नमस्कार

नमस्कार

Pages

Saturday 20 November 2010

आजीईईईईईईईईईई

उंच कपाटावर बसवून ठेवलंय मला. गेला एक तास. लहान आहे मी सगळ्यांत! पाच वर्षांची. म्हणून ना हे सगळे मला त्रास देतात! वेडा पराग. मावसभाऊ माझा! थोडाच फक्त मोठा आहे माझ्यापेक्षा. दोन वर्षांनी. पण वेडा आहे! दिवसभर त्रास देत असतो. कालच आईने माझ्यासाठी छान पत्र्याची बादली आणली होती. भातुकलीच्या खेळासाठी! त्याची कडीच तोडून टाकली ह्या वेड्याने! म्हणून त्याला ओरडत होते, तर त्याने ना मामाला खोटंच सांगितलं आणि मामाने ना ठेऊन दिलंय मला ह्या कपाटावर! मामा पण ना माझा वेडाच आहे! बाबा येऊ देत संध्याकाळी! मग सांगते त्यांना!
"मामाSSSSSSSSSS, उतरव ना खाली!"
श्शी! वेडे आहेत सगळे! भूक लागलीय ना मला! आजी कुठे गेलीय?
"आजीईईईईईईईईईई!"
आजी पण ना वेडी आहे माझी! ओ पण देत नाही मी एव्हढी हाका मारतेय तर! ती आली तरी काय उपयोग? म्हातारी आहे ती! मला इतकं वर ठेऊन दिलंय! कशी घेणार ती मला खाली? आणि मी पडले तर इथून?! किती खोल आहे सगळं! लागेल ना मला? मग ओरडेल आई परागला! संध्याकाळी येईल ना मला घ्यायला! ऑफिस सुटलं की! ती ऑफिसला जाते ना म्हणून सकाळी इथे आजीकडे सोडते मला! पण हा पराग आहे ना! तो मला न खूप त्रास देतो! एकदा काय झालं माहितेय? माझ्या आईने ना माझ्यासाठी एक बाहुली आणली होती! तर एव्हढी माझी नवीनवी बाहुली, नाव पण नव्हतं मी ठेवलं तिचं अजून, आणि ह्या वेड्याने ना तिचं डोकंच तोडून टाकलं! मग मला ते परत लावता पण नाही ना आलं!
आणि काय माहितेय? मला सकाळी आई इथे सोडते ना तेव्हा, ती ना माझ्या कपड्यांची ना एक पिशवी भरून देते. पण न मी इथे आले ना की माझा दुसरा भाऊ आहे तो ना माझी ती पिशवी फेकून देतो वर! म्हणजे ना एकदम पंख्यावर! वर बघा ना! दिसतेय ना? ती पिशवी आहे माझी! आता ती खाली कधी येणार? वेडी आहेत ही सगळी मुलं! आणि मलाच वेडी म्हणतात!
मी झोपते ना खूप म्हणून न मला हे सगळे टाले म्हणतात! म्हणजे ना ते मला सारखे 'उटाले उटाले" म्हणतात! त्यातला उ गेला आणि आता नुसतं टाले राहिलंय!
माझी एक बहिण आहे ना, म्हणजे माझ्या मामाची मुलगी आहे ती. मोठी आहे माझ्यापेक्षा! तिच्याकडे ना खूप खेळणी आहेत भातुकलीची! मग ना, ती मी हळूहळू ना माझ्या घरी नेली! तर ती एक दिवस शोधत होती ना घरभर तर आमचा एक गडी आहे महादू, त्याने ना तिला सांगितलं काय माहितेय? " ती बाय इथे नाय मिळणार! ती गेली तुमची खेळणी सगळी छोट्या पाटलीणीकडे!" पण तिने बघितली, माझ्याकडे सगळी आहेत तिची खेळणी! मी नीटच ठेवलीयत! दिली नाही मी तिला मग परत! मग मी कशाने खेळू? हो की नाही?
पण हा मामा मला कधी खाली घेणारेय? आई येईल ना आता! तिला मग लगेच निघायचं असत घरी जायला! तिने मुळी आजीला सांगूनच ठेवलंय! "तयार ठेव हं आई हिला संध्याकाळी! मला घरी जाऊन जेवण करायचं असतं! लगेच निघायला हवं!"
आजी येत का नाहीये मला शोधायला?
"आजीईईईईईईईईईई!"
"वेडा नुस्ता!" बघा ना कसा करतोय हा पराग! दिसतोय ना वेडा? सांगितलं ना मी तुम्हांला? जा पाहू, आता तुम्हीच बोलावून आणा माझ्या आजीला! ऐकू येत नाही तिला! आत स्वैपाकघरात असेल बघा! आमच्यासाठी खायला करत असेल काहीतरी! संध्याकाळ झाली ना, म्हणून!
पण आधी तिला सांगा मला खाली उतरवायला!
भ्यॅssssssssssssssssssssssssssssssssss
आजीईईईईईईईईईई!!!!!!!!!!!!

20 comments:

Raindrop said...

awwwww....adkun baslis oonch kapatawar....udi pan marta yet nahvti na :( n now see...udya marat tunuk tunuk kuthe cheen ani america pan firun yetes :) what a growth :)

Anagha said...

वंदू! किती छान होते ना हे बालपण?! :) खूप दंगा मस्ती करायचे मी!! माझ्या मोठ्या मामेबहिणीची सगळी भातुकलीची खेळणी घेऊन घरी आले होते! बिचारी कध्धी चिडली नाही पण माझ्यावर! लाडच केले माझे! :p

हेरंब said...

ए वरतीच बस ग तू.. नाहीच काढणार तुला खाली.. तुझ्या सगळ्या खेळण्यांशी मीच खेळत बसणार.. टुक टुक : पराग :P

Anagha said...

हेहे! हेरंब! That 's cute!! भांडाभांडी! गुद्दागुद्दी! किती मजा !!! :p

सौरभ said...

हाssहाssहाssहाss मस्त हसायला आलं मला. मलापण अशी धमकी द्यायचे, मस्ती केली तर कपाटावर किंवा माळ्यावर ठेवू म्हणुन. केवढे उंच होते ते एकेकाळी. =)) कसलं भारी लिहलय... शेवटी भोकाडपण पसरलं. lolllzzz :D

Anagha said...

:D सौरभ, पुन्हां पुन्हां जावे त्या बालपणात! काही काळज्या नाहीत आणि काही ताप नाहीत! :)

Maithili said...

कित्ती गोड...!!! :-)
आधी मला एकदम वाईट वाटले तिच्यासाठी....पण नंतर समजले....ती पण काही 'कमी' नाहीये... ;-)

swapnil demapure said...

Tumachi pati pataliye bagha...

Star majha blog compition madhe tumacha blog select jhalya badal
मनःपुर्वक अभिनंदन

Anagha said...

hehe मैथिली! कळलंच का गं तुला?! ;)

Anagha said...

स्वप्नील, खूप खूप आभार! :)

अपर्णा said...

आरुषला आम्ही आजकाल मस्ती केली की त्याच्या हाय चेअरवर दुसर्‍या खोलीच्या मध्यभागी बसवुन ठेवतो ही त्यातलीच शिक्षा आहे....टुकटुक.....(मी कशी होते गं आता विचारावं लागेल आईला.........:))

संकेत आपटे said...

मस्तच लिहिलंय. :-) ही एक गंभीर पोस्ट असेल असं समजून मी वाचायला सुरुवात केली होती, पण तसं नाहीये. पण का कोण जाणे, मला अजूनही यात काहीतरी खोल अर्थ दडल्यासारखं वाटतंय. काहीतरी जीवनाशी निगडित असं गूढ. त्यामुळे पोस्ट वाचून झाल्यावरही मी थोडा वेळ विचार केला. अर्थ समजून घेण्यासाठी.... हीहीही

Anagha said...

संकेत, मला आजीची आठवण येऊन मी किंचाळतेय असं वाटलं वाटतं तुला? ! :) मी आता विचार करतेय की काय बरं संकेतने विचार केला असेल? धन्यवाद रे!

Anagha said...

अपर्णा, आता तुला कळेल ना कि आरुषच्या डोक्यात त्या उंच खुर्चीत बसून काय चाललंय ते?! :)

THEPROPHET said...

खूप भारी...
मज्जा आली वाचायला!!!

Anagha said...

आभार विद्याधर! :)

Shriraj said...

:D :D :D हा काय प्रकार आहे!!! हसून पुरेवाट झाली माझी...आता ही हसतोय... :D :D :D

Anagha said...

हेहे! श्रीराज,मज्जा! रोजचं हे ना ते टेन्शन! त्यापेक्षा हे बालपण किती छान होतं! म्हटलं पुन्हा एकदा ते दिवस जगू! म्हणून ही नाट्यछटा लिहिली!:D

sanket said...

किते सुंदर लिहीलेस गं ताई !! बालपणाच्या गोड आठवणी !! मीपण शेंडेफ़ळ.. समदुःखी. :( सगळे मलाच वाजवायचे.. पण मी आणि दादा अजूनही धमाल,मस्ती,गुद्दागुद्दी करतो.. उगाचच बालपण संपल्याची हूरहूर नको म्हणून..

Anagha said...

हेहे! संकेत! मारामारी! कंटाळा आला मला तेच तेच रोजचं टेन्शन घेऊन! ते बालपण छान होतं की नाही?! धन्यवाद रे! :)