नमस्कार

नमस्कार

Pages

Sunday, 21 November 2010

बाई

"अनघा पाटील कोण आहे ह्या वर्गात?"
बाईंनी हा प्रश्न विचारला आणि माझे पाय लटपटले. धाबं दणाणलं. आठवीची सहामाहीची परीक्षा नुकतीच पार पडली होती. बाईंच्या हातात आमच्या उत्तरपत्रिका दिसत होत्या.
मराठीच्या बाई. 'पिटा'. त्यांच्या मूळ नावाचा विसर पडावा इतके हे नाव अंगवळणी पडलेले. असं नाव त्यांना का आणि कोणी दिलं होतं, ही ऐतिहासिक माहिती काळाच्या ओघात कधीच नाहीशी झालेली होती. रंग काळा. अगदी कुळकुळीत. कोपऱ्याच्या खाली आलेल्या बाह्यांचा पोलका. गचाळपणे अंगाभोवती गुंडाळलेली तरंगती साडी. टाळू अगदी दिसून येईल इतके तेल थापून बसवलेले केस. त्यातही करड्या केसांची संख्या जास्त. खोल डोळे. सुरकुतलेला चेहेरा.
मग चांगले काय?
मराठीचा तास सुरु व्हावा. बाईंनी डाव्या हातात वह्यापुस्तकं आणि उजव्या हातात डस्टर घेऊन वर्गात शिरावं. बालभारतीचं पुस्तक बाईंनी उघडावं आणि दस्तुरखुद्द विंदा करंदीकर सुरु व्हावेत....
देणा-याने देत जावे
घेणा-याने घेत जावे...
हिरव्या पिवळ्या माळावरुनी
सह्याद्रीच्या कड्यावरुनी
छातीसाठी ढाल घ्यावी...

बाई, एक दिवस तुम्ही माझं नाव पुकारलं त्यावेळी अख्खा वर्ग बुचकळ्यात पडला होता. मी घाबरले. उभी राहिले. आणि मग तुम्ही काही वेगळेच बोललात. " मराठीच्या पेपरमध्ये अनघाने लिहिलेला निबंध तुम्ही सर्वांनी वाचा! 'यमराज संपावर गेले तर'. तो कल्पना विस्तार वाचा. ती निबंधाची धाटणी बघा." मी खाली बसले तेव्हा सगळा वर्ग चकित होता. जाईने मला विचारलं," काय गं, तुला काय झालं एकदम?"
दहावी आली. बीजगणित गळ्याशी आलं. x ची कातरी आणि y ची लाथ! संधी, समास, अलंकार....सर्व बाजूला पडले. दर रविवारी मात्र मटा ताब्यात घ्यावा आणि ह. अ. भाव्यांच्या कोड्यात अडकून पडावं!

दहावी झाली. मराठी की चित्रकला ह्या संग्रमात रंग आणि कुंचले जिंकले. मी जे जे स्कूल ऑफ अप्लाइड आर्टचा रस्ता धरला.

वर्षे ओलांडली ह्या घटनेला. पण तुम्ही पेरलेली बी कधी सुकली नाही. ज्यावेळी ह्या पाश्चात्य धर्तीच्या माझ्या रोजीरोटीच्या ऑफिसमध्ये, कोणी एखादा ऑस्ट्रेलियन एशियन हेड मला म्हणतो,"You are an art director? I always thought you are a writer!"...त्यावेळी बाई, तो तुम्ही पेरलेल्या बीला पाणी घालत असतो. खत घालत असतो.

काल तुमची खूप आठवण आली.
वाटलं...तुम्ही वर्गावर यावं...
बालभारती उघडावं...
आणि साक्षात महानोर तुमच्या रूपाने आम्हां सर्वांसमोर बसावेत...
या नभाने या भुईला दान द्यावे
आणि या मातीतून चैतन्य गावे
कोणती पुण्ये अशी येती फळाला
जोंधळ्याला चांदणे लगडून जावे...

कल्पना विस्तार तुम्ही फुलवत न्यावा...
या भुईचं, त्या नभाचं...तुम्ही रसग्रहण करावं...

तास कधी संपू नये...ती घंटा कधी वाजूच नये.

बाई, कालचा 'स्टार माझा- ब्लॉग माझा'चा निकाल वाचला...
आणि तुमची आठवण झाली.
काळाच्या पडद्याआड तुम्ही कधीच निघून गेलात...
परंतु, मराठीतील...प्रत्येक ओळीत आणि प्रत्येक शब्दांत...
जश्याच्या तश्या आहात तुम्ही...

पायाला स्पर्श करते बाई...
मला आशीर्वाद द्यावा...

51 comments:

rajiv said...

अनघा, अभिनंदन . त्या `बाईंचे पण मनापासून अभिनंदन व आभार, एक लेखिका घडवल्याबद्दल !!!
आणि त्यांचे ऋणाची जाणीव तुझ्या मनात आजतागायत जागी असल्याबद्दल तुझे पण ...!!!

अनघा said...

राजीव, आभार! :)

हेरंब said...

>> You are an art director? I always thought you are a writer!
+ १

'ब्लॉग माझा'च्या यशाबद्दल हार्दिक अभिनंदन.. !!!

Anonymous said...

अभिनंदन! अभिनंदन! अभिनंदन!

Salil Chaudhary said...

अभिनंदन! अभिनंदन! अभिनंदन!

अनघा said...

हेरंब, तुझं पण खूप खूप अभिनंदन!!! आणि आभार रे!!! :)

Raindrop said...

congratulations :) writer-art director madam :)

nibandh class samor vachtana tula jo garv feel hot hota...mala tujha blog roz vachun tasach garv hoto tujhyavar :)

अनघा said...

आभार ग वंदू!! :) असे तुम्ही सगळे रोज येता आणि प्रतिक्रिया देता ह्याचं मला खूप अप्रूप वाटतं ग! आणि त्यानेच तर उभारी येते! :)

सौरभ said...

:D :D त्यानंतर बाईंनी कधी विचारलं नसेल "अनघा पाटील कोण आहे ह्या वर्गात?" उलट, "अनघा पाटील शिकते तो हा वर्ग आणि मी तिची शिक्षिका" अशी ओळख नक्कीच झाली असेल.

अनघा said...

अनामिक, आभार, आभार, आभार! :)

अनघा said...

बापरे! सौरभ! :p

अपर्णा said...

अनघा....कित्ती मस्त लिहिलंस गं तू......खर तर तुझा ब्लॉग आणखी थोडा वर असला असता असं माझ वैयक्तिक मत...:)
अभि आणि नंदन

panda said...

अनघा, सुरेख post झालीये.....हार्दिक अभिनंदन (त्रिवार)..'ब्लॉग माझा'च्या यशाबद्दल!!! मला माझे मास्तर आठवले.....अगदी "पु.लं." च्या "दामले मास्तर" सारखे......अगदी त्यांच्याच शैलीत बोलायचे...."अरे निबंध लिहीलायेस कि xxxलायेस वहीत"....बरे झाले ना....नाहीतर मी देखील एखादा लेखक झालो असतो. :)
Pankaj Daga

भानस said...

मन:पुर्वक अभिनंदन! :)

Sach Deshmukh said...

नमस्कार अनघा,

अभिनंदन ..!!
अगदी छान लिहिलंस.. नेहेमीसारखं ओघवत आणि सहज ..

आणि हो ..
You are an art director? I always thought you are a writer!
+ २

सुहास झेले said...

अप्रतिम..आणि हो अभिनंदन :)

अनघा said...

सलील, आभार! :)

अनघा said...

अपर्णा, खूप खूप आभार गं! तुम्हां सर्वांच्या पाठिंब्याच्या जोरावर मारते मी ह्या उड्या! खूप धन्यवाद! :)

अनघा said...

पंकज! (चला, त्या निमित्ताने नाव कळलं तुझं! ;) ) खूप आभार रे! मला ना तुमच्या सगळ्यांच्या प्रतिक्रिया वाचल्या ना कि हुरूपच येतो बाबा!! जसा खूप वर्षांपूर्वी माझ्या मराठीच्या बाईंच्या शाबासकीने आला होता! :)

अनघा said...

सचिन :) हो...गोंधळच आहे हा! म्हणजे माझे कॉपी रायटर्सना ना वैताग! मी त्यांच्या लिखाणात नाक खुपसायला लागले कि! ;) धन्यवाद हं सचिन!

अनघा said...

सुहास, आभार! :)

अनघा said...

भाग्यश्री! बाई गं, किती miss करत होते मी तुझ्या प्रतिक्रिया! आभार गं!

davbindu said...

अभिनंदन! अभिनंदन! अभिनंदन!

You are an art director? I always thought you are a writer!
+ 3

अनघा said...

दवबिंदू, भेसळ आहे! ;) प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद! असेच येत रहा! :)

rajiv said...

दोन चांगल्या गोष्टींच्या एकत्र येण्याला भेसळ नाही म्हणत ..:)
(भेसळीमध्ये एक अस्सल व इतर कमअस्सल असते )
इथे फारतर `मिसळ' म्हण ..!

अनघा said...

:D बरं, मिसळ! :)

BinaryBandya™ said...

अभिनंदन ...

अनघा said...

बायनरी बंड्या, तुम्हां सर्वांच्या शुभेच्छांनी चालू आहे प्रवास. :)

THE PROPHET said...

आमच्या शाळेतल्या सगळ्या बाई आठवल्या, ज्यांनी ज्यांनी वेगवेगळे संस्कार दिलेत.
तीन वर्षांपूर्वी शाळेत गेलो होतो...आता ह्या सुट्टीत परत जाईन...
आणि खूप अभिनंदन स्पर्धेतल्या यशाबद्दल!

zampya said...

ब्लॉग माझा मधील यशाबद्दल अभिनंदन...बहुतेक पहिल्यांदाच तुमच्या ब्लॉगला भेट दिली असावी.
ब्लॉग आणि तुमचे लिखाण दोन्ही खूप आवडले.

पुन्हा एकदा शुभेच्छा आणि अभिनंदन

अनघा said...

झंप्या, मला मात्र तुमचं हे नाव ओळखीचं आहे! वाचत असते मी तुमच्या प्रतिक्रिया...इतर ब्लॉग्सवर दिलेल्या! प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद! येत जा असेच.... :)

श्रीराज said...

आणि ह्या पोस्ट ने डोळ्यात पाणी आणलेस...

अनघा माझं फार काही वाचन नाही... पण वयक्तिक दृष्ट्या तू माझ्यासाठी नेहमीच एक प्रतिभावंत लेखिका राहिलेयस... रोज नव नवीन लिहिणं काही खायची गोष्ट नाही... आणि तू ते इतकं सातत्यपूर्ण करतेस...

"माझा"साठी तू नंबर १ आहेस

अनघा said...

:) श्रीराज, ही नवीन सापडलेली मैत्री हा माझा आधार आहे...आणि त्यामुळेच मी रोज नव्या जोमाने लिहू शकते...आणि जगूही शकते... :) खूप आभार श्रीराज!

अनघा said...

आणि श्रीयुत रणजीत फरांदे, तुमचे देखील अभिनंदन!! :)

अनघा said...

विद्याधर, आभार. आणि मी बघितलंय, आपण आपल्या शिक्षकांना आवर्जून भेटायला गेलो ना की त्यांना खूप आनंद होतो! :)

sahajach said...

अनघा बरचं साम्य दिसतेय मला तुझ्या आणि माझ्यात... माझेही निबंध असेच वाचले गेले होते वर्गात कायम!! पण BE त असताना आमच्या एका अतिशय कडक मास्तराने जेव्हा "Who is roll No. 17??" विचारले तेव्हा असेच धाबे दणाणले होते माझे.... माझा ईंजिनीयरिंगचा पेपर अतिशय सुंदर मांडणी म्हणून त्यांनी पुर्ण वर्गाला दाखवला होता :) तेव्हा सेम पिंच!!

स्टार माझा च्या यशासाठी मनापासून अभिनंदन!! लिहीत रहा....

श्रेया said...

अभिनंदन, पहिल्यांदाच या ब्लॉगवर येतेय...पण यापुढे नक्कीच वाचत राहिन.

अनघा said...

तन्वी, तुझे मनःपूर्वक अभिनंदन आणि आभार! तुझ्याबद्दल भाग्यश्रीकडून ऐकलं होतं. ह्यावेळी तू मुंबईत आली होतील, त्यावेळी भेट झाली असती तर आनंद झाला असता. तुलाही एक चिमटा ग! आणि प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद! :)

अनघा said...

श्रेया, तुला येथे बघून आनंद झाला! आभार! :)

sanket said...

सर्वप्रथम हार्दिक अभिनंदन!!!

You are an art director? I always thought you are a writer! +११११११

खूपच सुरेख लेख.किती छान लिहीलंय! मला माझे शाळेचे दिवस आठवले. आमच्या सरांनीदेखील माझ्या निबंधाची अशीच तारीफ़ केली होती,मराठीच्याच नव्हे तर हिंदी आणि इंग्रजीच्यादेखील, वर्गात सर्वांसमोर, अशावेळी स्वर्ग दोन बोटं उरतो ना? आमचे principal sir, त्यांच्या पत्नी दुसर्‍या शाळेत मुख्याध्यापिका आणि मराठीच्या शिक्षिका होत्या, त्यांनी मला घरी बोलावले, आणि काय चर्चा रंगल्या होत्या!!! निबंधाच्या मांडणीपासून सुरु झालेला ओघ ययाति,मृत्युंजयपर्यंत पोचला होता.
इंग्रजीच्या सरांनीतर निबंधाचे पुस्तक काढायला सांगितले होते आणि माझे काही निबंध पुढच्या batchesसाठी लिहून काढले होते !! म्हणाले होते," इतने सालों मे १०वी के बच्चे के हाथों इतनी सुंदर और उच्चस्तरीय English लिखी हुई मैनें पहली बार देखी हैं!" बारावीनंतर लिहीणेच खुंटले ते आता लिहीतोय, पण गंज लागलाय!! प्रयत्न चालू आहेत..

अनघा said...

संकेत! स्वागत स्वागत! अरे पोस्ट कर ना ते निबंध! किती मज्जा येईल वाचायला! आणि आभार आभार प्रतिक्रियेबद्दल!! :)

रोहन चौधरी ... said...

स्पर्धेतील यशासाठी खूप खूप अभिनंदन... :)

Gouri said...

अनघा अभिनंदन... कलाक्षेत्राकडे वळलीस तरी तू लेखिका आहेसच ग!

अनघा said...

गौरी! आभार गं! अगं, जेव्हा शाळा संपली ना तेव्हा मला माहीतच नव्हतं कि ART आणि ARTS ह्या वेगवेगळ्या शाखा आहेत! इतकंच कशाला Fine Art आणि Commercial Art ह्या दोन पूर्ण वेगळ्याच गोष्टी आहेत हे पण माहित नव्हतं! मला वाटलं कि चला जाऊन फक्त चित्र काढायची! किती मज्जा! :p

अनघा said...

रोहन, धन्यवाद. आणि तुझेही अभिनंदन! :)

नरेंद्र गोळे said...

पायाला स्पर्श करते बाई...
मला आशीर्वाद द्यावा... >>>>>>

यापरता जास्त चांगला प्रतिसाद कुठला बरे असू शकेल!

विश्रांतीला गुन्हा समजणार्‍या व्यक्तीस, अशी विनम्रता, सोन्याला सुगंध यावा अशी शोभून दिसते.

कला-निर्देशनासोबतच लेखनाचे दालनही खुलेच आहे की! त्यात दैदिप्यमान यश मिळो हीच प्रार्थना!

स्नेहाभिलाषी
नरेंद्र गोळे

अनघा said...

नरेंद्र, सर्वप्रथम तुमच्या यशाबद्दल मनापासून अभिनंदन! आणि शुभेच्छांबद्दल, आभार. भेट देऊन गेलात आनंद झाला. असेच येत रहा ही विनंती :)

Hemant Adarkar said...

अनघा, तुझा 'पिटा' विषयीचा ब्लोग वाचून एकदम गहिवरून आलं! सुंदर!

अनघा said...

हेमंत, तुला इथे बघून खरंच खूप आनंद झाला! कारण तूही होतास ना तेंव्हा त्या आपल्या वर्गात आपल्या 'पिटा' बाईंच्या पुढ्यात! खूप खूप आभार हेमंत. :)

रोहन चौधरी ... said...

मागे फक्त अभिनंदन केले होते.. आता पोस्ट पुन्हा सविस्तर वाचली... तू नक्कीच एक चांगली लेखिका आहेस... :)

"असं नाव त्यांना का आणि कोणी दिलं होतं, ही ऐतिहासिक माहिती काळाच्या ओघात कधीच नाहीशी झालेली होती." हाहाहा... आम्ही पण आमच्या अनेक शिक्षकांना अशी नावे दिली होती... :) आता जास्त सांगत नाही.. माझे एक शिक्षक इकडे ब्लॉगवर पण आहेत... :D

अनघा said...

आभार हं रोहन! :)