नमस्कार

नमस्कार

Pages

Saturday 5 March 2011

वाचन...

'Luka and the fire of life' सलमान रश्दी...संपवलं. कल्पनाशक्तीचं वारू जर मोकळं सोडून दिलं तर ते कसं कुठल्या कुठे पोचू शकतं त्याचा अनुभव...म्हणजे हे पुस्तक. लुकाबरोबर त्याच्या लाडक्या बाबांचे प्राण वाचवण्यासाठीचे हे एका अर्थी प्रवासवर्णन...जादुई नगरीतून गालिचावर बसून, विना तिकीट. पुस्तकाचा शेवटचा परिच्छेद खूप आवडून गेला...अगदी पूर्ण कुटुंबांबरोबर कोजागिरीच्या रात्री, गच्चीवर कुटुंबांबरोबर केशरयुक्त मधुर दुधाचा आस्वाद घेतल्यागत...

त्यानंतर...'सारे प्रवासी घडीचे'...दळवी काकांबरोबर. त्यांनी शेवटच्या पानावर 'पुस्तकात उल्लेखलेली सर्व व्यक्तिचित्रे ही कल्पनेतील आहेत' असे म्हटले आहे. मग हे अचंबित करणारेच आहे. नाही काय? हे इतके सुंदर बारीकसारीक व्यक्ती विशेष? कसे कल्पिले त्यांनी? त्यातील प्रत्येक व्यक्ती आपल्या नजरेसमोर उभीच रहात नाही काय? मी काय काकांना प्रशस्तीपत्रक देणार! माझे पंधरा दिवस त्यांच्या बरोबर त्यांच्या गावी गेले...इतकेच मी म्हणेन. घाऱ्या डोळ्यांचे, स्थूल शरीरयष्टीचे दळवीकाका. "दळवी, आमची लेक तुमचं हे पुस्तक पुन्हां पुन्हां वाचून हसत बसलेली असते, बरं का..." बाबांनी त्यांच्या ह्या मित्राला सांगितले होते. बाबांची ही लेक म्हणजे माझी मधली बहिण.
धुळकट झालेले, काळाच्या ओघात पडिक झालेले काकांचे पुस्तकातील घर...आणि बाबांचं गावाकडील बोडकं घर... मन उदास उदास करतं...

आता? पुढे?

पुढे 'व्यंकटेश माडगूळकर यांची कथा'. श्री. अरविंद गोखले यांनी प्रस्तावनेच्या आरंभी म्हटले आहे. 'लेखक : माडगूळकर' हे शीर्षक वाचले की, 'लोभस शब्दकळा ल्यायलेले, उत्कृष्ट शैलीतील, सोपे वाटणारे पण मन भारून टाकणारे असे काही वाचावयास मिळणार याची वाचकांना पावती मिळते.'

मला वाटते, आपण प्रत्येकाने ह्या लेखकांचे लिखाण अधून मधून वाचलेच पाहिजे. नाहीतर हल्लीच्या काळातील मराठी लिखाणात, कुठे मिळते हे असे काही कालातीत वाचण्यास? किती तरी शब्द आपण विसरूनही गेलेलो आहोत. आणि मग उगाच बोंबाबोंब करीत रहातो...मराठी जिवंत राखण्यासाठी. काय आपण हल्ली जे वाचतो, आपण जे सध्या लिहितो...ते सुंदर आहे? सरळधोपट काहीबाही वेडविद्रं लिहून टाकतो...आणि तसंच कोणी काही लिहिलेलं वाचत रहातो...
कित्येक शब्द नाहीसे झालेल्याचे दु: आहे ...माझ्या समृद्ध मराठी भाषेचे असंख्य अवयव इथेतिथे गळून पडले...कधी ते कळले देखील नाही...आपलीच डोळेझाक...दुसरे काय?



25 comments:

rajiv said...

खरंय अनघा, सध्या माणसांबरोबर भाषा पण भ्रष्ट झालेली दिसून येतेय व मनाला यातना देऊन जातेय .. :(

विनायक पंडित said...

अनघा तुमची पोस्ट खूपच आवडली.पटली.मला शांताबाई शेळक्यांचं ललितलेखन वाचत असताना असंच वाटल्याचं आठवतं.

Gouri said...

भाषा काळाबरोबर बदलत राहणारच ग ... जुने शब्द मागे पडतच राहणार. त्यांची जागा घेणारे तेवढ्या ताकदीचे नवे शब्द घडत नाहीयेत, नवी जोमदार पालवी दिसत नाही हे दुःख आहे.
व्यंकटेश माडगूळकर, अरविंद गोखले माझेही आवडीचे लेखक. ‘सारे प्रवासी’ फार लहान असताना वाचलं, तेंव्हा तितकंसं भावलं नव्ह्तं. आता फक्त त्यातली उदासी आठवते. पुन्हा वाचून बघायला पाहिजे.

Shriraj said...

अनघा, खरं आहे तुझं!

सौरभ said...

मीपण आता पुस्तक लिहतोच...

"पुस्तक"

घ्या लिहलं... वाचा आता ते. एकदम अस्सलिखित मराठीत लिहलंय.

Anagha said...

राजीव, माणसं भ्रष्ट झाली तर भाषेचं काय! :(

Anagha said...

विनायक, तसंच दुर्गा भागवतांचं लिखाण वाचताना देखील वाटतं...नाही का? अगदी व्यासपर्व असो, नाही तर ऋतुचक्र! :)
आभार प्रतिक्रियेबद्दल. :)

Anagha said...

आता त्यावर नाटक देखील येतंय ना गौरी? वाचच तू परत... मला लहानपणी वाचलेलं काही आठवत नव्हतं...
खूपच सुंदर व्यक्तीचित्रण आहे गं! आपण अगदी त्याच गावात लेखकाबरोबर वेगवेगळ्या स्वभावधर्माच्या व्यक्तींना भेटत जातो! :):)

Anagha said...

श्रीराज बुवा, सध्या तुम्हीं काय वाचताय? बऱ्याच दिवसात काही सांगितलं नाहीत! :)

Anagha said...

सौरभा!! तुझ्या ना शुद्धलेखनाचे तीनतेरा वाजलेले आहेत!
'अस्खलित' रे बाबा!! 'अस्सलिखित' काय?!
:D

हेरंब said...

खरंच.. अजून खूप जास्त पुस्तकं पुस्तकं मराठीत निघत गेली पाहिजेत. मागे एक बातमी वाचली होती ती आठवते. (आकडेवारी चुकली असेल पण मूळ गाभा हाच आहे.) ..
भारतात खूप कमी टक्के लोकांना इंग्रजी येतं/समजतं पण तरीही अमुक एक (जो आकडा खूप मोठा होता.) संख्येने इंग्रजी पुस्तकं निघतात. आणि याउलट मराठी लोकांची संख्या खूप जास्त आहे तरीही त्या तुलनेने मराठी पुस्तकं खूपच कमी निघतात.. असंच काहीतरी... गेल्यावर्षीची होती बहुतेक ती बातमी.

सौरभ said...

lol... चिंता नाय... लेखनशुद्धी करायला आहात की तुम्ही...

Shriraj said...

मी न माडगूळकरांचेच 'डोहातील सावल्या' वाचतोय

अनघा, माझं दुःख वेगळंच आहे. मला वाचनाची आवड आईमुळे लागली... पण बघ ना आता तिनेच वाचन सोडलंय... कुंकू, भाग्यलक्ष्मी, लज्जा यामधून तिला वेळच मिळत नाही. मागे तिला 'चिकन सूप फॉर वूमन्स सोल' आणून दिलं... पहिली कथा वाचली गेली... नंतर ते तसेच पडून राहिले. शेवटी मीच ते पुन्हा वाचले.

BinaryBandya™ said...

आपलीच डोळेझाक :(

Anagha said...

ह्म्म्म. हेरंब, ह्याचे कारण वाचक कमी झालेले आहेत हे आहे काय? म्हणजे हे एक vicious circle च आहे म्हणायचं!
आणि मी बघितलंय काही काही मराठी प्रकाशक पुस्तकाची बांधणी इतकी दुय्यम दर्जाची करतात की मग त्या पुस्तकाच्या गाभ्याच्या दर्जाबद्दल शंकाच यावी!

Anagha said...

:) श्रीराज, आईला आता रोज एक गोष्ट वाचून दाखवायला सुरुवात कर पाहू! जशी कधीतरी तिने तुला वाचून दाखवली असेल! :)

Anagha said...

बंड्या, प्रतिक्रियेबद्दल आभार. :)

Raindrop said...

chal pata pata kaam karu so that u can read 'One by One' soon ;)

Anagha said...

कसलं काय गं वंदू! रोज, मी आपली घेऊन येते माझं पुस्तक ऑफिसला! आणि दिवसाभरात फक्त एक पान वाचून होतं! :(

THEPROPHET said...

मराठी शाळा हे त्यावरचं एक उत्तर आहे.. पण असो.. सध्या अधिक मराठी पुस्तके वाचणे हादेखील एक मार्ग आहे!

Shriraj said...

Idea changli aahe!!! :D

Raindrop said...

'One by One' is our project ga baaaaaai!!!!!

रोहन... said...

सलमान रश्दी मी वाचलेले नाही पण दळवींचे पुस्तक मी वाचले आहे आणि गेल्या महिन्यात तर त्यावर आलेले नाटक देखील पहिले आणि पुन्हा त्या आठवणी मध्ये जाऊन बसलो... खरंय... आपण जुने वाचले तर ते पुढे नेऊ.. नाहीतर........... मरण!!!

Anagha said...

विद्याधर, असेच काही म्हणता येणार नाही...हल्ली मराठी शाळांमध्ये काय प्रतीचे मराठी शिकवले जाते ते बघता सगळेच कठीण वाटते.... :(

Anagha said...

चांगले वाचन आणि प्रयत्नपूर्वक चांगले लिखाण हे आपल्यालाच वाढवायला हवे...नाही का रोहन ?