नमस्कार

नमस्कार

Pages

Friday 15 April 2011

चेहरा

संध्याकाळी घरी पोचले. सातच्या सुमारास. म्हणजे लवकरच म्हणायचं. भराभर पोटाचा खोल खड्डा भरला. आईबरोबर कुंकू, लज्जा बघून झालं. 'जगात आता चांगली माणसे खूप कमी उरली आहेत आणि घराघरांत कपटी माणसे वावरत आहेत' हे सर्व दिग्दर्शकांनी मला पटवून देण्याचा आजही प्रयत्न केला.
मग आता ?
पुस्तकांचं कपाट उघडलं. दुर्गा आजींचं 'दुपानी' हातात आलं. कुठलंही पान उघडावं आणि वाचायला सुरुवात करावी. आधीचा, नंतरचा, कसलाही संबध नसलेले छोटे छोटे लेख.

त्यातीलच एक...
................................................

चेहरा

चेहरा ही माणसाच्या व्यक्तिगत जीवनातील अत्यंत महत्वाची गोष्ट. स्वत:च्या चेहऱ्याबद्दल माणसाला वाटणारं आकर्षण कुठल्याही आकर्षणाहून बलवत्तर असतं. कुरूपालाही आपला चेहरा आरशात पाहायला आवडतो मग सुंदर चेहऱ्याबद्दल तर काय बोलावं ? हा चेहरा म्हणजे माणसाला मिळणाऱ्या सामाजिक प्रतिष्ठेचं पहिलं वरदान. पण काय नवल ? माणसाला दोन अवयवांचे प्रत्यक्ष दर्शन घडत नाही. चेहऱ्याचे नि पाठीचे. पाठ म्हणजे एक आंधळा भाग, पण दोन डोळे, दोन कान, नाक नि जीभ, ही रूप, नाद गंध नि रस यांचे अप्रूप अनुभवाचे विश्वच देणारी चार इंद्रिये या चेहऱ्यात असूनही तो काही आपले आपल्याला पाहू शकत नाही. त्याची ओळख पटायची ती दुसऱ्यांनी त्याला पाहिले की त्याच्या दर्शनाच्या प्रतिबिंबातून. म्हणजे माणूस स्वत: पुरता बिनचेहऱ्याचाच असतो. अनुभवाने अलिप्त असतो. आरसा किंवा स्वच्छ जलाशय यांतच चेहऱ्याला स्वत:चे दर्शन घडते. ग्रीक कथांतल्या नार्सिससने स्वत:चे रूप तळ्यातल्या जळात पाहिले नि तो त्या प्रतिबिंबाच्या प्रेमात पडला. आत्मप्रेमाचे हे उदाहरण फार प्रसिद्ध आहे.
आपल्याकडे याच्यापेक्षाही अद्भुत गोष्ट घडून गेली आहे. अर्थात कोण्या एका काळी यज्ञदत्त नावाचा एक अत्यंत सुंदर तरुण होता. आपला चेहरा आरशात निरखायचा त्याला अतिशयच छंद जडला. इतका की त्या प्रतिबिंबित चेहऱ्याशिवाय त्याला दुसरेतिसरे काही सुचेचना. आपला चेहरा प्रत्यक्षात बघायचा ध्यास त्याने घेतला. घर, दार, सारे काही सोडून तो चेहऱ्याच्या शोधात भटकत राहिला. चेहरा काही सापडेना. हात लावून तो कळत होता. पण दिसत नव्हता. यज्ञदत्त भटकता भटकता निराश झाला. विनवणी करून, व्रत करून चेहऱ्याचे दर्शन होईना. आरशाचे ढोबळ माध्यमच त्याला पाहायला लागावे हे शल्य त्याला रुपू लागले. त्याचा जीव कासावीस झाला. प्राण उडू लागले. एक विचार विजेसारखा त्याच्या मनात आला. त्याला उमजले की आपला चेहरा दुनियेत कुठे नाही तर तो आपल्याच डोक्याच्या जागी आहे. तो सुरेख आहे की नाही ही गोष्ट गौण आहे. आपला चेहरा डोक्याला चिकटलेला आहे हीच गोष्ट महत्त्वाची आहे. झाले ! क्षणार्धात त्याची चेहरा पाहण्याची वासना मावळली. ती वासना सर्वंकष असल्यामुळे त्याचे चित्त आता पूर्णपणे मोहमुक्त झाले. त्याला ज्ञान प्राप्त झाले.
महायान बौद्ध पंथाचे सुरंगमसुत्त असे सांगते, की लगेच शांतचित्त होऊन यज्ञदत्ताने ऐहिक जीवनाकडे पाठ फिरवली आणि तो दीक्षा घेऊन भिक्षु झाला.
आरशाशिवायचा चेहरा दुसऱ्याच्या डोळ्यांत आपल्याला दिसतो. आणि त्या नजिकच्या स्नेहमयी डोळ्यांतल्या दर्शनाने आपण खूप सुखी होतो. बापड्या यज्ञदत्ताला हे कळते तर असंख्य प्रेमयुक्त चेहऱ्यांची दर्शने त्याच्या डोळ्यांत लोकांनाही घडली असती. कारण चंद्रवदन युवकाच्या डोळ्यांत डोकावून बघणं कुणा रमणीला आवडलं नसतं ? पण यज्ञदत्त फक्त चेहऱ्याच्या शोधात होता. त्याला सत्य कळले. तेही दर्शन मागे पडले तेव्हा. तेव्हा एक जीवघेणी आच संपली नि त्याची संथ वाटचाल चालू झाली. त्याला आता काहीच शोधायचे नव्हते. बोध झाला नि शोध संपला. आम्ही शोधही घेत नाही नि बोधही घेत नाही. यज्ञदत्त नि आम्ही यांच्यामध्ये फक्त एका सुताचे अंतर आहे, पण ते काही ओलांडण्यासारखे नाही.

आम्ही चेहरा हा चेहरा ठेवीत नाही. त्याचा मुखवटा बनवतो. लोकांच्या प्रेरणांप्रमाणे चलाख होऊन तो घडवतो आणि मग तो चढवूनच वावरतो. तो मग इतका घट्ट बसतो की खरा चेहरा कधी दिसतच नाही. आरशातसुद्धा. फोटोतसुद्धा. तो मुखवट्याच्या थडग्याखाली गाडला जातो. एखाद्याच भाग्यवानाला हे थडगे फोडून आपला चेहरा फिरून वर काढणे जमते.

(हा लेख १९८४ साली 'दीपावली'मध्ये पूर्व प्रसिद्ध झाला होता.)
................................................


भाग्यवान होणे कोणाला नको असते ?
ही अशी तोडफोड...उत्खनन...
माझे देखील चालू आहे...
वर्षानुवर्षे जे गाडले गेले त्याला उन्हं दाखवण्याचा प्रयत्न आहे.

23 comments:

rajiv said...

अतिशय सुंदर....दुर्गा आजींचा लेख, व तितकीच प्रामाणिक आस ... तुझी स्वतःचा चेहरा शोधण्याची..!!
परंतु सध्या काही मोजक्याच जणांना हे जाणवत असते कि आपला चेहरा मुखवट्याआड गेलाय ..बाकी सगळे मुखवटा हाच चेहरा म्हणून वागवत असतात.

BinaryBandya™ said...

खरेच अप्रतिम

आम्ही चेहरा हा चेहरा ठेवीत नाही. त्याचा मुखवटा बनवतो... :(

Shriraj said...

नाही म्हणायला माणूस धूर्तच असतो. मी ही फार वेगळा नाही, पण एका बाबतीत मी खूप नशीबवान आहे की मी जरा जरी चुकलो तरी देव लगेच मला धडा शिकवून मोकळा होतो :)

विनायक पंडित said...

मस्तच!

Anagha said...

कळत पण नाही चेहऱ्यावर मुखवटा कधी येऊन चिकटला ! नाही का ?
राजीव, विचार करायला लावणारा वाटला त्यांचा हा लेख.

Anagha said...

साध्या सरळ शब्दांत किती मोठा विचार...नाही का बंड्या?

Anagha said...

:D आणि श्रीराज बुवा, तो शिक्षा करतो तरी देखील आपण शहाणे काही होत नाही..असेच ना? :)

Anagha said...

विनायक, आवडला ना दुर्गा भागवतांचा लेख तुम्हांला ? :)

हेरंब said...

खरंच.. किती साध्यासोप्या शब्दांत मोठ्ठा मेसेज दिला आहे ना दुर्गाबाईंनी !!

Anagha said...

असं वाटतं, काही चांगलं आपल्या वाचनात येतं, मग ते का आपण आपल्या मित्रमैत्रिणींच्या वाचनात का आणू नये ? एकट्यानेच वाचनाचा आनंद लुटायचा, हे काही खरं नाही. नाही का हेरंब ? :)

Shriraj said...

बरोब्बर!! :D

अनघा, माझ्या वडिलांना पूर्वी एक सवय होती... ते एखादं पुस्तक जेव्हा वाचायचे, तेव्हा त्यातल्या चांगल्या वाक्यांची एका वहीत नोंद करून ठेवायचे. शिवाय काही वाचावीत अशा पुस्तकांची एक यादी ही त्यांनी केली होती. ही वही मागे आमच्या कपाटात मला मिळाली... अगदी जुनी जीर्ण झाली होती. मला खूप उपयोगाची वाटली ती. आता तू हे जे म्हणालीस की

"काही चांगलं आपल्या वाचनात येतं, मग ते का आपण आपल्या मित्रमैत्रिणींच्या वाचनात का आणू नये ?"

त्यावरून मला माझ्या वडिलांची ती वहीच नजरे समोर आली. पण तुझा ब्लॉग त्या वही सारखा कधी जुना जीर्ण होणार नाही.

Anonymous said...

आपल्या वाचनात आलेलं दुसर्यांना ज्ञात करण्याची ही कल्पना फारच सुंदर आहे! :)

Anagha said...

श्रीराज, किती सुंदर सवय होती तुझ्या वडिलांची ! मी असं काही छान छान वाचलं की वहीत उतरवून ठेवत असे !:)

Anagha said...

प्रिया, आपल्या दु:खात आपण मित्रमैत्रिणींची सोबत शोधतो...मग आपल्या आनंदात नको का ? :)

Unique Poet ! said...

! मुखवटा !
मी खरा की तो खरा
प्रश्‍न हा जेंव्‍हा पडे
कल्पनांना माझ्या तेंव्‍हा
भेदूनी जाती तडे

तो निर्मळ,नितळ वागे असा
मागोवा घेताना त्याचा
मी नाटकी,कारस्थानी
हाच आहे माझा साचा


तो आहे स्वच्‍छ,अपेक्षांचा निरीच्‍छ
सच्‍छील वर्तनाचा आरसा जसा
मी मात्र सहज विरूध्‍द
कुटील आणि कृत्रिम आहे कसा ?


तो उदार आणि निर्विकार
चैतन्याचा साक्षात्कार
मी विकारांचा प्रकोप
प्रक्षुब्ध जसा हाहा:कार


तो आणि मी आहोत
गुंतलेल्या वटजटा
मी म्हणजे तो ,आणि
तो माझाच मुखवटा !

- समीर पु . नाईक

Shriraj said...

समीर, अप्रतिम!!! खरंच सुंदर झालेय कविता!!!!!!!

Anagha said...

अरे व्वा ! समीर भाऊ ! सुंदर झाली आहे कविता ! :)

Anagha said...

श्रीराज, बरं पटापट सुचतं ह्या सचिनला ! :)

Unique Poet ! said...

श्रीराज आणि अनघाताई धन्यवाद ! :)

सौरभ said...

वाह.. दुपानी वाचण्यास हवे. व्यासपर्व पुस्तकाची सुरुवात मला खुप जड गेलेली. पण कमालचं पुस्तक आहे ते. आवडलय... :)

मला वाटतं हे नं दिसणारं मन दिसणाऱ्या चेहऱ्याला उगीच/नेहमीच बदनाम करतं...

Anagha said...

सौरभा, 'दुपानी' माझ्याकडून घेऊन जा वाचायला.

THEPROPHET said...

श्रीराज आणि मी देवाचे एकाच लेव्हलचे एम्प्लॉयीज आहोत बहुदा!
>>नाही म्हणायला माणूस धूर्तच असतो. मी ही फार वेगळा नाही, पण एका बाबतीत मी खूप नशीबवान आहे की मी जरा जरी चुकलो तरी देव लगेच मला धडा शिकवून मोकळा होतो :)
सेम सेम सेम!

Anagha said...

हो का विद्याधर ? चला, म्हणजे तुम्ही दोघे थोडक्यात वाचता म्हणायचं ! :D