नमस्कार

नमस्कार

Pages

Monday 6 December 2010

माज

पापलेटच लाल कालवण, तळलेल्या सुरमयीच्या चमचमीत तुकड्या, कुरकुरीत बोंबील, आंबट सोलकढी. त्याचे मित्र जेवायला घरी येणार म्हणून हा बेत. जेवण तर छान झालं होतं.
मित्र जमले. गप्पा रंगल्या. बाटल्या रिकाम्या झाल्या. घड्याळ धूसर झालं.
चार वर्षांच्या लेकाचं तर जेवण झालं. पण भरलेल्या ग्लासांनी धारण केलेलं 'द्रौपदीच्या थाळी'चं चमकतं रूप, कधी आटोपणार ते नव्हतं उमगत.
'वाढू का आता?" तिने घड्याळ शिकून दशकं उलटली होती. छोटा काटा तीनावर पोचला होता. आणि मोठा बाराच्या पुढे. त्या खोलीत त्यावेळी चार विमानं झोकांड्या घेत होती.
"हं. वाढ." त्याने भरलेला ग्लास पोटात रिकामा करत तिला परवानगी दिली.
ताटं घेतली गेली. दर्शनी दिसणारी 'माणसं' जमिनीवर रांगेत जेवायला बसली.
मस्त. सॉलिड. जड जिभांनी घरच्या लक्ष्मीला दाद दिली.
दहा मिनिटांतच, बसल्या जागी पोटातल्या दारूने सुग्रास जेवण बाहेर फेकलं. दोघांना उलटी झाली. सगळेच तरंगणारे. ताटं जेमतेम रिकामी झाली. उठले. तोंड धुवून गप सोफ्यावर बसले.
काही दिवसांपूर्वी घटना तशीच घडली होती. मित्र वेगळे होते.

छतापासून जमिनीवर टेकणाऱ्या खिडक्यांचा लांबसडक हॉल. नेहेमी स्वच्छ सुंदर नीटनेटका. आता पसरलेली उष्टी ताटं. अस्ताव्यस्त. त्यात त्या उलट्या. ओट्यावर झाकलेली भांडी. सिंकमध्ये उंच झेपावलेला खरकटा डोंगर. काय करायचं आता ह्याचं? कुठून सुरुवात करावी? तिने त्याच्याकडे बघितलं. तो त्या क्षणी तिचा कोणीच नव्हता. सोळाव्या वर्षी जेव्हा तिने त्याला म्हटलं, तुझी सर्व दु:ख माझी, त्यावेळी आपल्या सादेला प्रतिसाद काय आला आहे ते तपासायचं राहूनच गेलेलं.

आता स्वत:च्या पायावर जेमतेम उभं रहाता येणारे तिथून निघाले त्यावेळी ती बसून होती एकटक त्या तिच्या भरल्या घराकडे बघत. आता नेहेमीची केरलादी करणारी येईलच. मग काय तिला लावू हे आवरायला? का करावं आणि तिने हे? का पुसावी ही बरबटलेली लादी? केरलादी करण्याचा मी तिला पगार देते म्हणून? तिचा नवरा दारुड्या आहेच. तिच्या घरी तर ती हे नेहेमीच करते. मग? तिने ही माझ्या नवऱ्याची आणि त्या कोण त्याच्या मित्रांची घाण देखील उचलावी? तिने नाही म्हटलं माझ्या नवऱ्याला...तुझी सगळी दु:ख माझी म्हणून.
मांडीवर झोपून गेलेल्या निरागस लेकाला उचलून तिने बिछान्यात झोपवले आणि ताटं उचलायला घेतली. बाजूलाच नवरा स्वत:च्याच धुंदीत मस्त झाला होता....

अर्धा तास गेला. तिचं घर कसं पुन्हा चमकू लागलं.
बाई आली तेव्हा अगदी थोड्याच वेळापूर्वी झालेल्या आत्मसन्मानाची राख देखील तिथे नव्हती उरली.

"सरिता, किती त्रास करून करून घेणार आहेस ह्याचा?"
संध्याकाळ झालेली. आम्हीं दोघी समुद्रावर होतो. तिचा लेक खेळत होता. ती बसली होती दूर नजर लावून. मी काय करणार....घट्ट मिठी मारली तिच्या खांद्याला आणि जवळ ओढलं. तिला. तिचं दु:ख मात्र बसलं होतं....माज आल्यासारखं...फुगून.

18 comments:

Raindrop said...

Sometimes 'Nasheeb' is something no one has control on...and marriage is one of things so dependent on nasheeb....either u luck out or bad luck decides whom you marry. I feel for her.

I am sure when she was having the baby n vomitting...no one came to clear her up...she must have had to do that herself as well :(

Anagha said...

:)

THEPROPHET said...

कधी कधी सगळे खेळ वाटतात...प्रारब्धाचे खेळ! :(

Anagha said...

खरं आहे विद्याधर.

हेरंब said...

बापरे !! कठीण आहे.. :(

रच्याक, तुझ्या प्रत्येक पोस्टमध्ये एखादी नवीन ग्रेट उपमा असतेच.. या पोस्टमध्ये "भरलेल्या ग्लासांनी धारण केलेलं 'द्रौपदीच्या थाळी'चं चमकतं रूप" , 'बोट'मधला "सावळ्या आभाळात पंख पसरून निळा भारद्वाज." .. सहीच !! जिओ !

Anagha said...

:) हेरंब, धन्यवाद. मनापासून लिहिते एव्हढंच. मग हे लिहिता लिहिता कधी असं स्क्रीनवर उतरतं. :)

संकेत आपटे said...

तुमचे लेख नेहमीच चांगले असतात. आता नेहमी वेगळी प्रतिक्रिया कशी देऊ? तेव्हा आतापासून तुमच्या प्रत्येक चांगल्या लेखाला माझी एकच प्रतिक्रिया: छान, सुंदर, मस्त :-)

Anagha said...

संकेत, पण हे म्हणजे...मग मी आता काय करू?! कारण एकदा विद्याधर पण असंच म्हणालेला! की मी रोज उठून व्वा व्वा करणार नाहीये! पण मग मला कसं कळणार की केलेला पदार्थ चांगला झालाय कि नाही?! :(
:)

संकेत आपटे said...

अहो, तुमचे सगळेच पदार्थ चांगलेच होतात. आता प्रत्येक चांगल्या पदार्थासाठी वेगळा शब्द शोधायचा तर मराठी भाषाही अपुरी पडेल. तेव्हा यापुढे चांगल्या पदार्थांसाठी एकच प्रतिक्रिया. ‘छान, सुंदर, मस्त’ अशी प्रतिक्रिया नसली तर समजा की केलेला पदार्थ वाईट झाला आहे... ;-)

भानस said...

कधी तरी कुठल्यातरी पुरषाच्याही प्रारब्धात हे असावं... ही बिनपगारी चाकरी झुगारुन देण्याची ताकद आली की माज दाखवणारेही सरळ रेघेत चालायला शिकतात.

कुठेतरी खोलवर टोचलंच... :(

Anagha said...

नाही उतरत हा माज भाग्यश्री. कितीही अगदी स्वत:च्या पायावर उभं राहायला का शिकेनात तुम्ही....

Anagha said...

हीही!! संकेतबुवा, म्हणजे तुम्ही मौनातून सर्व साधणार तर! :)

सौरभ said...

>> "भरलेल्या ग्लासांनी धारण केलेलं 'द्रौपदीच्या थाळी'चं चमकतं रूप"
आयला कसलं सॉल्लिड है राव... कमाल...

पण अरेरेरे... एवढा भारी मेन्यू वाया गेला... श्या... नाही पटलं राव... आणि शिवाय प्यालेली दारूपण. खरंय... दारुला सगळ्यात जास्त बदनाम दारु पिणारेच करतात.

Anagha said...

सौरभ, धन्यवाद.
आणि तुझं दुसरं म्हणणं खरंच आहे...दुर्दैवाने.

नीरजा पटवर्धन said...

नमस्कार, अचानक तुमचा ब्लॊग नजरेस पडला. आवडला. भाषाशैली खूपच मस्त. सहज आणि प्रामाणिक. पुलेशु.
-नीरजा पटवर्धन

Anagha said...

खूप खूप आभार नीरजा. :)

BinaryBandya™ said...

बाई आली तेव्हा अगदी थोड्याच वेळापूर्वी झालेल्या आत्मसन्मानाची राख देखील तिथे नव्हती उरली.

अप्रतिम लिहलय ...

Anagha said...

बायनरी बंड्या, धन्यवाद. :)