नमस्कार

नमस्कार

Pages

Thursday, 3 February 2011

रशियन बाहुली

"तो माझा सर्वात जवळचा मित्र होता. बालपणीचा. एकत्र मोठे झालो. एकत्र खेळलो. हसलो, रडलो. किती प्रवास एकत्र केले. त्याच्याचमुळे तर मी घडलो. आजपर्यंतचे माझे आयुष्य मी त्यालाच देणे लागतो."
"आम्ही गेली चारपाच वर्ष एकत्र काम केलं. कामं, काय आवडीने करायचा तो! अतिशय जलद. आणि माणसं जमवण्याचे त्याचे कसब काही अलौकिकच."
"सरळ माणूस. काही छक्के पंजे नाहीत."
"पार्टांची जान यार, तो म्हणजे!"
"पार्टांची आणि सहलींची!"
"ते माझे काका. खूप प्रेमळ. कधी आले भेटायला तर खाऊ नक्की घेऊन यायचे."
"मला तर तो मुलासारखाच. माझ्या पोटाच्या लेकापेक्षा मी ह्याच्यावर जास्त प्रेम केलं. आईच तर मानायचा तो मला."
"तो आसपास असला की सगळे वातावरणच कसं नुसतं हलकं फुलकं! हा विनोद करणार आणि आम्हीं दिवसभर हसत बसणार!"
"अरे, प्यायला बसलो की काय विचारता! जितकी लोकं असतील नसतील ना त्या सगळ्यांची बिलं हा भरायचा!"
"हो ना! एकदा मी माझ्या घरातल्या सगळ्यांना घेऊन गेलो होतो हॉटेलात! हा पण होता बरोबर! मस्त दारू प्यायलो आम्हीं! आणि अरे मजा म्हणजे जवळ जवळ पन्नास हजारांच बिल ह्यानेच भरलं! मोठ्या मनाचा माणूस!"
"दिलदार माणूस यार!"

जवळजवळ दोन तास उलटून गेले होते. श्रद्धांजली चालू होती. ती आणि तिचा एकुलता एक लेक कोपऱ्यात बसून ऐकत होते. तिचं मन नेहेमीसारखंच उघड्या खिडकीतून कुठे दूर भरकटत होतं. तिच्या नजरेसमोर राहूनराहून येत होती रशियन बाहुली. कोण जाणे कधी कोणी भेट दिली होती. घरात खिडकीच्या एका कोपऱ्यात उभी असलेली ती बाहुली. गोल चेहेऱ्याची. गोल अंगाची. ती पहिल्यांदा जेव्हा हातात आली, तेंव्हा नव्हती कळली. पण मग तिचं डोकं उघडलं, तर अजून आत एक...तशीच्या तशीच. थोडी आक्रसलेली. मग तिलाही उघडलं. तर त्यात दडलेली अजून एक. अश्या एकातेक नऊजणी. आठ डोकी उघडली आणि नऊ जणी हाताशी लागल्या. आज इथे बसून त्याच नऊ जणींची आठवण येत होती....भाचा बोलत होता, पुतणी बोलत होती. मित्र बोलत होते...किती बोलू आणि किती नको...

...हा माणूस होता, तसाच काहीसा. रशियन बाहुली. एकात एक अनेक बाहुल्या. सर्वात छोटी बाहुली फक्त तिलाच माहित. कारण तीच लागली होती तिच्या हाताशी. माणूस दिसायला एकच होता. कधी मित्र, कधी भाऊ, कधी काकामामा, बाप. खूप कमी वेळा, तिचा नवरा. नशीब, तिला नव्हतं कोणी सांगत श्रद्धांजलीत बोलायला. ना तिच्या लेकाला. ती काय बोलणार? तिचा लेक काय बोलणार? त्यांची रशियन बाहुली जगावेगळी होती. तिचा नवरा तोच त्याचे पप्पा. तोच जमावाचा मित्र. वर एक आणि आत अनेक विविध रूपे. तिचे तिच्या अदृश्य बाहुलीबद्दलचे मत वेगळे होते. तिने लेकाकडे नजर टाकली. लेक देखील आरपार खिडकी बाहेर नजर लावून होता. त्याचे वडील म्हणून त्याच्या अदृश्य बाहुलीबद्दलचे मत काय होते? काय जमावाला ते जाणून घ्यावयाचे होते? नव्हते. कोणाला नव्हते ते जाणून घ्यायचे. सगळेच आपापल्या बाहुलीवर खूष होते. त्यांची बाहुली हरवली म्हणून अश्रू ढाळत होते.

"मॅडम, तुम्हीं बोलणार का?"
त्या आवाजाने तिच्या मनाची कवाडे बंद झाली. बाहुल्या आपोआप एकातएक गेल्या. तिची बाहुली, सर्वात आत. जशी काळ्या जादूने भारलेली. मंतरलेली. ती लपली. खोल खोल. न कोणाला कधी दिसली, न कोणाला कधी कळली. जशी काही ती नव्हतीच. त्याचे ते रूप कोणाला कधी न कळलेले. जे फक्त तिच्यासाठीचे होते. आणि तिच्या लेकासाठीचे.
...जेव्हा तो मित्रांची दारूची बिले भरत होता, तेंव्हा ती तिचे मंगळसूत्र विकत होती. रात्रीबेरात्री पार्ट्यांवरून तो घरी येत होता, तेव्हा तिचं तर त्याच्या मुखी घास भरवत होती. उशिरा घरी आलेल्या पप्पांना त्यांचा लेकच तर सावरत होता, पलंगावर निजवत होता...

बाहेरील, सर्वांचीच गोरीगोमटी बाहुली, समोर स्टेजवर फोटोत होती. मेणबत्या जळत होत्या. तिची नजर पुन्हा त्या ज्वालेत अडकली.

तिने दखल न घेतलेल्या आवाजाचा माणूस तिच्या नजरेच्या चौकटीतून हलला. जमाव अश्रू ढाळत होता त्यावेळी त्यांची लाडकी बाहुली, गळ्यात हार घालून तिच्याकडे बघत होती. विजयी हास्य. मृत्यूने देवत्व बहाल केले होते.

त्याच्या जिवलग मित्राने आक्रोश व भाषण आवरतं घेतलं.
मेणबत्यांनी शरणागती मागितली होती...जमावासाठी शोकसभा संपली होती.
जमाव विस्कळीत झाला.
ती लेकाला घेऊन सभागृहातून बाहेर पडली.

काळी बाहुली काम करतच होती.
रक्त आतल्याआत शोषतच होती.

29 comments:

Ram said...

Perception vs stark reality! Very painful.

अनघा said...

आभार राम.

Yogesh said...

:( :(

THE PROPHET said...

अकिरा कुरोसावाचा 'इकिरू' आठवला...
फारच वेगळ्या पद्धतीनं पण तुझ्याच शैलीत लिहिलंयस! :)

अनघा said...

विद्याधर, तो सिनेमा बघितलेला नाही! लगेच शोधला पण गुगलवर! खूप हळुवार आहे ना? रडवणारा?

आभार रे प्रतिक्रियेबद्दल.

अनघा said...

योगेश, आभार.

THE PROPHET said...

रडू येईल...पण आनंदाश्रू असतील ते..
अगदी तरल..सुंदर!!!

THE PROPHET said...

अन हो..
ते आभार नकोत गं! :)

अनघा said...

हो ना विद्याधर? अरे मला ते असं ना काही कळत नव्हतं! आता तू सांगितलंस ते बरं झालं! :)

आणि अरे मी रडके सिनेमे बघायला खूप घाबरते! म्हणजे हॉरर सिनेमे बघायला घाबरत नाही तेव्हढी रडके सिनेमे बघायला घाबरते!
एकदम माझ्या बरोबरच्यांना 'आवरा' असं म्हणायची वेळ येते! :p

दीपक परुळेकर said...

तुझं ना हे नेहमीच झालयं !
म्हणजे असं काही तरी लिहायच ना की, मग मी नि:शब्द व्हायचं.
तुझ्या त्य शब्दात कुठेतरी स्वत्;ल शोधत फिरायचं.
सुंदर, अप्रतिम असे रुटीन शब्दही खुजे वाटावे कमेंट्स द्यायला.
तू खरचं ग्रेट आहेस यार... :)

अनघा said...

आवडली ना तुला पोस्ट दीपक? मला आनंद झाला. :)

भानस said...

गेले पाचसहा दिवस आजारपणाने खाल्ले. :( आज जरा मान वर करतेयं तर तुझी ही पोस्ट. बये, अगं अव्याहत चालणारी ही सत्ये गं... भोग आहेत. भोगल्याशिवाय सुटका नाही... झुरळही मरणाच्या भितीने अंगावर येतेच पण बायका मात्र... कधी बदलणार हे दुबळेपण...

विषण्ण...

अनघा said...

:) हसायलाच आलंय हा मला भाग्यश्री! अगं, माझ्या डोक्यात ना एक रीळ आहे! ते असं सुटतं..आणि मी त्यामागे धावते! आणि रीळ उतारावरून घरंगळत जातं!
आता रजनिकांतावर पोस्ट लिहिण्याची काही माझी बुद्धीक्षमता नाही! त्यामुळे हे असं! :)

आता कशी आहेस ग बाई?!

rajiv said...

भानस , अनघा - स्त्री चे हे दुबळेपण न, स्वामित्वासाठी उभे केले गेलेय दुबळ्या् पुरुषजातीकडून, तडकणारया काचेच्या रूपकातील राक्षसरुपात, नाहीतर स्त्री ही अतिशय सशक्त आहे .

अनघा said...

खरं आहे तुमचं राजीव. स्त्री शक्तीची कल्पना देखील कोणी करू शकणार नाही.
आभार प्रतिक्रियेबद्दल.

सौरभ said...

काय बरं कमेंटावे ह्या पोस्टवर. कोणती बरं बाहुली बघत असेन मी माझ्या ओळखितल्यांची???
मॅडम तुम्हीच उत्तर द्या. आम्ही बापुडे नेहमीसारखेच निरुत्तर...

अनघा said...

सौरभ, जी ज्याच्या वाट्याला येईल ती त्याची...फक्त कधी हट्ट धरू नये कि दुसऱ्याच्या हाताला लागेल तशीच तुझ्या हाताला लागेल!

हेरंब said...

बापरे.. कसंतरीच वाटलं वाचून.. विषण्ण झालो.

पण अप्रतिम लेखन.. वर्णन करण्याची हातोटी वादातीत !! जिओ...

अनघा said...

ह्म्म्म... आभार हेरंब.

sahajach said...

विचारात टाकतेस गं...

आपल्या आजूबाजूला असणाऱ्या किती काकू, मामींकडे अश्या लहानश्याच बाहूल्या आहेत असे काहिसे जाणवतेय आत्ता.... मग त्यांचं असणं कसं गृहित धरलयं आपण , पण जरा त्यांच्या मनाच्या आतला विचार करावासा वाटतोय....

अनघा आभार!!! :)

अनघा said...

तन्वी, असंच तर असतं नाही का? प्रत्येक माणसाचं एक रूप खूप strong असतं आणि तेच मग बाहेर जगाला दिसत रहातं...(जसं आपलंही आहेच)
म्हणजेच एखादा मनुष्य मित्राची भूमिका अतिशय जबाबदारीने निभावत असेल तर एखादा, पुत्राची.

अर्थात कोण इथे सर्वगुण संपन्न आहे? नाही का?
:)

Vinayak Pandit said...

’ती’ शोकसभा संपली पण तिच्या आतली शोकसभा कायम राहिली...असं काहीसं वाटलं.

अनघा said...

:)

श्रीराज said...

दीपक अगदी माझ्या मनातला बोलला ...तू खरचं ग्रेट आहेस...

Raindrop said...

:(

अनघा said...

:) श्रीराज!

अनघा said...

Vandu, :)

Hemant Adarkar said...

Dear Anagha, I am speechless!

regards,
Hemant

अनघा said...

हेमंत आभार.