नमस्कार

नमस्कार

Pages

Sunday 9 January 2011

मामांची गोष्ट

आमची मे महिन्याची सुट्टी चालू आहे. भिंतीवरचं आजोबांचं जुनं घड्याळ नुकतेच दहा ठोके देऊन थांबलंय. लाकडी उभट. आणि त्यात एक चपट गोळा. एaaaक...दोoooन...मला आता दहापर्यंत आकडे मोजता येतात. हे घर आजीआजोबांचं. ते आता नाहीत. म्हणजे आजोबांना मी बघितलंच नाहीये. पण आजी होती. पण आता नाहीये. तिच्या पाठीवर एक पुळी आहे. म्हणजे होती. काळी आणि मोठी. त्याला चामखीळ म्हणतात. दुपारी ती झोपली की मी तिच्या बाजूला झोपायचे आणि मग मला ती चामखीळ खेचायला खूप मजा यायची. आता माझी आजी आकाशात एक चांदणी झालीय.

मग आता इथे आजी नाहीये. माझे एक मामा कामासाठी दिल्लीला असतात. मला तीन मामा आहेत. सर्वात छोटा मामा इथेच असतो. पण तो माझे लाड करत नाही. एकदम मोठे मामा कधी इथे येतंच नाहीत. मग त्यांना मी बघितलेलंच नाहीये. पण मे महिन्याची सुट्टी आमच्यासारखीच दिल्लीत पण पडते. सुट्टी पडते म्हणजे मी सारखी पडते तसं नाही. सुट्टी पडते म्हणजे मला शाळेत जायला लागत नाही. मग मामामामी आणि सगळे इथे येतात. मामांना तीन मुलं आहेत. म्हणजे ते माझे भाऊ आणि बहिण आहेत. ते माझे खूप लाड करतात. त्यांची मी लाडकी आहे. ते मला चिडवतात पण खूप लाड करतात.

तर आता आम्ही सगळे ह्या हॉलमध्ये आहोत. हॉल खूप मोठा आहे. तिथे आम्ही सगळे एकत्र झोपतो. म्हणजे बाजूबाजूला अश्या खूप गाद्या टाकतात आणि त्याच्यावर चादरी घालून आम्ही सगळे झोपतो. मी, माझ्या मावस बहिणी, मावस भाऊ, माझ्या मामे बहिणी, मामे भाऊ आणि मामामामी. मामाच्या मुलांना मामे म्हणतात आणि मावशीच्या मुलांना मावस म्हणतात.

"मामा, गोष्ट सांगा ना!" आम्हांला आमचे हे मामा नेहेमी गोष्ट सांगतात.
"अरे! काल सांगितली ना! ती विसरलात का तुम्हीं सगळे!"
"नाही! मला आठवतेय!" हा पराग! हा माझा मोठा मावस भाऊ आहे. तो जास्तीच शहाणपणा करत असतो! नेहेमीच! तो पण असतो सुट्टीत इथे. कारण हे माझे मामा, त्याचे पण मामा आहेत! कसे? ते मला नाही माहित! माझ्या आईने तसं मला सांगितलंय!
"पण मामा, काल ती गोष्ट अर्धीच झाली ना?" हे मी म्हटलंय.
"हो? अशी कशी अर्धीच झाली? तुम्हीं झोपून गेलात काय राव? मी तर पुरी सांगितली!"
हे म्हणजे असं झालं? मी झोपूनच गेले? मामा गोष्ट सांगत होते तेव्हां? हे असं होऊ शकतं. कारण मला झोपायला खूप आवडतं. म्हणजे कधीकधी मी झोपून उठले की मला कळतंच नाही कि संध्याकाळ आहे की सकाळ आहे!
"नाही हा बाबा! तुम्हीं काल अर्धीच सांगितली!" हा माझा मामे भाऊ शशांक. तो ह्या माझ्या मामांचा मुलगा आहे. आणि तो मोठा आहे.
"बाबा, काल तुम्हीं सोनेरी राजपुत्र आणि सफरचंद ही गोष्ट सांगत होतात! आणि मग तुम्हांला झोप आली म्हणून तुम्हीं ती अर्धीच सांगितलीत!" ही माझी मामे बहिण. तिला आम्ही अक्का म्हणतो. ती खूप मोठी आहे. आणि ती आमचे सगळ्याचे खूप खूप लाड करते! पण मला माहितेय की मीच तिची सर्वात जास्त लाडकी आहे!
काल मामांनी अर्धी सांगितली वाटतं गोष्ट. मला माहितीच नाही हे! म्हणजे मी झोपून गेले का?
"बरं. मग आज कुठली सांगू?" मामा थोडे झोप आल्यासारखे वाटतायत का?
"मामा, तीच पुढे सांगा ना!" ही प्रज्ञा. मी पहिलीत आहे आणि ती दुसरीत आहे.
"नको. ती नंतर कधीतरी पुरी करुया! आज ना आपण एक गंमत करुया!"
मामा आमचे खूप गंमतीशीर आहेत! आज काय गंमत करायचीय?
"काय करुया मामा?" मी विचारतेय.
"आज ना जो पहिला झोपेल ना त्याला गोष्ट!"
"म्हणजे?" हा अजय. अजून तो छोट्या शाळेतच आहे!
"म्हणजे काय म्हणजे? अरे, जो पहिला झोपेल ना त्याला गोष्ट!"
"चालेल! मी ना मामा सगळ्यात आधी झोपून दाखवते हा तुम्हांला!"
"हा! अना! एकदम!"
मी ना मग एकदम माझं पांघरूण घेतलं. मी नेहेमी अक्काच्या बाजूलाच झोपते. दुसऱ्या कोणाला नाही देत मी तिच्याजवळ झोपायला. तर मी आता पटकन झोपून दाखवते मामांना. मग सगळेच एकामागोमाग एक आडवे झालेत. रांगेत. मामा पण. वरती पंखा आहे. गरगर फिरणारा. डाव्या बाजूला एक खिडकी आहे आणि त्यातून थोडा उजेड येतो. नाहीतर मग आमच्या ह्या हॉलमध्ये खूप काळोख होऊन जातो. आता मामा आहेत म्हणून बरं आहे. नाहीतर पराग नेहेमी मला भुताच्या गोष्टी सांगतो. मला खूप भीती वाटते.

"मामाsss, तुम्हीं रात्री गोष्टच नाही सांगितली!" मी डोळे उघडले तर मामा पेपर वाचत होते. चहा पीतपीत. माझ्या बाजूला एक पण गादी नव्हती. म्हणजे सगळे उठले होते. असं होतं नेहेमी! मग सगळे मला आळशी म्हणतात!
"मामाsss'
"अरे! अना, तू उठलीस?"
"हो! पण मामा तुम्हीं मला गोष्टच नाही सांगितली रात्री!"
"मी काय सांगितलं होतं रात्री?"
"जो पहिला झोपेल त्याला गोष्ट!"
"मग?"
"मग मीच पहिली झोपले मामा!"
"अरे! तू झोपूनच गेलीस! मग कशी सांगणार मी तुला गोष्ट?"
म्हणजे काय? मला कळलंच नाहीये! सगळे ना, असं मला काही कळलं नाही की हसत बसतात!
"हो? मग कोणाला सांगितली तुम्हीं गोष्ट?"
"अरे, तुम्हीं सगळे झोपूनच गेलात! मग मी कोणालाच नाही सांगितली गोष्ट!"
असं कसं? मग मी झोपायचं होतं की नव्हतं? मामा मला म्हणालेले ना की जो पहिला झोपेल त्याला गोष्ट? शी बाबा!
"मामा, आज रात्री सांगाल मग गोष्ट? मी नाही झोपणार आज! तुमच्या ना मांडीवरच बसून राहीन! चालेल?"
"हो तर! तू माझ्या मांडीवरच बस! मग बघ मी ती राजपुत्राची गोष्ट सांगतो की नाही!"
"चालेल!"

16 comments:

सौरभ said...

मामाने मामा बनवलं. :-D

Anagha said...

:D :D लाडके होते हे मामा, सर्व भाचे कंपनीचे!

सारिका said...

हे मला माझ्या मामांची आठ्वण आली गं..

Anagha said...

झाली ना गं सारिका? मग मस्तच! मला पण माझ्या ह्या भाईमामांची नेहेमीच आठवण होते!:) कसं बालपण उजळून टाकतात काही जणं! नाही का?

हेरंब said...

मला सौरभ आणि सारिका दोघांच्याही कमेंट्सना +१ करावसं वाटतंय.. करतोच..

सौरभ + १
सारिका + १

:D

Anagha said...

:D :D आभार हेरंब! :)

Aakash said...

Hehe! Asa ullu mi pan baryachda zaloye!
".... ani mag to raja tyachya mothya palangawar adva padto ani ghoru lagto....kasa?"
"garr garr grrr"
mala matr ha goshticha bhag wataycha ani babache kharrate aikat zopi jaycho.

Anagha said...

हेहे!!! आकाश!!!! :D :D
किती ना आपल्याला बावळट ठरवायचे हे मोठे लोक!! :D

भानस said...

सौरभ+१
सारिका+१
हेरंब+१... :D

अगं, पण शेवटी गोष्ट पुरी झाली का अजूनही...

Anagha said...

नाही ना गं!! माहितीच नाही काय झालं सोनेरी सफरचंदांचं ते! तुला माहितेय का? ;) :)

THEPROPHET said...

सौरभची प्रतिक्रिया अन माझी प्रतिक्रिया एकदम सेम!!!! डिट्टो!!! :D:D

Anagha said...

हीही!! :D :D

Raindrop said...

so cute :) now u can start a new series of 'Little Ana' :)

Anagha said...

:) किती हसू येतं मला ते आठवून पण वंदू! काही आठवणी अशा असतात ना कि आपल्याला हसतच ठेवतात! :)

Unknown said...

Tuze laadke mama, laadke ajoba pan hote :) amche aajo :)

Anagha said...

:) हेहे! आभा! हे माझे भाग्य कि मला असे मामा मिळाले..आणि हे तुझे भाग्य कि असे तुला 'आजो' मिळाले!
सध्याच्या काळात मला त्यांची खूपखूप आठवण येते! :'(