नमस्कार

नमस्कार

Pages

Thursday 12 May 2011

जोडगोळी

रोज सकाळ होते. कामाच्या यादीची चढती भाजणी, उतरती करण्याची एक धडपड सुरु होते. आणि थोड्याच वेळात घड्याळात सात वाचून चाळीस मिनिटे होतात. भिंतीवरचे घड्याळ जसे काही त्याचीच वाट पहात असते. माझ्यासारखीच. कारण बरोबर त्याच वेळी आमच्या दारी एक जोडपं उभं रहातं. भल्यामोठ्या खिडक्या ही माझी घरातील सर्वात लाडकी गोष्ट. मनमोकळं...हवेला अटकाव नसलेलं हे माझं घर. खिडक्यांच्या पलीकडे लावलेली रोपे. कामाच्या यादीत, त्यांची तहान भागवणे हे देखील असतेच. एक छानसी निळ्यागार रंगाची झारी घेऊन मी दिवाणखाना ते शयनगृह अशी फेरी मारते. व माझी हिरवीगार रोपे अंघोळ करून दिवसाची सुरुवात, प्रसन्न मनाने करतात. मात्र झारीचा फवारा काही फक्त झाडांना स्नान नाही घालत. त्याचबरोबर माझे खिडकीचे गज ही धुवून निघतात. रोज. हे काम झालं की मात्र खिडकीबाहेर एक अतिशय नयनरम्य चित्र तयार होतं. हिरवी रोपं, काळे गज व त्या सर्वांवर लगडलेले अगणित पाणीदार हिरे. अप्रतिम. इथे थेंब...तिथे थेंब...असंख्य थेंब माळा...चमचमत्या. नित्य नव्या नित्य नवख्या. स्वत:वर खुष होण्याची माझी खोड जित्याची आहे. त्यामुळे ही अशी मी रोज स्वत:वर खुष होते...झारी तिच्या जागी ठेवते व पुढील कामास लागते. कामे असतात इथेतिथे. कधी स्वयंपाकघरात तर कधी दिवाणखान्यात. पण मी जिथे असेन तिथून मला हाळी घालण्यात येते. नुसता चिवचिवाट करून. दोन चिमुकले जीव. इतुके चिमुकले की ओंजळीत मावावे. दोघे दोघे. हे जे पानांवर, गजांवर थेंब झुलत असतात ते टिपून घ्याव्या हे जोडपे रोज हटकून हजेरी लावून जाते. आणि किती ती धावपळ...किती ती धांदल. इथे उड्या तिथे उड्या. दोघे दोघे. कधीकधी माझी वृत्ती फारशी अभ्यासू नसल्याचे मला बरेच वाटते. कारण त्यामुळे प्रत्येक गोष्टीचे शास्त्रीय कारण काही माझ्यापुढे येत नाही. निष्पाप जोडगोळी. मग हे पक्षी कोण, ते कुठून आले आहेत व त्यांच्या सवयी काय आहेत ह्याचा मला मागमुस देखील नसतो. ते दोघे हमखास रोज येतात...उड्या मारत...हिरे टिपत...तहान भागवत...आणि मी हसते. बस्स. इतकंच.

काल त्यांना न्याहाळताना अशीच काही जुनी आठवण येऊन गेली...जोडगोळीची.

लग्न नुकतंच झालेलं होतं. हाताशी घरदार काहीच नव्हतं. मग कोणी त्यांचं कुठलं न वापरात असलेलं घर आम्हांला देऊ करत व आम्ही काही दिवस तिथे बस्तान करू. घरून निघताना जी एक बॅग घेऊन निघाले होते तीच बॅग त्यात्या घरात कुठे कोपऱ्यात जाऊन बसत असे. परवानगी असेल तर स्टोव्हवर माझे चुकतमाकत जेवण प्रयोग सुरु होत असत. असेच काही महिने गेले. नवऱ्याच्या एका मित्राने डोंबिवली पश्चिमेला एक घर नोंदवून ठेवलं होतं. तो स्वत: रहात असे भायखळ्याला. आमच्या नशिबाने त्यावेळी त्याला त्या घराचा ताबा मिळाला. व आम्हांला काही महिन्यासाठी का होईना पण एक पक्कं घर मिळालं. फक्त आता घर होतं परंतु भांडीकुंडी नव्हती. सकाळी आम्ही दोघेही आपापल्या उद्योगधंद्यासाठी मुंबईत येत असू व रात्री उशिराच परतत असू. त्या काळी फोन वगैरे काही प्रकार नव्हतेच. फक्त ट्रेनच्या घड्याळावर आमचे घड्याळ बसत असे. म्हणजे मी इतक्या वाजताची ट्रेन पकडेन, तू किती वाजताची पकडशील...हा असाच संवाद...रोजचा. त्या दिवशी मी ट्रेन मधून उतरले तर नवरा व त्याचा जिवलग मित्र स्टेशनावर उभे. मला ह्या ट्रेनच्या प्रवासाची नसलेली सवय...म्हणून दोघे मला घ्यायला फलाटावर हजर झाले होते. दोघे हसत होते. खुशीत दिसत होते. आम्ही तिघेही तिथून निघालो. घराच्या दिशेने चालू लागलो. गोपी टॉकीजजवळ. त्यावेळी मोठा सुनसान परिसर. नवीनच झालेल्या इमारतीत आम्ही दोघेच काय ते रहिवासी. कामाच्या निमित्ताने नवरा कायम उशिराच घरी परतणार. म्हणजे वीज गेली की त्या अख्ख्या इमारतीत भुतासारखी मी ! आणि वीज जाणे ह्या डोंबिवलीत नेहेमीच होणाऱ्या प्रकाराची मला मुळातच तेव्हा सवय नव्हती. त्यामुळे सुरवातीला मला वाटले की आता आपण एकटेच आहोत तर दार तरी उघडे ठेवावयास हवे...म्हणजे कोणी असेल तर आपल्यालाच सोबतबिबत...काही वेड्या समजुती. ह्याला हा माझा काळोखात दार उघडं टाकून बसायचा प्रकार कळला तर तो हादरलाच ! चांगला ओरडा खाल्ला मग मी... "अगं, पण सगळा अंधार आहे, तर तू गपचूप दार बंद करून आत शांतपणे बसशील की दार सताड उघडं टाकून बसशील ?" आता वाटतो खरा हा मूर्खपणा...पण तेव्हा तेच बरोबर वाटलं होतं खरं... असो. ह्यालाच विषयांतर म्हणतात ! तर आम्ही तिघे घरी पोचलो. आणि काय सांगावे ? त्या दिवशी नेमका हा लवकर घरी पोचला होता व दोघा मित्रांनी बाजारात जाऊन आमच्यासाठी भांडीकुंडी खरेदी केली होती. म्हणजे वेगवेगळ्या आकाराची तपेली, चमचे, पळ्या वगैरे वगैरे. पुरुषांच्या बुद्धीला झेपेल तेव्हढे त्या दोघांनी खरेदी केले होते. आता पाळी होती माझी. एकदम आनंदी भावना चेहेऱ्यावर आणायची. म्हणजे व्वा व्वा. कित्ती छान. हे भांडं किती सुंदर, स्टील किती जाड इत्यादी इत्यादी. पण नाही जमले ते मला. मन खट्टू होऊन गेले. ते एका कोपऱ्यात रुसून बसले. माझ्या संसारातील ती पहिली खरेदी. मला ती त्याच्याबरोबर एकटीने करायची होती. म्हणजे कसं, तो आणि मी. हे भांडं बघ, हा चमचा बघ...हे ताट तुला आवडेल का आणि पेला किती सुंदर आहे, नाही का...हे असे दोघादोघांचे संवाद...सगळंच बालिश वाटतंय, नाही का ? त्या दोघांनी चांगल्या बुद्धीने गोष्ट केली होती...आता मला खोटं का होईना आनंदी होणं भाग होतं....माझं मन एकटं...त्यांची ने दुकटी...

आज लवकर उठून रोपांना अंघोळ घातली...टपोरे हिरे तयार झाले....परंतु, किलबिल आज फार क्षीण ऐकू आली...मी हळूच खिडकीत उभी राहिले...चिमुकला पक्षी एकटाच होता...एकदोन हिरे त्याने टिपले..इथे तिथे झोके घेतले...आणि तो चिमणा जीव उडून गेला...

22 comments:

रोहन... said...

ऐ.. आमच्याकडे खूप चिमण्या येतात.. सकाळीच नाही तर दिवस नुसता धिंगाणा असतो.. मज्जा येते.. ते भांडी प्रकरण भारी... शामिकाने सुद्धा मी कामावर असताना तिच्या आईबरोबर भांडी खरेदी केली होती... खरेतर तिला माझ्याबरोबर करायची होती.. मग मी सुट्टीवर आल्यावर अजून खरेदी... तिला काय मज्जाच... खास दादरला कबुतर खान्याजवळ..

शेवटी 'अनघा टच' दिलासच... :( मी कट्टी जा...

हेरंब said...

चक्क भांड्यांची खरेदी !! मानलं शरदबुवांना..

मला तर साधं कपड्यांचं शॉपिंगही नकोसं होतं ;)

Anagha said...

त्याचीच बाजू घेतलीस ना तू हेरंबा ! असेच असतात पुरुष ! एकमेकांचीच बाजू घेतात ! :)

Anagha said...

रोहणा, अनघा टच ! :) हम्म्म्म. ते काही मला ठरवता येत नाही....आज सकाळी लिहायला घेतलं त्यावेळी त्या जोडगोळीची वेळ झालीच होती....पण आज का कोण जाणे एकच हळूच आवाज करून गेला.. :(
मी वाट बघतेय उद्याची....येईल ती जोडगोळी परत नेहेमीसारखी ! :)

Aakash said...

:)

Gouri said...

लग्न करायचं ठरवल्यावर आम्ही जोडीने केलेली खरेदी, त्याचं जोरदार प्लॅनिंग आठवलं :)

BinaryBandya™ said...

स्वत:वर खुष होण्याची माझी खोड जित्याची आहे.
चांगली खोड आहे :)

पुरुषांच्या बुद्धीला झेपेल तेव्हढे त्या दोघांनी खरेदी केले होते :D

चिमुकला पक्षी एकटाच होता.. :(:(

Raindrop said...

chotya chhotya goshti kitti mean kartaat na...

हेरंब said...

जाउदे.. ब्लॉगरच्या भरोश्यावर राहिलो तर प्रतिक्रिया द्यायची राहूनच जाईल. जुनी प्रतिक्रिया माझ्या लक्षात आहे म्हणून तशीच्या तशी देतोय पुन्हा.

बापरे.. चक्क भांड्यांचं शॉपिंग ?? मानलं शरदबुवांना..

मला तर साध्या कपड्यांच्या शॉपिंगचाही कंटाळा येतो !!!

Anagha said...

आकाशबुवा, का बरं हसताय गालातल्या गालात ? :)

Anagha said...

:) हो ना गौरी ! किती छोट्या मोठ्या गोष्टी ! आणि किती ते प्लानिंग ! आभार गं !

Anagha said...

बंड्या, सगळीच मिसळ झालीय वाटतं माझी ह्या पोस्टीत ! :) हसू आणि आसू ! :)

Anagha said...

अगदी अगदी गं वंदू ! :)

Anagha said...

हेरंबा ! :) हा तुझा माझ्या लिखाणाला असलेला पाठिंबा मी कधीही विसरणार नाही ! खरोखर ! :)

आणि बघ बघ...शेवटी पुरुष पुरुषांचीच बाजू घेतात ! शरदचीच बाजू घेतोयस ना तू ?! :D

Shriraj said...

तुझा हा लेख मला अत्यंत जवळचा वाटतोय... नवीन नवीन लग्न झालेलं वगैरे वगैरे. शेवट वाचून मन कासावीस झाले.

Anagha said...

हं...तुझीही अशी खरेदी चालू असेल नाही का श्रीराज...? काडी काडी जमवणे.. ? चालू दे चालू दे.... :)

अपर्णा said...

अग तेव्हा उठसुठ त्याच्याबरोबर जायचं आता मुलं झाली की कसे वेगळे वेगळे पळत सारी काम पूर्ण करायचा भोज्जा केल्यासारखी करतोय हे आठवतेय....

Anagha said...

हो ग ! अगदी खरं अपर्णा ! त्या त्या वेळी ती ती गंमत असते पण..नाही का ? :)

भानस said...

शंभर टक्के पटेश. रुसण्यासारखेच आहे हे. पण शरदचीही तुला खुश करण्याची धडपड जाणवली गं.

खरे तर छोटीछोट्या गोष्टीतून बायकांना किती आनंद मिळतो हे पुरषांना बरेचदा उमगत नाही म्हणून थोडासा गोंधळ होतो... :)

शिवाय हे असे मागे वळून पाहतानांही पुन्हा एकदा त्यातले सुखं तितक्याच आवेगाने व समरसून घेण्याचा आपला आवडता छंद... नेमके त्याचे गणितही कोलमडते.

Anagha said...

हो ना भाग्यश्री ? असं वाटतंच ना की आनंद काही सोनेनाणी...कपडेलत्ते ह्यात नसतात दडलेले...पण ह्या अश्या छोटया छोटया गोष्टी मात्र अगदी आयुष्यभर आनंदात ठेवू शकतात आपल्याला...नाही का ?

आपण फारच मागे वळून बघतो ना आणि ?! आणि मग पुढे ठेचाळतो !! :) :)

सौरभ said...

असं नाय बाबा.. चिटींग आहे ही... एक तर एवढी सगळी मेहनत करायची आणि वर "" असा शिक्का मारुन घ्यायचा... नाही काम केलं तरी दुसऱ्या बाजूने बोलायचं... असो... मज्जा तो उसमेंभी होती है...

आकाशने सकाळी ८ वाजता हा लेख वाचून अगदी भारावून जाऊन फोन केला होता. म्हणाला मला काय प्रतिक्रिया द्यायची तेच नाही सम्जत्ये... म्हणून नुसतिच स्मायली टाकून आलो... :) :D

Anagha said...

सौरभ...तू पण शरदचीच बाजू घेतोयस ना ?! बघू बघू ! तुझ्यासाठी तर घोडा मैदान जवळच आहे ! नाही का ?

म्हणून आकाशाने स्मायली टाकली होती काय ? मी म्हणतेय की का बरं हा हसतोय...गालातल्या गालात ! :D