नमस्कार

नमस्कार

Pages

Friday, 4 March 2011

पुण्ण्याची यादी

जवळजवळ पंचवीस वर्ष उलटून गेली त्या घटनेला. परंतु, जसे मनावर घेतलेले बाण लक्षात रहातात तसेच काही फुलासारखे हळुवार स्पर्श देखील मनात घर करून रहातातच.

...त्या वर्षी सिमेन्स कंपनीच्या कॅलेंडरचा विषय होता भारतातील सुप्रसिद्ध स्थळे. त्यात त्यांनी माझ्या नवऱ्याकडून एक चित्र काढून घेतलं होतं. जलरंगात. मानधन मिळालं ५०० रुपये. मग साहेबांनी एक सायकल विकत घेतली. खूप लहानपणी वडिलांकडे हट्ट करून बघितला होता. पण शेवटी स्वकमाईची गोष्टच न्यारी. कालांतराने सायकल जुनी झाली. मध्यंतरी आमचं लग्न झालं. डोंबिवलीत संसाराला सुरुवात केली.

मी ती सायकल चालवण्याचा प्रसंग तसा कधी आला नव्हता. परंतु, एका काळोख्या रात्री डोंबिवलीत माझ्या अंगात हट्टाचं भूत शिरलं. आमच्या घरापासून वीसएक मिनिटांच्या अंतरावर त्याच्या 'मित्र कमी आणि कुटुंबाचा भाग अधिक' अशा एका दोस्ताचं घर होतं. आम्ही तिथे निघालो होतो. आत्तापर्यंत त्या सायकलीचं पळण्याचं वय टळून गेलेलं होतं.
"मी चालवू का रे सायकल? मी चालवते...हळूहळू चालवते. तू ये मागून!"
"नको! एक तर काळोख झालाय आणि सायकलचं हॅण्डल नीट नाहीये. वाकडं झालंय!"
"तू उगाचच सांगतोयस! तुला द्यायचीच नाहीये मला चालवायला!"
"अगं, ही गल्ली पण बघ ना किती काळोखी झालीय!"
घडायचं असलं की ते घडतंच. मी हट्टी बायको झाले आणि स्वार झाले...निघाले. सायकलची हाडं म्हातारी झालेली होती. वयोमानानुसार. रस्त्यात काळोख मिट्ट होता. समोरून रिक्षा आली. मी हँडल वळवायचा कसोशीने प्रयत्न केला. पण सायकलीला कळतं तरीही वळत नव्हतं. रिक्षाचा आरसा आपटला. बरोबर खांद्यावर. तोल गेला. भूईसपाट. काळोखातून अस्सल मालवणी शिव्या, बायकी आवाजात ऐकू येऊ लागल्या. रिक्षात एक आजी होत्या. संतापलेल्या. मी खांदा धरून कळवळत खाली बसले होते. पाठी बघितलं तर त्या अंधारात नवरा काही दिसला नाही. रिक्षावाल्याला वेदना ऐकू आल्या. "आजी, त्यांनाच खूप लागलंय बहुतेक!"
तोपर्यंत साहेब आले. पुढे त्याने सायकल कुठे ठेवली, मला तिथून कसं नेलं...तोच जाणे. पण रात्रीत हॉस्पिटलमध्ये भरती केलं गेलं. एक्स रे काढला गेला....कॉलर बोन फ्रॅक्चर.
तसे फारसे हट्ट नाही केले कधी...पण हा एक हट्ट हाडाला जन्माची चीर पाडून गेला.

मग कामावरून सुट्टी. घरी विश्रांती...डोंबिवलीची लोकं तसं बघायला ऑफिसच्या वेळेच्या जवळजवळ तीन तास तरी आधी ऑफिससाठी घराबाहेर पडतात. व कामाच्या स्वरूपामुळे हा कधीतरी 'जमलं तर' घरी परतत असे. उजवा हात गळ्यात घेऊन मी तर बिछान्यावर. मग जेवणखाण?
...इथे धावून आल्या आमच्या वहिनी...

कृष्णधवल 'सुजाता'तील ती मोहक नूतन? तसाच काहीसा सावळा चेहेरा. सडपातळ शरीरयष्टी. साधं सुती पातळ. लग्नाआधी कुठल्याशा रुग्णालयात परिचारिकेची नोकरी त्या करित असत. परंतु, सून घर सांभाळणारी हवी, कमावती नको...म्हणून मग तितक्याच जबाबदारीने त्यांनी त्या घरात पाऊल टाकलं होतं. त्या घराशी माझा संबंध? मघाशी म्हटल्याप्रमाणे 'मित्र कमी आणि कुटुंबाचा भाग अधिक' अश्या त्या दोस्ताच्या, ह्या थोरल्या वहिनी. आणि म्हणून माझ्याही वहिनीच. माझी त्यांच्याशी ओळख झाली तेव्हा त्यांना दोन मुलं होती. मुलगा शिशूवर्गात आणि मुलगी तिसरी चवथीत. भरलेलं घर...जवळ जवळ दहा बारा माणसांचं. सव्वा फूट रुंदीचा कणकेचा मळलेला गोळा. चपात्या मोजायला घेतल्याच तर रोजचा आकडा चाळीसला पंधरा मिनिटात मागे टाकत असे. सगळ्यांचे जेवण साग्रसंगीत करणे, मुलांना शाळेत सोडणे आणि मग त्यांचा नवीन पेशंट. मी!

सकाळी अकराच्या सुमारास दरवाजाची घंटा वाजत असे. हसऱ्या चेहेऱ्याच्या वहिनी दारात उभ्या. थकवाबिकवा? काही रडगाणं वगैरे? काही कौटुंबिक तक्रारी? नव्हत्या. त्यांच्या काही तक्रारी नव्हत्या. मग भराभर स्वयंपाकघरात शिरायचं. अर्ध्या तासात आम्हां दोघांसाठी दोन्ही वेळेचं जेवण आटपायचं. मग पुढल्या कामाकडे. रोज मला प्रेमाने न्हाऊ घालायचं आणि मग खाऊ पण घालायचं. मग असतील नसतील ती भांडी घासायची, ओटा आवरायचा. की झालीच वेळ, लेकीची शाळा सुटायची.
"दमलात ना वहिनी?"
"ह्हो! एव्हढंसं काम करून?!"

माणसामाणसाची स्मरणशक्ती. वेगवेगळी. काहींची कमकुवत. काहींची इतकी तीव्र की न केलेल्या गोष्टी देखील आपणच केल्या, असेच काहीसे त्यांना वाटत रहाते. आणि मग मोबदल्याची आस.
ह्या दुसऱ्यासाठी काही करण्याच्या गुणात रक्ताचा काही संबंध असतो? नाही दिसला. रक्ताची माणसं तुमच्यासाठी केलेल्या कामाची यादी बाळगताना दिसली. वारंवार उगाळताना दिसली. आणि ह्या वहिनी!
"आठवतं वहिनी, तुम्ही येऊन कित्ती दिवस मला भरवत होता...!"
"चल! काय नको ते घेऊन बसलीयस!?"

'नको ते'? कोणी श्रम आणि वेळ दिला...त्याची आठवण ठेवली. दु:ख, 'नको ते' म्हणून दूर सारावं. तुमचे हे प्रेम मी काय विसरणार? जसे कोणी नाहक केलेले शरसंधान माझ्या मनाने लक्षात ठेवले, तसेच हे तुमचे प्रेम देखील माझ्या त्याच मनाने हळुवार जपले. माझ्या मनाचा हिशोब एकच. प्रेम आणि घाव...त्याने सारखेच जोपासले.

पुण्याला अकरावीच्या दाखल्यासाठी सकाळी हसतखेळत गेलेलं आपलं लेकरू, अॅम्ब्युलन्सने जेव्हा मध्यरात्री डेड बॉडी म्हणून आणून दिलं...त्यावेळी ह्या मायाळू 'सुजाता'चं काय झालं असेल?

आधीही म्हटलं होतं...आताही तेच वाटतं....वाट्टेल तश्या गोष्टी लिहायची खोडच आहे 'त्याची'!
माझी नाही ही, त्याची सवय आहे.
...शोकांतिका लिहायची...त्याची सवय आहे.

...कोणी केलेल्या पुण्ण्याची यादी विसरायची ही त्याची खोड आहे.

28 comments:

हेरंब said...

:(
:(
:(
:(

माऊ said...

no words...very touchy..:(

Gouri said...

:(
त्याचा न्याय अजब असतो हे खरं ग ... कुणाला किती भोगावं लागेल तोच जाणे.

बाकी सुजाता मधली नूतन म्हणजे तू एकदम ’जलते है जिसके लिये’ ची आठवण करून दिलीस.

सौरभ said...

>> "पुण्याला अकरावीच्या दाखल्यासाठी सकाळी हसतखेळत गेलेलं आपलं लेकरू, अॅम्ब्युलन्सने जेव्हा मध्यरात्री डेड बॉडी म्हणून आणून दिलं...त्यावेळी ह्या मायाळू 'सुजाता'चं काय झालं असेल?"

वाचताच मेंदूत झिणझिण्या आल्या. this is wrong... this is bad... all my prayers for the family...

अनघा said...

हेरंबा, त्यांनी त्यांचा सेवाभाव काही सोडला नाही....ह्यात त्यांची कमाल आहे...त्यातून शिकण्यासारखं खूप आहे. :)

अनघा said...

उमा, आभार गं प्रतिक्रियेबद्दल.

अनघा said...

काही गोष्टी आपण आपल्या कर्माने ओढून घेतो...पण हे असलं काही आकलनाच्या पलीकडले....

'जलते ही जिसके लिये'...अप्रतिम...माझं खूप खूप आवडतं गाणं... :)

अनघा said...

सौरभा...

Yogesh said...

:( :(

निशब्द...

अनघा said...

योगेश, वहिनींची मानसिक शक्ती अफाट आहे...धडे घेण्यासारखी. :)

इंद्रधनू said...

सहनशील लोकांनाच नेहमी सहन करावं लागेल अशी सोय करतो तो.... त्याची खोड कधी बदलणार त्यालाच ठावूक... :(

Vinayak Pandit said...

शब्दंच नाहीत अनघा.तुमच्या वहिनींसाठी, त्यांच्या शोकांतिकेसाठी आणि अर्थात तुमच्या लेखासाठी!

shweta pawar said...

Anagha, tujhya likhanat mala ek gosht spasht janavali ki tu agadi haluvar pane yeun lokanchya manala chatka lavun jates...
khupach sunder lihates.
malahi asach lihayala yeun de

अनघा said...

मग नाहीतर आपण सहनशक्तीचे धडे कोणाकडून घेणार?!....म्हणून बहुधा त्यांची परीक्षा 'तो' परतपरत घेत असावा! :(

आभार इंद्रधनू...आणि स्वागत ह्या माझ्या घरी...

अनघा said...

विनायक, आणि इतक्या भयानक घटनेनंतर देखील, एका संधीवाताने अंथरुणाला खिळलेल्या स्त्री नातेवाईकेची कित्येक वर्ष त्यांनी घेतलेली काळजी बघितली तर नतमस्तक व्हावेसे वाटते!
आभार विनायक...

अनघा said...

श्वेता, आयुष्य बरच काही शिकवून गेलं आणि रोज शिकवतय...

तुला माझं लिखाण आवडलं...मला आनंद झाला...अशीच भेट देत रहा.

लिहिशील...खूप खूप सुंदर लिहिशील... :)

श्रीराज said...

माझं मन वितळलं गं ही गोष्ट वाचताना

भानस said...

"पुण्याला अकरावीच्या दाखल्यासाठी सकाळी हसतखेळत गेलेलं आपलं लेकरू, अॅम्ब्युलन्सने जेव्हा मध्यरात्री डेड बॉडी म्हणून आणून दिलं...त्यावेळी ह्या मायाळू 'सुजाता'चं काय झालं असेल?".... :( जीव कळवळला गं. त्या माऊलीच्या नशीबी हे का यावं... अनाकलनीय आहे सारं.

:(
:(

अनघा said...

कळतंय ते मला श्रीराज...

अनघा said...

त्याचं त्यालाच माहित...हो ना भाग्यश्री? :(

Raindrop said...

u r right...very touching story and sadly it is true.
(with my limited knowledge of marathi when i started reading it I thought it is about some 'list you made in Pune - the city) then by the end I realised it is 'punyaachi yaadi'....so the anti climax was so much more for me)

:(

BinaryBandya™ said...

चटका लावला मनाला ह्या लेखाने ..

"कोणी केलेल्या पुण्ण्याची यादी विसरायची ही त्याची खोड आहे"

अशा खोडी असलेल्याला आपण देव म्हणतो :(

THE PROPHET said...

:(

अनघा said...

वंदू! मला हे वाटलंच होतं....
जर ते पुण्याबद्दल असतं तर नावात फक्त एक 'पु' आला असता... म्हणजे - 'पुण्याची' असं झालं असतं... :)

तू इतके प्रयत्न करून प्रेमाने वाचतेस हेच माझ्यासाठी खूप आहे गं! :)

अनघा said...

बंड्या, आणि हे देवच करतो, म्हणून न्यायासाठी भांडायला देखील कोणी नाही उरत...

अनघा said...

विद्याधर, सर्वच इतकं बेभरवशाचं आहे....

रोहन चौधरी ... said...

शेवट येता येता नि:शब्द झालो...

अनघा said...

जगणं किती कठीण जात असेल त्या मातेला.... नाही का रोहन ?