नमस्कार

नमस्कार

Pages

Tuesday, 30 November 2010

फलित

बाहेरगावी पाच दिवस चालू असलेल्या शूटवरून नेमके ६ डिसेंबरला मुंबईत प्रवेश करणार होतो. हे अकस्मात लक्षात आलं. आणि धाबं दणाणलं. या दिवशी शिवाजी पार्क परिसराच्या आसपास असणारा माणसांचा लोंढा आपण कुठल्या वेगळ्याच विश्वात अवतरलो आहोत असा भास आणतो.

टॅक्सीत आम्ही चौघे होतो. फोटोग्राफर साकेत, त्याचे दोन सहकारी- आशिष, शेखर आणि मी. पुढील चार महिने चालणाऱ्या एका कामाचा हा पहिलाच टप्पा होता. आम्ही जळगावपर्यंत विमानाने जाऊन त्यानंतर सहा तासाच्या अंतरावर असलेल्या एका गावी गेलो होतो. काम चांगले पार पडले होते. एकमेकांना सोडत, मुंबई विमानतळावरून आपापल्या घरी निघालो होतो.

दर वर्षी ६ डिसेंबरला आमच्या घराच्या आसपासचे बरेच रस्ते एकमार्गी केले जातात. म्हणजेच मला दूर नाक्यावर टॅक्सी थांबवून जड बॅग खेचत घरी जाणे भाग होते. त्या कारणास्तव माझी कटकट सुरु झाली. साकेतने एकदोन वाक्ये ऐकून घेतली. आणि तिसऱ्या वाक्याला कोणाला दिसू नये इतपत काळजी घेत डोळे वटारले. मला कारण काही फारसे कळले नाही. परंतु आपण विशेष काही करमणुकीचे बोलत नाही आहोत इतपत कळले. तोंड गप्प केले आणि पाच दिवस न बघितलेली मुंबई पुन्हा नजरेत भरून घ्यावयास सुरुवात केली. आशिष व शेखर आधी उतरले. मी आणि साकेत बाकी राहिलो. वाहन पुढचा रस्ता कापू लागले.
"तू उगाच काही बोलशील आणि आशिष दुखावला जाईल असे मला वाटले म्हणून तुला खुणावले." अधिक काही साकेत नाही बोलला तरी त्याची भीती माझ्यापर्यंत पोचली. तोपर्यंत माहीम चर्च मागे गेले होते. शिवाजी पार्कचा बदललेला परिसर दिसू लागला होता. गजबज. पांढऱ्याशुभ्र रांगा. निळ्या ओढण्या. "मी फक्त बंद केलेल्या रस्त्यांबद्द्ल तक्रार करत होते." विषय संपला. माझा सिग्नल आला. मी आणि बॅग एकमेकींना सावरीत घरला निघालो.

पुढील चार महिन्यात आम्ही चार वेळा पाच दिवसांसाठी एकत्र फिरलो. आंध्र प्रदेश, गुजरात आणि दोन वेळा महाराष्ट्र. आंध्र गलिच्छ, महाराष्ट्र जेमतेम आणि गुजरात बहरलेलं. एकूण वीस दिवस एकत्र राहिलो. मिळेल ते एकत्र खाल्लंप्यायलं. पहाटे पाच वाजता उठून, थंडीत रस्त्याला लागून, झुंजूमुंजू कॅमेरॅत पकडलं. कापूस फुललेला. पांढरा बर्फ जसा रोपारोपावर विसावलेला. कापसाची बोंड पहाटे दवबिंदूंनी चिंब होतात आणि सुर्यकिरणांनी त्यांची ओलेती अंगे पुसून दिल्याशिवाय ती अजिबात जागी होत नाहीत हे ज्ञान तिसऱ्या खेपेला झालं. ह्याचा स्पष्ट अर्थ असाच होता की आमचं मॉडेलच मुळी आळशी होतं आणि दहा वाजल्याशिवाय मेकअपरुममधून बाहेर येत नव्हतं! असे एकेक अनुभव घेत आमचे चार महिने गेले. क्लायंटसाठी कापूस आणि प्रगतशील शेतकरी ह्यांची चांगली तगडी इमेजबँक तयार झाली. त्यामुळे सगळेच आनंदात. आजचा शेवटचा दिवस होता. माणसं उमजून घ्यायला वीस दिवस तसे पुरेसे होते. परत एकदा आम्ही चौघे टॅक्सीत होतो. गुंटूरवरून हैद्राबाद विमानतळावर निघालो होतो.
"संपलं की साकेत आपलं शूट!"
"हो यार! मजा आली. नाही का?"
"I hope सगळ्यांनाच आली! काय रे आशिष?"

आशिष मितभाषी. काळा सडसडीत. उंच. वय वर्ष असावं २१/२२. फोटोग्राफरला धरून असलेल्या पाचांच्या टीममधील सर्वोत्तम माणूस. अतिशय सुंदर संस्कार असलेला हसरा आशिष. वीस दिवसात तक्रार काडीची नाही. आउटडोअर शूटमधील आपल्या कामात चोख. आत्मविश्वास अपार. उन्हातान्हात हसतमुख. कापसाच्या शेतात साग्रसंगीत शिरताना रोपांना अलगद जपणारा. पाचांच्या टीम मध्ये समद्यांच्या भाषेत सांगायचं झालं तर बाईमानूस म्याच! मग रिकाम्या वेळात सगळे गावात उंडारायला गेले की हा आपला माझ्या रक्षणार्थ उभा. टेबलावर समोर जेवायला बसला तर हा इतका नीट जेवणार की मला समोर तोच बसावा पण आमचे इतर वेडेबागळे मित्र बसू नयेत असं वाटावं.

"आशिष, घरी कोणकोण असतं?
"आई बाबा आणि धाकटी बहिण."
खोलात शिरायचं मला काहीच कारण नव्हतं.
"तुझ्या आईबाबांना एक सांगशील आशिष?"
"काय?"
"त्यांना म्हणावं, त्यांनी त्यांच्या मुलाला उत्तम वाढवलं. खूप चांगले संस्कार दिले."
"सांगेन मॅडम! आई एकदम खुषच होऊन जाईल." आशिष हलकंच हसला.

झाली या गोष्टीला दोन वर्ष. कधी साकेत भेटला की म्हणतो,"अरे, शेखर, आशिष सगळे तुझी नेहेमी चौकशी करत असतात!"
"त्यांना सांग, मला देखील त्यांची आठवण नेहेमी येते. विशेष करून आशिषची." मी हसते.

काही माणसं, मनात घर करून रहातात.
तसाच राहिला माझ्या मनात हा माझा देशबंधू.
इतिहासाने विनाकारण चिकटलेला जातीधर्माचा बिल्ला कधीच भिरकावून.


साकेतने टिपलेला ओलेता कापूस ! :)

20 comments:

Raindrop said...

anagha mazha ek kaam karsheel?? aai la sangsheel 'she raised her daughter so well' :) aur tere Dad ko main meri mom ke thru message bhej doongi...dono oopar baith kar discuss karte honge ye sab.

kahaan se aate hain tere man mein aise vichar jo hain to chhote se but kisi aur ke liye kitne bade hote hain :) very nice post. i didn't know this had happened...felt so nice while reading.

अनघा said...

सगळे इतके दिवस भारतभर, गावागावांत फिरत होतो...छान झाली होती आमची टीम!
बाबा माझे एकदम खुश होऊन जातील मॅडम हे ऐकून! :)

सौरभ said...

:) :) :) किती अनुभव... छोटेसेच... पण खासे एकदम... केवढे छान मांडलेत... कसं काय जमतं राव एवढं खुबीने मांडायला???

अनघा said...

काचेचे छोटे छोटे बिलोरी तुकडे सौरभ. :)

THE PROPHET said...

मस्तच...तुमची अनुभवांची शिदोरी अशीच वाटत राहा आमच्याशी!

अनघा said...

शिदोरी... :) अगदी दूरच्या सहलीला निघाल्यासारखं...चटणी व भाकऱ्या सोबत घेऊन! आभार विद्याधर. :)

हेरंब said...

मस्त लिहिलंयस.. खरंच.. असे जातीपातींचे सफिक्स न लावता सगळे जण एकमेकांना ओळखायला लागले तर किती बरं होईल ना?

हेरंब said...

आगाऊपणा : तू हे वर्ड व्हेरिफिकेशन काढून का टाकत नाहीस?

संकेत आपटे said...

तुम्ही खूप छान लिहिता. Short and Sweet.

अनघा said...

हेरंब, काल मी एका दिवाळी मासिकात वाचलं. एका बाईने स्वतःच्या विझिटिंग कार्डावर फक्त स्वत:चं नाव छापलंय...आडनाव नाही. कारण आडनावाला जात चिकटलेली असते. :)
आणि ते 'वर्ड व्हेरिफिकेशन' मी काढून टाकलं तर काही धोका नाहीये ना?

अनघा said...

संकेत, आम्ही तुमचे आभारी आहोत! :p

sanket said...

छान लिहंलंय, नेहमीप्रमाणेच.. अजूनही लोक स्वभाव आणि जातीचे संबंध जोडू पाहतात. माणसाला माणूस म्हणून बघणे जास्त महत्त्वाचे . आडनावाला जात चिकटली असते, अगदी खरे !
word verification काढ ताई.. धोका नाही.

अनघा said...

धन्यवाद संकेत. :)

Gouri said...

मस्त! आणि वर्ड व्हेरिफिकेशन काढल्याबद्दल थॅन्क्यू!

अनघा said...

:) जगभर चौकशीअंती हे केलंय गौरी! आणि आभार!:)

हेरंब said...

वर्ड व्हेरिफिकेशन काढल्याबद्दल किती थॅन्क्यू मिळतील हे मोजत रहा आता ;)

अनघा said...

हो नं हेरंब! सकाळपासून सगळ्यांनी हुश्श म्हटलेलं ऐकू येतंय मला! मी आता तुझे आभार मानते! आणि स्वामी संकेतानंदांचे! :)

भानस said...

मने जुळायला ना रंग, वर्ण, जात, भाषा, वय... काहीच आड येत नाही हेच खरं.

सहीच!

अनघा said...

भाग्यश्री! इतक्या दिवसांच्या गॅपनंतर खरं तर थकली असशील ना सगळ्यांचं लिखाण वाचून वाचून! खूप खूप आभार ग आवर्जून वाचल्याबद्दल! :)

अनघा said...

वंदू, विचार करता मला आता जाणवतं कि का मला आशिषच्या आईला हा निरोप द्यावासा वाटला. अगं, कोणी आता मला सांगितलं ना कि छान वाढवलयस हं तू तुझ्या लेकीला कि मग मला ना एकदम ते 'कृतकृत्यच' होतं! ह्या कामात किती दिवस रात्र एक केले गेलेले असतात. रक्ताचं पाणी केलं गेलेलं असतं...त्यामुळे मग ज्याचं श्रेय त्याला नको का मिळायला? हो कि नाही? :)