नमस्कार

नमस्कार

Pages

Monday 18 April 2011

आठवण...

मित्र एकत्र यावे. शिरस्त्याप्रमाणे. गप्पा व्हाव्या. आणि त्या गप्पांमधून एक अतिशय सुंदर कल्पना जन्म घ्यावी. अडचणींना शरण न जाता, मग त्या मित्रांनी आपली ती सुंदर कल्पना प्रत्यक्षात आणावी. निर्मितीचा आनंद काय वर्णावा ?
कोण होते हे मित्र ? आणि कोणती त्यांची निर्मिती ?
पद्माकर महाजन. स्टेट बँकेचे अधिकारी.
दिनकर बरवे. ग्रंथपाल, किर्ती कॉलेज.
रमेश तेंडुलकर. कवी व मराठी प्राध्यापक, किर्ती कॉलेज.
प्राध्यापक राम पटवर्धन.
एकनाथ साखळकर, (त्यावेळी उपप्राचार्य. किर्ती कॉलेज.)
पद्मा सहस्त्रबुद्धे. चित्रकर्ती....

आणि त्यांची निर्मिती ?
'आठवणीतल्या कविता'...चार भाग.



पहिल्या भागाच्या प्रस्तावनेच्या अखेरीस प्रा. रमेश तेंडुलकर म्हणतात....

'कविताच नव्हेत, जुन्या क्रमिक पुस्तकांतील काही गद्य वेचेही आपल्या आठवणीत असेच राहिलेले असतात - 'दिनूचं बिल', 'म्हातारा आणि त्याचा बैल', 'लांडगा आणि कोकरू' अशा कितीतरी कथा सांगता येतील. उद्या त्यांचंही संकलन करायची योजना कुणी आखील - काय सांगावं, हा उत्साह असाच कायम राहिला तर कदाचित आम्हीही घे संकलन उद्या करू...खरं तर 'आठवणी'चं वर्तुळ कितीतरी अंगांनी मोठं, मोठं करता येण्यासारखं आहे...त्यात कितीतरी अन्य विषयांचाही समावेश होऊ शकेल.
तूर्त अननुभवातूनच चाललेला हा प्रवास फक्त कवितांपुरताच मर्यादित केला आहे.
यानिमित्ताने आधी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात आम्ही म्हटल्याप्रमाणे "हा एक मुक्त खजिना आहे, - प्रत्येक वाचकाच्या हृदयकोषात गुप्तपणे दडून राहिलेला...अधिकाधिक रसिकांपर्यंत पोचून त्यांचाच हा मुक्त खजिना त्यांनाच सुपूर्द करण्याचा आनंद आम्हांला लुटायचा आहे."
अशा प्रसंगी-
सोने लुटुनी सांयकाळी मोरू परतुनि आला
बहीण काशी दारी येउनी ओवाळी मग त्याला
दसरा सण मोठा - नाही आनंदा तोटा !
ह्या साकीची आठवण हटकून झाल्याखेरीज कशी रहाणार ?
'नाही आनंदा तोटा',...'नाही आनंदा तोटा'...अशा तल्लीन वृत्तीने या 'आनंदाच्या डोही' यथेच्छ डुंबल्याचा आनंद आपणास मिळाला तर त्या आनंदासाठी या कार्यात 'तोटा' झाला तरी तो 'आनंदाने' सोसण्यात - नव्हे, स्वीकारण्यातही - आम्हाला धन्यताच वाटेल !
रमेश तेंडुलकर
मुंबई
ललितापंचमी
बुधवार ४ ऑक्टोबर १९८९.

हे नक्की की प्रत्येकाच्या आठवणीतील कविता ह्या वेगवेगळ्या असतात...पिढी दर पिढी आपली बालभारती बदलली व आपल्या आठवणी वेगवेगळ्या झाल्या.
आज जर हा खजिना आपल्या हाती लागला तर त्यात कधी आपली आठवण सापडते तर कधी आजी आजोबांनी सांगितलेली त्यांची आठवण सापडते.
आनंद ? अतोनात !

आता ह्या १९८९ साली प्रसिद्ध झालेल्या चार भागांच्या प्रती माझ्याकडे कश्या आल्या ? तर बाबा. हे सगळे बाबांचे जीवाभावाचे मित्र. आणि म्हणून बाबांचा त्यात सहभाग.
आता ह्या प्रती उपलब्ध आहेत का ? बहुतेक नसाव्यात. मग मी हे सगळं तुम्हांला सांगून उपयोग काय ? 'आनंदाच्या डोही' यथेच्छ डुंबल्याचा आनंद एकटीनेच घेणे बरोबर आहे का ? नाही.... म्हणून !
आणि मराठी भाषा मरत आहे अशी बोंबाबोंब करत बसण्यापेक्षा, हे एक ध्येय डोक्यात घेऊन एका पिढीने जी अतोनात मेहेनत केली, त्यातून आपण काही स्फूर्ती घेऊ शकलो तर का नाही....म्हणून...!
:)

24 comments:

Gouri said...

आईकडे पण आहेत बरं ‘आठवणीतल्या कविता’ ... आणि त्या नक्की १९८९ नंतर घेतलेल्या आहेत. बहुतेक दुसरी आवृत्ती असावी. सुंदर संकलन आहे.

Anagha said...

खरोखर ! अगं, आधी नोंदणी करून हे संच वाचकांनी घेतले होते....बघितलेयस ना तू ? मस्त आहेत ना ?! :)

Suhas Diwakar Zele said...

वाह..माझ्या गावी हा संच होता मामाकडे. मागवावा लागणार असा दिसतंय, बर् झालं तु आठवण करून दिलीस :)

विनायक पंडित said...

अप्रतिम आहेत! ज्याच्याजवळ नाहीत त्याला चुटपुट!:)

R.G.Jadhav said...

माझ्या सन्ग्रही ही पुस्तक आहेत. फ़ारच छान आहेत आठ्वणितल्या कविता परत परत वाचत्ताना वेळ कसा जातो समजत नाही.

Anagha said...

सुहास, मामाच्या गावाला जाऊ या...
आठवणीतल्या कविता वाचू या ! :p

Anagha said...

अगदी बरोबर विनायक....
म्हणजे कसं...
ज्याच्याकडे नाहीत त्याला 'टुक टुक' !
:p

Anagha said...

जाधव साहेब, अगदी अगदी ! किती मोठं काम केलं आहे ह्या सर्व मित्रांनी. नाही का ?
प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद. :)

हेरंब said...

मस्तच...


शेवटचा परिच्छेद खूप आवडला !

Anagha said...

:) हेरंबा, कस्सलं काम केलंय अरे त्यांनी ! अभिमान अभिमान....आणि हे सर्व संसार सांभाळून ! :)

Shriraj said...

मी घेईन ही पुस्तकं :)

अपर्णा said...

ज्यांच्याकडे नाहीत त्यांच्यासाठी तू वाचून अपलोड कर न...की त्यातले काही तुझ्याकडे येऊन वाचू शकतात??

श्रद्धा said...

मला आठवतय जेव्हा पहिला भाग हातात पडला, तेव्हाच मी 'उरलेले भाग दुकानात येताक्षणी मला कळवा बरं का...', असं दुकानदाराला वारंवार विनवलं होतं.

आजही कुठलाही भाग हातात घेतला की "अरे हो! ही कविता होती की आम्हाला..." असं म्हणून कविता आपल्याच चालीत/नादात न म्हणणारा वाचक मला भेटायचाय. :)

या सगळ्या कविता संग्रहीत करून उपलब्ध करून दिल्याबद्दल मी या सगळ्या (सुरुवातीला उल्लेखलेल्या) मित्र-मंडळीची आजन्म उपकृत राहीन.

@अनघा: शेवटचा परिच्छेद खरच योग्य समारोप आहे या पोस्टचा! keep it up!

@अपर्णा: या पुस्तकाच्या अजुनही आवृत्या निघतात. खर तर किमान अशा पुस्तकाची तरी इ-प्रत कुणी scan+अपलोड करून काढू नये, असे मला वाटते. प्रकाशकाला आणि या मागील मेहनत घेतली त्यांना त्याचे चीज मिळालेच पाहिजे, नाही का?

Anagha said...

मिळाली तर नक्की घे श्रीराज. :)

Anagha said...

हो हो ! माझ्याकडे येऊ शकता ! अपर्णा, ही कल्पना छान ! म्हणजे मला मस्त कवितावाचन करून दाखवता येईल ! मी माझ्या धाकट्या बहिणींना विंदां च्या कविता वाचून दाखवत असे ! :p

Anagha said...

अरे व्वा ! निघतायत का ह्याच्या प्रती ? मस्तच की गं मग श्रद्धा ! :)

माझा कवितावाचनाचा चान्स गेला ! :p

श्रद्धा, धन्यवाद ! :)

अपर्णा said...

@श्रद्धा, माझी कमेंट ती पुस्तक कुठे मिळणार नाहीत असं समजून टाकली होती..नाहीतर कुठल्याही कलाकृतीचा कलाकार आणि त्यामागची मेहनत करणार्यांना त्याचा मोबदला मिळायला हवा हे मलाही पटतय...मी पुढच्या मायदेश दौऱ्यात नक्की शोधेन...

नाहीच मिळाली तर अनघा तू आहेसच न ग..:)आणि कविता वाचनाचा चान्स असंही घेऊ शकतेस असं मलातरी वाटत...

Anagha said...

:D मायदेशी आलीस की कळव गं अपर्णा ! मग करतेच मी मटण महोत्सव आणि कविता वाचनाचा कार्यक्रम !

सौरभ said...

वाह वाह!!! पुस्तकं उपलब्ध नसतिल तर ह्यांना पुनःर्प्रकाशित करु... कसे??? :)

Anagha said...

अगदी अगदी सौरभ ! अनुभव आहेच आता आपल्या हाताशी ! :p

रोहन... said...

आता एक दिवस तुझ्याकडे यावेच म्हणतो... :) कित्ती पुस्तके असतील नाही... मी पण माझ्याकडची काही पुस्तके घेऊन येईन... :) तुला आवडतात का ऐतिहासिक पुस्तके?

Anagha said...

तरी अरे रोहन, बाबांची ४८०० पुस्तकं मुंबई युनिव्हर्सिटीला दिली आम्ही. त्यामुळे आता काही म्हणावी तशी नाही उरली...
पण म्हणून घरी यायचं काही टाळू नकोस ! :)

THEPROPHET said...

:)...
मी कधीच कवितासंग्रहांच्या वाट्याला जात नाही.. पण आता ... :D

Anagha said...

कवितासंग्रहांच्या वाटेला जात नाहीस खरा...पण विद्याधर, मधूनच छानसी कविता पोस्ट करतोस त्याचं काय ? :)