नमस्कार

नमस्कार

Pages

Sunday, 10 April 2011

पुत्र व्हावा ऐसा गुंडा....?

त्या दिवशी केशकर्तनालयात जाणे झाले. सोफी. गेले जवळजवळ आठेक वर्षांची माझी जिवाभावाची मैत्रीण. ती ज्या कुठल्या पार्लरमध्ये नोकरी धरते, तिथे मी तिच्या मागे मागे फिरते. आणि बाईसाहेब सुट्टीवर गेल्या तर मी तिच्यापाठी माझे डोके घेऊन अगदी वसईला जाते. पण माझे हे मौल्यवान डोके मी दुसऱ्या कोणाच्याही ताब्यात देत नाही. तर मग ही आजची गोष्ट सोफीची आहे काय ? नाही. गोष्ट सोफीची नाही. परंतु, तिच्यामुळे सुरु झालेली एक विचारधारा...

दुपारची वेळ. थंडगार वातानुकुलीत एक पॉश दालन. समोरील काचांबाहेर पडलेले ऊन आणि त्यातून वहाता वारा. दूरवरील झाडांच्या, हलत्या पानातून जाणवणारा. सोफीची वाट पहाणे भाग होतं. बाहेरचा हलता रस्ता न्याहाळता पंधरा मिनिटे सहज पसार झाली.

सोफीची निमुळती सराईत बोटं केसात शिरली आणि मी डोळे मिटले.

"हाय"
सोफी कोणाशी बोलत होती. केसातील स्पर्शातून स्वत:ला बाहेर काढून डोळे उघडले तर समोर आरशात सोफी व साठीच्या आसपासची एक बाई, दोघी दिसत होत्या. सोफीने जरी हसून त्यांचं स्वागत केलं होतं, तरी त्यांच्या चेहेऱ्यावरील रेषा काही फारशा हलत्या नव्हत्या. चेहेरा गोरा. गर्भश्रीमंत.
"ती शेजारी बसलेली बाई माहितेय का कोण आहे?" सोफी कानी कुजबुजली.
"नाही बाई ! कोण आहे ?"
"ते मध्ये रेप केला ना एका बाई वर, मिल मध्ये नेऊन ! त्या मुलाची आई !"
दुसऱ्या स्त्रीवर बलात्कार करणाऱ्या पुरुषाची माता कशी असेल, असा कधी प्रश्र्न नव्हता पडला. परंतु, आज दर्शन झाले. त्या चेहेऱ्यावर हास्य नव्हते. 'एका स्त्रीवर बलात्कार करणाऱ्या पुरुषाची आई' म्हणून समाजात ओळख असणे काही सोप्पे असणार नव्हते...

"त्या दिवशी पाटील, मी ठाण्याला गेलो होतो...आणि माझी गाडी टो झाली."
पन्नाशीच्या आसपासचे तेंडुलकर साठीच्या पाटलांना एक अनुभव कथन करत होते.
"हो ? काय झालं मग ?"
"काही नाही. गेलो मी स्टेशन वर. लायसन्स दिलं. आणि पैसे भरत होतो. तर त्या माणसाने माझे नाव वाचले."
पाटील हळूच हसले. "मग ?"
"अरे ! तो मला एकदम विचारायला लागला ! सचिन तेंडुलकरचे बाबा का तुम्हीं ?....म्हटलं हो !...मी दिलेले पैसे तो लगेच परत करायला लागला ! अहो, आधी सांगायचं ना! कसला लाडका आहे, अहो तो आमचा ! मी कसले तुमच्याकडून पैसे घेतोय !"
पुढे काय घडले असणार ते खरं तर पाटलांना वेगळं सांगायची गरज नव्हती...पाटील हसत होते. "मग ?"
"म्हटलं, असं कसं ? माझी चूक झालेली आहे ! तेव्हा दंड भरणे मला भाग आहे ! असं चालणार नाही ! घ्यायला लावले मी त्याला पैसे !....गंमत आली पण ! आजपर्यंत मला लोकं 'रमेश तेंडुलकर' म्हणून ओळखत होते...आज सचिनचे बाबा म्हणून ओळखतात...आनंद झाला !"
एकमेकांवर जिवाभावाचे प्रेम असलेले, सम स्वभावाचे मित्रवर्य, खुशीत हसले.

असे काही आयुष्यात करून जावे...
...ज्यांनी जन्म दिला त्यांना असे निर्मळ हसता यावे...

36 comments:

सौरभ said...

awesome....

शेवटची ओळ एकदम भावली...

हेरंब said...

दुर्दैवाने हल्ली 'पुत्र व्हावा ऐसा गुंड' यात आनंद मानणाऱ्यांची संख्या वाढली आहे ! :(

अनघा said...

सौरभ, :)

अनघा said...

नाही रे हेरंबा, आता सचिनमुळेच आयुष्यात नाव कमावण्यासाठी वाईट धंदेच करायला हवेत असे नाही हे दिसून आलेले आहे. त्या उलट, आपली मुळे कायम ठेवून सचिनसारखी अशी जगभर भरारी मारता येते ह्याची जाणीव झालेली आहे लोकांना. नाही का? :)

Gouri said...

सौरभ ++

BinaryBandya™ said...

सही
शेवटची ओळ मस्तच ..

Priya Borkar said...

अनघा, तुम्ही फार सुंदर सांगता गोष्ट. खरंच फार त्रास होत असेल न अशा मातांना?

श्रीराज said...

तुला सांगू अनघा, मुलं अशी होतात त्यात बऱ्याच अंशी पालकांचाच दोष असतो... हल्लीचे काही आई बाबा संस्कारांपेक्षा मुलांना परीक्षेत मिळणाऱ्या मार्कांना जास्त महत्त्व देताना दिसतात... आता मला सांग ज्या मुलावर चांगले संसाकारच घडले नाहीत तो शिकेल कसा... शिकण्याचे सोड अशी मुलं चांगले नागरिक तरी कसे होतील?

अनघा said...

गौरी, तुला वाचायला थोडी उसंत मिळाली की मला एकदम छान वाटतं!! :)

अनघा said...

बंड्या, आभार! :)

अनघा said...

प्रिया, ब्लॉगवर तुझं स्वागत. :)

आपण विचार नाही करू शकत की अश्या पुत्रांच्या मातांचे काय होत असेल?!

प्रतिक्रियेबद्दल आभार. अशीच येत जा ह्या माझ्या घरी! :)

Priya Borkar said...

नक्की :)

आनंद पत्रे said...

खरंय... शेवटची ओळ खरंच अप्रतिम

sahajach said...

अनघा अगदी लहानसं उदाहरणं घेऊया ना गं... लहानशी मुलं जमतात त्यात एखादं हुड असतं ते मारतं ईतरांना आणि एखादं ऐकतं पटकन आईने सांगितलेलं... अश्या वेळी किती वेगवेगळे विचार येत असतील त्या आयांच्या मनात असे नेहेमी वाटायचे... इथे तर तू मोठी दोन उदाहरणं दिलीयेस गं...

शेवटची ओळ खरच आवडली... पटली.... बाकि श्रीराजचेही मत पटतेय...

विक्रम एक शांत वादळ said...

Khup chan

n Saurabh + 1

अनघा said...

आनंद, आभार. :)

अनघा said...

विक्रम, धन्यवाद. :)

अनघा said...

श्रीराज, काय माहित ती माता तिच्या घरात, मुलावर संस्कार करण्यात किती महत्वपूर्ण होती? की तिच्या घरात पुरुष वर्चस्व होतं..आणि मग त्यामुळेच मुलगा हे असं काही करू शकला?
संस्कार महत्वाचेच...आणि त्यानंतर संगत.

अनघा said...

मला ना बऱ्याचदा असं वाटतं तन्वी, की सध्याच्या युगात मुल वाढवणे ह्यासारखे दुसरे जिकरीचे, कसोटी बघणारे कार्य नाही!

आभार ग प्रतिक्रियेबद्दल.

Vinayak Pandit said...

अनघा पोस्ट आवडली.दोन उदाहरणं.अगदी समर्पक.परवा अशी बातमी होती की तो मुलगा निर्दोष सुटला! त्याने म्हणे काहीच केलं नाही! अशा मुलांना निर्दोष सोडवणार्‍यांना त्यांचं यश लखलाभ असंच म्हणायची पाळी!:(

अनघा said...

हो. मी देखील वाचलं ते विनायक.
'अशा मुलांना निर्दोष सोडवणार्‍यांना त्यांचं यश लखलाभ असंच म्हणायची पाळी!' खरोखर! कसले हे यश?! :(

panda said...

अतिशय सुरेख, अनघा. आणि हो, "संस्कार महत्वाचेच...आणि त्यानंतर संगत." हे देखील तितकेच खरे. प्रत्येक वेळी पालकांनाच दोष देऊन नाही चालायचे. कोणीही सुजाण पालक आपल्या मुलांना "गुन्हेगार" व्हायला शिकवत नाही.

श्रीराज said...

:D म्हणजे संस्कारांमध्ये संगत कोणाशी ठेवावी हे येत नाही का???

अनघा said...

खरं आहे पंकज.
'कोणीही ' सुजाण पालक' आपल्या मुलांना "गुन्हेगार" व्हायला शिकवत नाही'...परंतु, सुजाण पालक ही एक हळूहळू नाहीशी होणारी जमात आहे काय? असं वाटतं...नाही का?
:)

अनघा said...

सध्या अशी खात्री नाही देता येत, श्रीराज. स्पर्धात्मक जग आहे. जीवघेणी स्पर्धा. आणि मग त्यातून तग धरण्यासाठी व लवकरात लवकर यश मिळवण्यासाठी हे संस्कार कुठेतरी 'बॅक सीट' धरतात. नाही? :)

श्रीराज said...

खरंय! तसं होऊ शकतं... किंबहुना होतंच आहे...

Priya Borkar said...

असं दिसतंय, तुझ्या या घरी रोज छान मैफिल जमलेली असते :)

अनघा said...

:) प्रयत्न तरी तसा असतो गं प्रिया! :)
पण कधी तरी मी रडत पण बसलेली सापडते हा सगळ्या माझ्या ह्या मित्रमैत्रिणींना! :p

Priya Borkar said...

चित्र ...खरंच सुंदर.

अनघा, ही माझ्यासाठी एक नवीनच माहिती आहे... की तू जे.जे. मधली आहेस :) तुझी चित्र बघायला आवडतील :)

अनघा said...

प्रियां, अगं माझ्या नवऱ्याची चित्र तुम्हां सगळ्यांसमोर ठेवल्यावर आता मी माझी चित्रं काय दाखवणार तुम्हांला ?! मी आपली मध्ये मध्ये छोटी छोटी 'डुडल्स' टाकत असते, तेव्हढंच पुरेसं आहे ! :)
आभार गं प्रतिक्रियेबद्दल. :)

Raindrop said...

Kaal zara ultach ghadla. Shubha met dad in Hubli. She had always known him as 'Vandana's Father. She called me in the night and said,"I am so happy to finally get to know him on his homeground." She was soooo proud of him and knew why I am the way I am. It is coz of him.

Rapist ke tendulkar....putra to kasa honaar te tyachya upbringing var khoop dependent asta.

Hindi madhe mhantaat na - Beej boya babool ka, aam kahaan se hoy! (kaate prele asteel tar ambe kase honaar tyavar :)

अनघा said...

हिंदीतील कहावत एकदम चपखल आहे ! :)
आणि नक्की नक्की. Like father like daughter ! नाही का ?
बरं झालं शुभा भेटून आली काकांना ! आमची शूर मैत्रीण इतकी शूर कशी ते आता तिलाही कळलं ! :)

रोहन चौधरी ... said...

ज्यांनी जन्म दिला त्यांना असे निर्मळ हसता यावे... कित्ती खरे ना अनघा...!!!

अनघा said...

आता हे खूप पटतं रोहन, आई झाल्यावर...लेक मोठी झाल्यावर.

THE PROPHET said...

बर्‍याच दिवसांनी तुझ्या ब्लॉगवरचा उपास सोडतोय.. सचिनच्या पोस्टनं! :)
शेवटचं वाक्य आवडलं! :D

अनघा said...

खरं तर किती सोपं आहे नाही का हे आयुष्याचं गणित ? पण आपल्याच वाढत्या गरजा, वाढत्या अपेक्षा...आणि मग आपणच वेडावाकडं करून ठेवलेलं आयुष्य...नाही का विद्याधर ?