नमस्कार

नमस्कार

Pages

Sunday, 27 March 2011

सं...वाद!

असा एखादा दिवस येतो न की तो काही ऐकतच नाही. म्हणजे, तू ठरवच! मग बघ मी काय करतो ते!...असं काहीसं डोक्यात घेऊन तो उजाडतो. डोक्यात काही वैर घेऊनच अवतरावा जसा.
पडदे पाडलेले असले की अंधार आणि उजेड ह्याचा काही थांगपत्ता नाही लागत. परंतु, डोळ्यांनी आपलंच एक घड्याळ लावून घेतले असते. सहा म्हणजे सहा. एकाही वाराचे लाड नाहीत!

कधी नव्हे ते अगदी लेकीने देखील लवकर डोळे उघडावेत आणि बाजारात बरोबर येण्याची इच्छा दर्शवावी म्हणजे अगदी दुधात साखर.
"चल! पटकन जाऊन येऊ! नऊ वाजेपर्यंत पटकन येऊ हा! बघायचाय ना आपल्याला टीव्हीवरचा कार्यक्रम?"
आज मॅडम जेवण करणार होत्या. इटालियन.
सिटीलाईट मार्केटमध्ये रविवारच्या दिवशी जाणे म्हणजे अगदी आनंदाची गोष्ट. अख्खा बाजार चकाकता. चमचम चमचम. इथून तिथून हाळी. गुटगुटीत, ह्या माझ्या कोळीणी. सख्या!
"ताई! ये ग!"
"अगं, बघतेस ना! आज लेक आलीय माझी! आज मटण खायचंय बाईंना! आणि त्याच करणार आहेत!"
"हो का? अरे व्वा! लेक तुझी जेवण करायला लागली की गं!"
"मग काय तर!"
गेलो कित्येक वर्षांच्या प्रसाद काकांकडे. चोखंदळ बाबांनी निवडून काढलेला आमचा मटणवाला! उगाच नाहीत्या गोष्टीत चिंता नाही. मटण ताजं मिळणार...कित्येक वर्षात जून मटण नाहीच घेतलेलं, एका विश्वासाच्या जोरावर.

लगबगीने घरी आलो. नऊ वाजायच्या आत पोचायचे म्हणून. 'स्टार माझा' वरचा बक्षीस समारंभ बघण्यासाठीची घाई. इमारतीत पाऊल टाकलं. नेहेमीसारखी इमारत नव्हती. अंधारलेली. का बरं?
"असं सगळं अंधारल्यासारखं का वाटतंय?"
"वीज गेलीय वाटतं!"
आता दादरमध्ये अशी तशी वीज नाही जात. पण आज गेली. नऊ वाजता गेली आणि साडे नऊच्या आसपास आली.
मग? नाही बघितला माझा बक्षीस समारंभ!
ठीक. स्वयंपाकाला लागावं.

"तुझी नव्हती का इच्छा की मी माझा बक्षीस समारंभ बघावा?"
"असं कुठे म्हटलं मी?"
"म्हटलं नाहीस. करून दाखवलस."
"अरे! तू पण ना! फालतू हा काहीतरी!"
"अख्ख्या दादरला कशाला त्रास द्यायचा त्याच्यासाठी? फक्त आमचा टीव्ही बंद पाडला असतास तरी काम साधून गेलं असतं की तुझं!"
"अगं माझे आई! मी काही नाही केलं!"
"तू ठरवल्याशिवाय काही होतं का? तुला काय करायचं ते कर तू! मी आता तुझ्याशी वाद घालायचाच बंद केलाय! साधीच गोष्ट मनात होती. पण तेही तुला बघवलं नाही ह्यातच सर्व आलं."
"आईशप्पत! तू पण ना!"

वेडाबागडा माझा देव माझ्याशी माझ्याच भाषेत बोलतो!

"आई, आपण ना मस्त वेगळा ब्रेड आणूया! म्हणजे गार्लिक किंवा असाच काहीतरी! ह्या इटालियन डिश बरोबर मस्त लागेल!"
"चालेल! चल आणूया!"
शिवाजी पार्क. ओव्हन फ्रेश. दोन मिनिटांच्या अंतरावर.
बेकरीत दोन मिनिटांचच तर काम.
"तू जाऊन आणतेस का"
"नको! तू पण चल! मजा येईल आपल्याला दोघी दोघींना!"
डाव्या हाताला गाडी लावली. गेलो दोघी दोघी. गार्लिक ब्रेड, हर्ब रोल आणि साधा पाव.
पाचव्या मिनिटाला बाहेर. बाहेर दोनतीन बायका. आरडा आणि ओरडा!
"तिथे लावली होती का गाडी तुम्हीं?"
"माहीम चौकीत जा आता!"
गेलो.
३००रुपये दंड. ३७५ ला पाव पडला.
जेवणातला आनंद काही कमी नाही झाला!

"मी माझा आनंद जर तुझ्यावर सोपवला ना तर तो चुलीत घालशील तू!"
"झालं पुन्हा तुझं सुरु?!"
"पण मला एक कळत नाहीये! माझं स्वगत तू कशाला ऐकत बसतोस?! आणि त्यावर उलट कशाला बोलतोस?!"
"च्यायला! तू माझ्याशी बोलत असतेस ना पण?"
"आणि तुला सगळं ऐकू येत काय? मग इतक्यांदा इतकी साकडं घातली! ती नाही कधी तुला ऐकू आली? ही तुझी आंधळ्या बहिऱ्याची सोंगं ना, थांबव आता!"

"आई! कोणाशी बोलतेयस तू?"
"मी कुठे काय बोलले?!"
"अगं पण मग मान कशाला उडवलीस हवेत?"
"आता गप्प हा तू! छान झालंय मटण! खा आता गपचूप!"

साधं स्वगत करायची पण सोय नाही राहिलेली ह्या जगात!

16 comments:

Raindrop said...

kitti gappa maartes...aani konashi hi maartes....pan changlya gappa maartes :) majja yete vaachtana :) congratulations on the mutton...mala pan shikav atta.

हेरंब said...

अरे बापरे.. किती 'स्वगतं'.... !! 'स्व'तःची काय 'गत' करून घेतली आहेस, अनघा ?? :P

अनघा said...

:D खरंच! कोणाशीही मारते मी गप्पा! जो काही ऐकत नाही त्याच्याशी पण मारायला जाते! :)

मटण ना? मडॅमना विचारून घ्या! :)

अनघा said...

हेरंबा! चांगला होता! :) कधी लक्षात नव्हतं आलं! स्व-गत!! हेहे!! :D

सारिका said...

हे अनघा....या तूझ्या स्वतःच्या स्वगतःचं स्वागत...स्वगत पण इतकं छान...!!!

अनघा said...

धन्यवाद धन्यवाद सारिका! :)

सौरभ said...

lolzz मजेशीर आहे. हेरंब, झक्कास्स कमेंटलास. :))

अनघा मॅडम काही दिवसांनी (अमिताभ बच्चनसारख्या) आरश्यात बघून स्वतःशीच फायटिंग करताना दिसतील... ये ढिश्शूम... ये मारा... :)) कसलं भारी वाटेल!!!

सुहास झेले said...

अच्छा तर हा घोळ झाला होता काल :)
असो, स्वगत पुराण मस्त मस्त...:)

अनघा said...

हेहे!! काय पण बोल! सौरभ, अमिताभ बच्चन दिसला की नाही तुला माझ्यात?! मग झालं तर! :p

अनघा said...

सुहास, भांडाभांडी! माझी प्रत्यक्ष देवाशी! :p

BinaryBandya™ said...

देवाशी भांडा-भांडी मजेशीर आहे ..

अनघा said...

ऐकत नाही ना तो माझं काही! मग असं भांडण मांडायला लागतं मला!
आभार बंड्या! :)

THE PROPHET said...

आमचा 'वाईट दिवस' चार दिवस आधी आला होता ;)
(एक गंमत - आज मला गुगल्या Word Verification साठी शब्द देतोय 'shishi' :D:D)

श्रीराज said...

"असा एखादा दिवस येतो न की तो काही ऐकतच नाही. म्हणजे, तू ठरवच! मग बघ मी काय करतो ते!..."

खरंच खरंच... असं होतं... जाम त्रास होतो बघ डोक्याला तेव्हा...

अनघा said...

हेहे! विद्याधर! :D

अनघा said...

हो ना श्रीराज? सगळं कसं वाकडच जातं! :(