगी अनघा बोलतेय."
"बोला."
"बाबा दहा दिवसांपूर्वी गेले. ते कळवायला फोन केला होता."
"तुमचे वडील गेले ह्यात मी काहीही करू शकत नाही."
अपेक्षा ह्या शब्दांची नव्हती.
"हो. ते बरोबर. पण तुम्हांला कळवणे गरजेचे वाटले म्हणून..."
"त्याची काहीही गरज नाही. ज्यावेळी कोर्टात तारीख लागेल तेव्हां मी कळवेन. माझे सहकारी आहेत भुर्के वकील....ह्यापुढे त्यांच्याशी तुम्ही बोलत जा."
"ठीक."

बाबांचे अस्थीविसर्जन त्यांच्या गावी करावे असा विचार ठरला. त्यानुसार अस्थी घेऊन गावी पोचले. बाबांचे बालपणीचे मित्र त्यावेळी आवर्जून उपस्थित होते. ते व बाबा ज्या समुद्रकिनाऱ्यावर तासंतास फेरफटका मारीत असत, त्या मांडवी किनाऱ्यावर विसर्जन केले.
त्यानंतर बाबांच्या घरी जावे म्हणून ज्यावेळी घरी पोचलो तेव्हा प्रथमच 'शर्मा बाई' डोळ्यांना दिसली.
बाबांची वीस वर्ष. मनस्तापाची.
"पाटील गेले. फार वाईट झाले. मला रातच्याला कळालं. म्हणून लगेच सकाळी फोन केला तुम्हांला. खूपच वाईट झालं हो ! बरे तर होते ना ?" शर्मा म्हणाली.

इथेतिथे ऐसपैस पसरलेली जागा, आंबा, माड, विहिरी, पडीक कौलारू घर, मालकीण बाई आल्या म्हणून सांत्वनासाठी आलेले भाडेकरू. हे सर्व काही वेगळं होतं. बाबा इथे काही वेगळे होते.

मुंबईत परतलो. आता आठवतं...एका शनिवारी फोर्टातील एका नावाजलेल्या वकिलांसमोर ह्या खटल्यासंदर्भातील बाबांची फाईल घेऊन बसले होते. ते वकील, मुंबई हाय कोर्टात गुन्हेगारी संदर्भातील खटले चालवत व माझा खटला हा दिवाणी कोर्टातील होता. परंतु, ते ओळखीतील होते. मदतशील होते. त्यांनी फाईल तपासली.
रत्नागिरी कोर्टाने बाबांच्या बाजूने निकाल असा लावला होता....
अ) भाडेकरूने स्वतःच्या निवासासाठी शेजारीच दुसरे घर बांधले आहे.
ब) भाडेकरू, मालकाच्या जागेचा वापर रहाण्यासाठी न करता उद्योगधंद्यासाठी करीत आहे.
भाडेकरूने जुन्या न दिलेल्या भाड्याची वसुली या मुद्द्यावरील निकाल, कोर्टाने अनुत्तरीत ठेवला होता.
मुंबईच्या वकिलांनी पहिला सल्ला दिला.
"मुंबई कोर्टात कॅव्हिएट फाईल करावयास हवे."
"कॅव्हिएट म्हणजे ?"
पुढील कालावधीत मला पडत गेलेल्या असंख्य खुळ्या प्रश्र्नांची ती नांदी होती.
"आपण कॅव्हिएट केल्याने, जर ती बाई जिल्हा कोर्टाच्या निकालाविरुद्ध मुंबईतील हाय कोर्टात आली, तर आपल्याला पूर्व सूचना दिल्याशिवाय कोर्ट काहीही व कधीही निकाल देऊ शकणार नाही."
"हो का ? बरं. मग करू या आपण."

कोर्टाची पायरी...
खरं तर कोर्टाचा जिना...
एकेक पायरी...
एकेक धडा...
माझे त्या जिन्यावरील गतीने धावणे...
व माझ्या जलद गतीला पावलोपावली खीळ घालणारा भारतीय कायदा...

20 comments:

Anonymous said...

अनघा, किती गं निष्ठुर असतात माणसं!!!

पुढे काय झालं?

Gouri said...

सुदैवाने आजवर कोर्टाची पायरी चढायची वेळ आले नाही. पण तुझं हे ‘गाईड’ खूप शिकवून जाणार असं वाटतंय.

एकदा दुरूनच संबंध आला होता, आणि तेंव्हा आपल्याच बाजूच्या वकिलाकडून कोर्टात उभी केलेली केस ऐकून गार पडले होते - त्यात विनाकारण घुसडलेलं खोटंच एवढं होतं, की आपण वेगळाच खटला ऐकतोय असं वाटावं.

हेरंब said...

>> "तुमचे वडील गेले ह्यात मी काहीही करू शकत नाही."

हे असलं बोलणारे लोकं फक्त सिनेमात असावेत असा माझा समज होता :(

म्हणूनच कोर्टाच्या पायरीची एवढी भीती बसली असावी सामान्यांच्या मनात !!

रोहन... said...

मागे तुझ्याकडून कुठल्यातरी पोस्टमध्ये लिहिले गेले होते.. तेंव्हा अंदाज आला होता.. आता सविस्तर समजेल... तापच आहे ना.
पण जास्त भाग करू नकोस... हवंतर मोठे भाग टाक..

आणि हो फक्त अनुभव कथन न करता जरा माहिती पण दे.. म्हणजे न जाणो कोणावर ही अशी वेळ आलीच तर त्याला तुझ्यासारखे असंख्य प्रश्न पडणार नाहीत... :) काय!!!

Shriraj said...

हं...एक नवीन धडा का? येऊ दे, येऊ दे... तुझ्याकडून चार गोष्टी शिकायला मी आनंदाने तयार असतोच!! :D

Raindrop said...

anagha tu mhanje ek encyclopediach aahes...he court visheshaank parts madhe aslyanne me tak laaoon wait karat aahe...part two ...paayri 2 chi.....

Anagha said...

प्रिया, मी ना मुद्दाम ही पोस्ट भागांमध्ये विभागालेय. म्हणजे समजायला पण सोप्पी जाईल. :) आज बसून लिहिते पुढील भाग.

लोकं अशी का बनतात कोण जाणे. जन्माला येतात तेव्हा तर अशी नसणार..नाही का ? मग काय त्यांचा पेशा त्यांना असे बनवतो ? असे म्हणावे तर खूप चांगले वकील देखील बघितलेत आयुष्यात. :)

Anagha said...

नकोच यायला कधी गौरी ! :)

:) हे प्रकार खूप बघितले गं....काय वाट्टेल ते उभे करू शकतात हे वकील !

Anagha said...

हेरंब, आहे खरी भीतीदायक कोर्टाची पायरी...परंतु, चांगल्या वकिलांचा सल्ला व आपला धीर ह्या दोन गोष्टी नाही सोडल्या तर न्यायाची अपेक्षा आपण सामान्य माणसे ठेवू शकतो... :)

Anagha said...

तो मला वाटतं दुसरा खटला आहे रोहणा ! :)

माहिती देणारच आहे...सामान्य माणसाच्या दृष्टीकोनातून....तर ती क्लिष्ट व भीतीदायक माहिती थोडी सोपी व आशादायक होईल ही अपेक्षा. :)

धन्यवाद रे ह्या कायम पाठिंब्याकरीता ! :)

Anagha said...

श्रीराज ! :D आभार हं !

Anagha said...

Encyclopedia !! वंदू ! :D

लिहिते लिहिते...आज पुढचा भाग लिहिते ! :)

रोहन... said...

दुसरा खटला.... अरे बापरे... ते म्हाडा का काय ते अजून वेगळे हाये काय... तुला साक्षात दंडवत...

भानस said...

लोकं किती स्वार्थी,निष्ठूर असतात. खरेच बरेचदा ही असली वाक्ये केवळ सिनेमातच असतात असा आपला समज असतो.

अनघे, वाचतेय पुढचेही...

Anagha said...

:D रोहणा काही विचारू नकोस ! एकातून बाहेर येते ना येते ना...तेव्हढ्यात मी दुसऱ्या कशात तरी अडकलेले असते ! :)

Anagha said...

भाग्यश्री, तू असं मध्ये वाचलं नाहीस ना की मला तुझीच चिंता वाटायला लागते ! वाटतं कुठे आहेस तू...काय चाललंय तुझं ! तुम्ही लोकं ही अशी दूर रहाता ना...की काही कधी मदत पण नाही करू शकत...आमच्या बहिणाबाई आहेत ना असा लढा देत ! :)

BinaryBandya™ said...

कसली कसली भंगार लोक असतात जगात :(

सौरभ said...

भिडे काकांचा फोन नंबर मिळेल का... अश्या थोर व्यक्तिंना भिडावं... i mean भेटावं म्हणतो... :D :)

Anagha said...

:) बंड्या, पितळासमोर सोनं धरलं तर सोनं अधिक झळाळून उठतं न...म्हणून ह्या अश्या भंगार लोकांची पण गरज असते बहुधा...समाजाला...तेव्हाच कुठे आपल्याला सज्जन माणसांचं महत्त्व कळतं...हो ना ? :)

Anagha said...

आहे ! देते तुला...! :)
सौरभा..तुझं हे शब्दकौशल्य ना मला हसवून सोडतं !