नमस्कार

नमस्कार

Pages

Wednesday 20 April 2011

Death toll

साधना सात. मी पाच.
"सकाळी साधना गेली." आई बाबांना सांगत होती.
"गेली म्हणजे ?" मी विचारलं.
"गेली म्हणजे ती देवाघरी गेली."
"अशी कशी गेली ? ती माझी मैत्रीण आहे. "
साधनाला कावीळ झाली. आणि काविळीने मरतात. माणसे देवाघरी जातात आणि मग ती आपल्याला परत दिसत नाहीत. मी दिवाणखान्यातील कोचावर उपडी पडले. आता आज शाळेत नाही जाता कामा. माझी मैत्रीण देवाघरी गेली. मला रडू यायला हवे. आईने बखोट धरून उचललं. तयार केलं. ती ऑफिसला गेली. माझी शाळेची बस आली. मी शाळेत गेले.

पुढल्या वर्षी.
"आपली आजी चांदणी झाली." मला प्रज्ञा म्हणाली. प्रज्ञा. माझी मावसबहीण. माझ्यापेक्षा एक वर्षाने मोठी.
"चांदणी झाली? म्हणजे?"
"म्हणजे आजी आता परत आपल्याला दिसणार नाही. वर बघ. ती...ती चांदणी दिसतेय ना....ती नवीन आहे....म्हणजे ती आपली आजी आहे."
मी वर बघितलं. असंख्य चांदण्यातील एक चांदणी मनात धरली. ती माझी आजी झाली.

पुढे आई बाबांचे ओळखीचे पाळखीचे मरत राहिले. आई बाबा त्यांच्या माणसांना भेटायला जात राहिले. घरी परतल्यावर अंघोळ करायचे.

एक दिवस बाबा गेले. डॉक्टरांनी सांगितलं नाही. बाबा आता जाणार म्हणून. मग बाबा घरी आले. खूप माणसं जमली. एक फोन वाजला. मी उचलला. समोरचा म्हणाला बॉडी कधी नेणार ? माझे बाबा एका क्षणात बॉडी झाले.
स्मशानभूमीत गेले. बाबांच्या आम्ही तिघी मुली. मी मोठी. विधी करायला मी बसले. पहिला प्रश्न भटजींचा. "गण ?"
"म्हणजे ?"
"तुमचा गण कोणता ?"
"मला नाही माहित."
"नाही माहित ? ठीक. मग तुमचा गण राक्षस."
बाबांचा गण राक्षस ठरला.
विधी पार पाडले. डोक्यावर पाण्याचं मडकं. त्या गोल चकरा. मडक्यातून खाली अंगावर उडणारं पाणी. आणि मडकं जमिनीवर मुद्दाम फोडून केलेला तो आवाज.
बधीर. मन बधीर.

गेल्या वर्षी. वर्षाची सुरुवात. परगावी असलेला नवरा अकस्मात फोन घेईनासा झाला. चार दिवसांनी तेथील मित्राने सांगितलं...वो खलास हो गया. प्रगत समाजात वावरणारं मन, मध्यमवर्गीय. मंगळसूत्र, लाल, पिवळा, हिरवा रंगांशी संबंध संपला.
वर्ष थोडं पुढे सरकलं. चार पाच वर्षांनी मोठी असलेली सख्खी मावसबहीण गेली. नाशकातील एक घर, माझ्यासाठी बंद झालं.
वर्ष अजून थोडं पुढे सरकलं. सख्खी मोठी मामेबहीण गेली. मी जिला ताई म्हणत होते, अशी एक बहिण गेली.

हे वर्ष सुरू झालं.
मैत्रिणीचा नवरा गेला. जाऊन तिच्या खांद्यावर हात ठेवला. "तू तर ह्यातून गेलीयस !" ती म्हणाली.
वर्ष थोडं पुढे सरकलं.
वाशा गेली. कामवाली नाही. माझी जणू धाकटी बहिण गेली. तिच्या जवळ गेले. "खूप केलंस गं बयो तिचं." तिची सासू म्हणाली.
गेल्या महिन्यात आईची मैत्रीण गेली. आईच्या मैत्रिणी ह्या मावश्या असतात.

हे चक्र साधनाने सुरू केलं.

मग काल माझी सख्खी मैत्रीण गेली.
मी गेले. तिच्या नवऱ्यासमोर उभी राहिले.
"Gone. Your friend has gone. She wanted you to see her newly bought, newly decorated house. Each and every piece here..she's picked it up...everything. You never turned up ! See it now ! Go...Have a look ! That 's her bedroom !"
....Ann ! When are you coming home ya ? Years passed. You didn't bother to come home !.....
"Goregaon ya ! Isn't it far away from Dadar ?"
"Ya ya ! You, bloody Towny !"
मी हसत असे. तिला चिडवत असे. ती मला ओळखत होती. माझ्या आवाक्याबाहेरचं घड्याळ तिच्या परिचयाचं होतं. मी काल पहिल्यांदा पोचले. घरभर स्वत:चे हसते खेळते फोटो लावून ठेवणाऱ्या, आयुष्यावर मनापासून प्रेम करणाऱ्या प्राचीचं घर.

"आई, अर्ध वर्ष नाही संपलं आणि आपला death toll बघ !" लेक सकाळी म्हणाली.

...त्याचा फास कोणाच्या गळ्यात पडणार आहे...असतं का त्याला माहित ?

रोजची एक जॉब लिस्ट सकाळी माझ्या डोक्यात असते. म्हणजे क्लायंट वाईज काय आणि किती काम आज संपवायचे आहे हे सकाळी डोक्यात तर चालू असतं...

मी त्याची क्लायंट.
आणि एकेक कामं संपवत चाललेला 'तो'.

29 comments:

Raindrop said...

hya highway war pravaas karayacha toll amha saglyannach bharayala lagnaar aahe....rasta jitka changla, toll tyawadhach jasta.... unfortunately this time he added more counters to the path you were on....cost you your mates :(
your loss is His gain. He is selfish at times :(

हेरंब said...

काय प्रतिक्रिया देऊ? :(

Raj said...

वाचून एम्मा थॉम्पसनचा 'विट' हा चित्रपट आठवला.

http://youtu.be/ND1-r3beO6k

Deepak Parulekar said...

Death Cannot Stop True Love, All It Does Is Delay A Little Bit!!

That's All. :(

Suhas Diwakar Zele said...

:(

BinaryBandya™ said...

एकेक कामं संपवत चाललेला 'तो' :(:(

Gouri said...

काय लिहू?

जाणारे जातात, मागे राहणार्‍यांना चटका लावून.

हे सगळं अनुभवल्यावर आपण अमरपट्टा घेऊनच अवतरलो आहोत अश्या अविर्भावात पुन्हा रूटीनमध्ये मन कसं रमवायचं?

Anagha said...

rasta jitka changla, toll tyawadhach jasta....

चांगला आणि वाईट...ह्या गोष्टी सापेक्ष गं वंदू.

Anagha said...

हेरंबा, काही नाही बोललास तरी मला माहितेय...मला बळ देणारे तुम्हींच सगळे आहात.

Anagha said...

राज...

Anagha said...

दीपक, मृत्यू ही एक न टाळता येणारी गोष्ट आहे....मला माहितेय....
पण तो माझा स्वत:चा मृत्यू.....आणि माझा त्याच दिशेने चालणारा प्रवास.
ही जवळच्या माणसांची वाढती यादी जीवघेणी.

Anagha said...

सुहास...

Anagha said...

मला खूप जड जातंय....गौरी...हृदय जड झालंय....

Pankaj - भटकंती Unlimited said...

काय लिहू, काय बोलू. बाबा अचानक गेले तेव्हा असंच काहीसं झालं होतं. आदल्या रात्री माझ्याकडून खूप फोटो काढून घेतले, मित्राच्या आणलेल्या उसन्या कॅमेरानं. आणि... पुढल्या सकाळी अचानक घाला. ते फोटोच शेवटची आठवण. कदाचित तीच गोष्ट माझ्या फोटोग्राफीच्या जगात घेऊन आली आहे.

Anonymous said...

तुझ्या ब्लॉगवर असलेले हिमालयाचे चित्र तुझ्या स्वभावाला समर्पक वाटते... खंबीरपणे उभी असलेली आजच्या पिढीतली स्त्री

Anagha said...

पंकज, ही जीवघेणी वळणं आयुष्याची....म्हणे काळ हे उत्तर असतं....पण एकेक घटना घडतंच रहाणार...ह्याचा अर्थ एका घटनेतून सावरता सावरता...

Anagha said...

प्रिया...

Hemant Adarkar said...

Anagha, have you ever come across a real road that is one-way with a dead-end? That is life. सारे प्रवासी घडीचे!

Anagha said...

हो. हेमंत, ह्याची जाणीव आहे. हा 'डेड एंड' रस्ता चालायचाच आहे. फक्त आपल्या जवळच्या माणसांचा हा 'डेड एंड' रस्ता इतका तोकडा असेल ह्याची कल्पना नसते...किंवा त्याला तयारी नसते. माझा स्वत:चा रस्ता तोकडा असल्यास माझी नाही काही त्याला हरकत.

Shriraj said...

अनघा, शब्द खुंटले आहेत.
एवढेच म्हणेन.....
जन्म-मरणाचे तिढे कुणाला चुकलेत?

Anagha said...

खरं आहे श्रीराज....

सौरभ said...

सहवासाचा शेवट विरहात असतो - व्यासपर्व

so relax...

Anagha said...

सौरभ, झालं वाटतं व्यासपर्व वाचून ? :)

रोहन... said...

मी शक्यतो अश्या पोस्टवर प्रतिक्रिया द्यायची टाळतो...
देता येत नाही म्हणून नव्हे तर द्यायची नाही म्हणूनच... समजून घे.. :)

Anagha said...

घेतलं घेतलं...रोहणा, समजून घेतलं.... :)
नेहेमीच हसता नाही येत....कारण सुख आणि दु:ख हे दोन्ही खरंखुरं जगता येतं...त्यामुळे मग अशी पोस्ट येते अधूनमधून. :)

THEPROPHET said...

स्वतःशीच केलेल्या अशा संवादांमध्ये कमेंट काय देणार! :D

Anagha said...

विद्याधर...काळ हे उत्तर असते ना...काळाने थोडी उसंत दिली तर बरं होईल...नाही का ?

Anonymous said...

मी त्याची क्लायंट.
आणि एकेक कामं संपवत चाललेला 'तो'.


शिट...
हादरवलं या जाणिवेने...

Anagha said...

आल्हाद...

आभार प्रतिक्रियेबद्दल...