नमस्कार

नमस्कार

Pages

Friday, 17 December 2010

क्षणार्ध

ठाकुर्ली स्टेशन. फारसं न गजबजलेलं. सकाळी दहाची वेळ तर तशी रिकामीच म्हणायची. आणि त्यातून शनिवार. प्लॅफॉर्मवर पोचले तर एक ट्रेन उभीच होती. जशी काही माझीच वाट पहात. मी चढले आणि तिने तिचं बुड हलवलं. आत शिरावं. नशीब असेल तर जागा मिळून जाईल असा विचार करत मी दोन पावलं पुढे सरकले आणि प्रचंड कोलाहल झाला. मुंबईच्या ह्या रोजच्या गाड्या. जसा काही यमाचा फास. बारा गाठींचा. एखादी गाठ गळा लागली की कारभार आटोपलाच म्हणायचं. मागे वळून बघितलं तर एक आई आणि तिचं छोटंसं बाळ आत शिरले होते. आई जशी बालिका बधू आणि बाळ जेमतेम चार पाच महिन्यांचं. आईच्या खांद्यावर मोठी भरलेली बॅग. कडेवर बाळ.

कोलाहल उठला होता त्यातून एकच भयावह प्रसंग घडून गेलेला कळत होता. ती मुलगी बाळाला कडेवर घेऊन चालत्या गाडीत शिरली होती. शिरली कसली दारातल्या बायकांनी तिला आत खेचूनच घेतली होती. क्षणार्धात दोन जीव वाचले होते. आणि म्हणून सगळ्या बायकांनी तिची अक्कल अभ्यासाला घेतली होती. मुलगी थरथरत होती. सर्वांगातून. बाळाने भोकाड पसरलं होतं. ते काही न कळून पण डब्यातील लोकं आईकडे बघून जोरजोरात बोलत आहेत हेच बघून असावं. त्या आरडाओरड्यात बाजूच्या पुरुषांच्या डब्याचा देखील सहभाग.
ती उभी होती तिथेच मटकन बसली. डोळ्यातील पाणी हळूहळू वरवर चढत होतं. मग पूर गालावर वाहू लागला.
"पण मी त्याला सांगत होते...नको पकडूया ही गाडी म्हणून..."
"मग काय झालं?"
मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये कोणीच एकमेकांना परकं नसतं.
"तो म्हणाला मिळून जाईल."
"अगं, नवऱ्याला अक्कल नाही पण तुला कळत नाही?"
आता मुलगी आणि बाळ दोघेही रडायला लागले होते. ती हमसाहमशी आणि बाळ जोरदार भोकाड.
"जाऊ द्या हो. आहेत ना सुखरूप... उगाच आणि नका घाबरवू." सल्ला दिला गेला आणि मानला देखील गेला. हळूहळू आई आणि बाळ शांत झाले.

डबा आपापल्या गप्पांत पुन्हा रंगला. मला घाटकोपर पार झाल्यावर चवथं का होईना पण आसन मिळून गेलं. बसल्या जागेवरून मायलेकी दिसत होत्या. अजूनही दारात बसलेल्या. आता बऱ्याच सावरलेल्या. स्टेशनं आली गेली. डब्यात आवकजावक झाली. एकूण डबा भरलेलाच राहिला.

दादर जवळ येऊ लागलं. मी उठले. तीही लेकीला कडेवर घेऊन दारात मागेच उभी राहिली. मी पुढे झाले. दोघींचे चेहेरे वादळाच्या खुणा सोडून गेलेले. आम्हीं दोघी उतरलो.

पुरुषांच्या गर्दीतून तिचा नवरा पुढे आला. तिने त्याच्याकडे बघितलं. माझी नजर तिच्यावर खिळलेली. तिचे डोळे त्याच्याकडे लागलेले. आणि त्याचे? ना त्याने घेतली तिच्याकडून ती जड बॅग ना त्याने घेतलं तिच्या खांद्यावर रडून निरागस झोपून गेलेलं त्याचं बाळ. ना त्याला दिसला तिचा केविलवाणा रडवेला चेहेरा.

तिची काही अपेक्षेने त्याच्याकडे लागलेली नजर वळली आणि आणि आमची दोघींची क्षणभर नजरभेट झाली. केविलवाणं हसली ती...तेव्हां का कोण जाणे पण माझ्या हृदयात काळ्या ढगांची दाटी झाली आणि डोळ्यांत पाणी जमा होऊ लागले...

19 comments:

रोहन चौधरी ... said...

खरच.. ९९ टक्के पुरुष ह्या बाबतीत जरा मूर्खच असतात... :) आणि प्रत्येक जण ह्या ९९ टक्क्यांमध्ये कधी ना कधी पडतोच हा... :D

अनघा said...

नशीब त्या मुर्खपणात तिचा आणि त्या बाळाचा नाहक जीव नाही गेला...

हेरंब said...

तू शेवटच्या परिच्छेदात जसं लिहिलं आहेस अगदी तसं मला आत्ता वाटतंय !! :(

किती निर्ढावलेपणा आहे हा !!!

अनघा said...

:(

दीपक परुळेकर said...

नेहमीचं आहे गं हे, कितीवेळा तरी बघितलयं!!
पुरुष नाही सुधरत, खरं तर माझ्याही बाबतित असाच एक किस्सा झाला होता आणि जर का त्यावेळी काही झालं असतं तर मी स्वताला कधी माफ करु शकलो नसतो.
तेव्हापासुन कानाला खडा!

अनघा said...

दीपक, हे तू लिहू शकलास हा तुझा मोठेपणा. धन्यवाद रे प्रतिक्रियेबद्दल.

नीरजा पटवर्धन said...

किती साधे सोपे अनुभव आपण रोजचे रोज घेत असतो. आणि ते तू इतके छान आणि जवळजवळ रोजच मांडतेस याबद्दल प्रथम तुला दंडवत. लिहिण्यातला छानपणा(दर्जा हा शब्द हल्ली इरिटेट होतो म्हणून छानपणा!) आणि सातत्य दोन्ही साधण्याची तुझी हातोटी मलाही लाभो ही आशा, इच्छा. :)
आता अनुभवाबद्दल. माझ्याही गळ्यात आवंढा आलाच. इथेतिथे अनेकदा भेटलेल्या अनेक वेगवेगळ्या बाया आठवून गेल्या.

अनघा said...

आभार गं नीरजा. व्यथा ह्या दारोदारच्या. कधी पुरुषांपर्यंत पोहोचतील काय...?

सौरभ said...

तो जो कोणी नवरा आहे तो माझ्या डोक्यात गेलाय. श्या... आणि कोणत्याही स्त्रीने असं घाबरुन का रहावं समजत नाही मला. असल्या नवऱ्यांच्या पेकाटात लाथ घाला.

अनघा said...

hmmmm

Raindrop said...

very beautifully captured, the essence of a happening which could have easily been missed by an insensitive person. we are literally travelling in two dabbas all our lives...purush dabba n stree dabba. haven't seen a man saying ...'tu za ga ladies dabbyaat ekti, me smbhalen children n luggage...

अनघा said...

:( that's so true Vandu!

Soumitra said...

saglech purush kahi evadhe vait nastat , hyala mi swarthipana mhanin kiva convinience apli jababdari dusryacha angavar dhaklyachi savay bahutek stree & purush doghana hi titkich aste, but that husband must be real stone hearted for sure, very nice post like eye opener for everyone who doesn't wanna share there own responsibilities out of love towards family.

भानस said...

नवर्‍याला मधल्या काळात काय अनर्थ घडणार होता हे कळले होते का पण? अर्थात तिचा रडवेला चेहरा पाहून किमान त्याने काय झाले विचारायलाच हवे होते. शिवाय बाळ किंवा खांद्यावरची बॆग तरी घ्यायला ....

खरं तर मला नेहमी प्रश्न पडतो, बायका ( त्यात मीही आलेच ) ठामपणे का बोलत नाहीत? ही ट्रेन मी धावून पकडणार नाही तुला जायचे तर जा आणि माझी वाट पाहा मी पुढच्या ट्रेननेच येईन.

ही मुखदूर्बलता अनेकदा जीवघेणीच ठरते तरीही बायका सुधरतच नाहीत... विषाद वाटतो.

अनघा said...

नाही जमत खरं हे भाग्यश्री...आभार गं प्रतिक्रियेबद्दल.

श्रीराज said...

तू ऐकवलेल्या व्यथा निदान तुझ्या पुरुष अनुयायांपर्यंत तरी नक्कीच पोहोचतायत.

अनघा said...

:) प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद श्रीराज.

THE PROPHET said...

>>तू ऐकवलेल्या व्यथा निदान तुझ्या पुरुष अनुयायांपर्यंत तरी नक्कीच पोहोचतायत.
पण मी हल्ली दोष देत नाही कुणालाच...आपण प्रत्येकचजण कधी ना कधी कुणाला ना कुणाला कसं ना कसं गृहित धरतो.. :(

अनघा said...

विद्याधर, एव्हढं मागचं राहिलेलं वाचतोयस आणि आवर्जून प्रतिक्रिया लिहीतोयस ह्याबद्दल खरोखर खूप खूप आभार! :)