नमस्कार

नमस्कार

Pages

Wednesday, 10 November 2010

डफ्फर

तो मोसम गोट्यांचा होता. गोट्या आणि डफ्फर. तीन गली, राजा राणी. समोरच्या बिल्डींगची जमीन आशादायक खडबडीत होती. म्हणजे कसे अगदी 'गल' मानता येतील असे तीन पाऊण इंची खड्डे. थोडे पुढेमागे. चांगले टपोरे काचेचे नाही तर सिमेंटचे डफ्फर. नाक्यावर दामू पानपट्टीवाल्याकडे मिळायचे. आठ आण्याला एक. मग सकाळ संध्याकाळ तीन गली! काही कला रक्तातच असतात की काय कोण जाणे! रोवा अंगठा जमिनीवर, घ्या मधलं बोट, दुसऱ्या हाताने पकडा बरोब्बर डफ्फर. करा डोळे बारीक आणि अस्सा नेम धरून सोडा ना तो डफ्फर की अगदी तीन फुटावर असलेला शत्रूचा डफ्फर टुणकन उडायलाच हवा! पार पोचायला हवा दहा फुटांवर! काय आवाज तो! टण! सगळ्या शत्रूंना रस्त्यातून हटवा आणि एकेक गल पार करा!

हे कौशल्य अंगी बाणवायला काही गुरु द्रोणाचार्य नाही लागत. उगाच अंगठा कापून देण्याचा अतिप्रसंग नको. अगदी घरात पण शोधा एक दोन गली. आजूबाजूचे जग विसरून, मन लावून सराव करा. जमून जाईल महिन्याभरात.

शाळेची बस येते दहा वाजता. मग मला सांगा उगाच खाली गप्पा मारत उभे रहाणे म्हणजे वेळेचा अपव्यय नाही का? त्यापेक्षा 'तीन गली' चा सराव केलेला अधिक उचित नाही काय? तर झालं ते असं...

सकाळी आईच्या ऑफिसच्या घाईमुळे लवकर उठणे, लांब केसाच्या दोन शेंड्या तिच्याकडून घालून घेणे आणि साडे नऊलाच तयार होऊन भरभर खाली येणे ह्यात मुलीची आज्ञाधारकताच दिसून येते. बस यायला वेळ होता आणि सुजाता कधी नव्हे ती लवकर आलेली होती. आता फक्त एकच डफ्फर घेऊन निघणे हे काही खरे नाही. एक डफ्फर तिला आणि एक मला. मग खेळ रंगायला कितीसा वेळ हो? बस यायला चांगला अर्धा तास होता. टण टण टण. शत्रू अगदी चीतपट होत होता. तेव्हढ्यात वाजला भोंगा. आणि बिल्डींगच्या दाराशी येऊन उभी राहिली बस. मग झाली थोडी धावपळ. पण उचललं जाडजूड दप्तर, लावलं खांद्याला. डफ्फर गेले खिशात आणि दोघी शिरलो वाहनात.

नेहेमीप्रमाणे दारोदारी फिरली बस आणि पोचली शाळेच्या दारात. मग साग्रसंगीत घंटा झाली आणि 'अंतरमम' ने प्रार्थनेला सुरुवात झाली आणि 'जनगणमन'ने सांगता. जयहिंद झालं. आता बसा खाली जागेवर. तेच करत होते मी! तर गरज काय होती त्या डफ्फरनां टणाटण उड्या मारायची?? निघाले आपले खिशातून आणि लागले गडाबडा लोळायला! रोज आम्ही खाली खेळत असतो तेव्हा हे डफ्फर इतका नाही हो आवाज करत! पण त्या दिवशी काय सांगू तुम्हांला? अहो त्या आपल्या राष्ट्रगीतानंतर अगदी टाचणी पडेल तरी आवाज होईल इतकी शांतता पाळतो आम्ही! आणि त्यात हे असं! टण टण टण, टण टण टण! एक डफ्फर संथ घरंगळत एका वर्गबंधुच्या बाकाखाली आणि दुसरा मास्तरांच्या पायाशी. आमचे वर्गशिक्षक मराठे मास्तर! गोरे आणि घारे. शिस्त म्हणजे कडक हो! नाकावर घसरलेला चष्मा त्यांनी वर नेला आणि म्हणाले," कोणाचे हे प्रताप?"
खोटं कधी बोलू नये. गांधीजींची तीन माकडे प्रत्येक वर्गात उपस्थिती लावून होती. हळूच उभी राहिले. पाय लटपटणे म्हणजे काय तेव्हा कळले.
"या. पुढे या अशा."
तो दोन रांगांमधील पाच फुटांचा लांब रस्ता कसा अगदी खोलखोल वाटला.
"शाळेत गोट्या खेळणार होतात का?"
थरथरणाऱ्या मानेने नकार दिला.
"मग? मग हे कुठल्या तासाला लागते?"
मान खाली.
"जा. घेऊन या ते"
आम्ही शाळेत मुलांशी बोलत नाही. म्हणजे अगदी जवळून जायचा कठीण प्रसंग आलाच तर 'साइड प्लीज' असे म्हणतो. आता त्या मुलाच्या बाकापाशी जायचे आणि त्याच्या पायाशी वाकून डफ्फर उचलायचा म्हणजे भारी कठीण प्रसंग हो! वय वर्ष बारा. कोवळ्या मनावर अगदी चरे जाण्यासारखेच! गेले, वाकले, त्याने काही पाय बाजूला केले नाहीत! वेडा कुठला! उचलला डफ्फर. मास्तरांजवळ गेले आणि दुसरा उचलला. खिशात टाकत होते तेव्हढ्यात,"आणा, इकडे आणा."
मास्तरांच्या हातात नेऊन दिले. मास्तरांनी माझे डफ्फर खिशात घातले! घसरलेला चष्मा पुन्हा वर केला आणि भुवया उंचावून माझ्याकडे बघितलं. "काय? बघताय काय? जा. दप्तर उचला आणि घरी निघा." घरी? मला चालत घरी कुठे जाता येतं? दप्तर उचललं, बाहेर निघाले. अर्धा तास पाय हलवत बाहेर बाकावर बसून राहिले. घंटा झाली. तास संपला. मास्तर बाहेर आले. चष्म्यावरुन माझ्याकडे बघितलं. कपाळाला आठ्या घातल्या,"अजून इथेच?"
"मला येत नाही सर चालत घरी जाता." थोड्याच आधी पायाची थरथर थांबलेली होती.
"अस्सं? जा मग. वर्गात जाऊन बस."
माझे डफ्फर? असं विचारणार कसं आता? घेऊन टाकले वाटतं ह्यांनी माझे डफ्फर! घुटमळले. हळूच मास्तरांकडे बघितलं. त्यांनी पुन्हा रागीट भाव चेहेऱ्यावर आणून बसवले. गेले गुपचूप वर्गात. पुढल्या तासाच्या बाई आल्या आणि तास सुरु झाला.

आई अडीअडचणीला लागले तर लाल डब्यात ठेवते थोडे पैसे. संध्याकाळी त्यात दोन रुपये मिळाले. दामुकडून चार नवे कोरे काचेचे डफ्फर घेतले. निळेशार. उजेडात धरले ना डोळ्यासमोर तर आरपार दिसतं! मास्तरांचे घारे आणि माझे निळेनिळे!

सकाळी आता बस यायच्या पाच मिनिटं आधी आम्ही डाव थांबवतो. एक खड्डा खणून ठेवलाय कोपऱ्यात! त्यात डफ्फर लपवून ठेवतो. अगदी त्यावर माती ढकलून झाकून ठेवतो!
म्हणजे खिसा रिकामा!
आणि डफ्फरच ते! त्यांना कशाला न्यायचं शाळेत?
नाही का?

25 comments:

हेरंब said...

हेहेहे.. मस्तच.. :D

अनघा said...

:) धन्यवाद रे हेरंब!

Raindrop said...

awwww so cute....u should start a 'little anagha' series now :) reminded me of the time a teacher confiscated my skipping rope :)

अनघा said...

hehe! :) Vandu, I just hope through all these posts everybody is revisiting their childhood! And enjoying it too! :)

Raindrop said...

yes yes they are...and also...some people who don't have an idea about childhood in your part of the world get a peep into it and can compare it with theirs in their part of the world.

Like we never had rangolis on Diwali as we lived in the north-east....but I loved your rangoli darodari :)

सौरभ said...

हाहाहा... कसलं भारी :D :) :) आणि गोट्यांसाठी 'डफ्फर' हा शब्द मी पहिल्यांदाच ऐकतोय. सिमेंटच्या ज्या गोट्या मिळायच्या त्याला कोयबा म्हणायचो. त्यात एकदा मित्राला खुप पिदवलेलं. :)) श्या.. काय मंद डोक्याची कार्टी होतो आम्ही!!!

दीपक परुळेकर said...

छान डफ्फर !!
लहानपणीचे सारे डफ्फर आठवले आणि आता आपण खरचं डफ्फर झालोय असं वाटतं !!
खुप छान !!

श्रीराज said...

:D :D :D अनघा, मला कधीच जमला नाही हं हा खेळ. च्यायला!!! नेहमी हरायचोच!!!
आणि एक नवल वाटतं... तुझी आणि माझी पिढी वेगळी होती तरी आपले खेळ जवळ जवळ सारखेच होते न.

हे पोस्ट केल्याबद्दल आभार तुझे. जुन्या आठवणी ताज्या झाल्या...

अनघा said...

:) सौरभ, मजा ना? आता लिहायला घेतलं तर कळतंय...फारच उपदव्याप केलेत आपण! :p

अनघा said...

दीपक, आभार आभार! :)

अनघा said...

श्रीराज, आताची मुलं मात्र अश्या प्रकारच्या उनाडक्या करताना दिसत नाहीत, नाही का? :)

अनघा said...

वंदू, ते मात्र खरंच! जगाच्या पाठीवर, वेगवेगळ्या भागातील मुलांचे खेळ वेगवेगळे, आठवणी वेगवेगळ्या! नाही का? आणि thank you गं!:)

BinaryBandya™ said...

लहानशी अनघा , तिची शाळा , मास्तर , डफ्फर सगळे काही डोळ्यासमोर उभे राहिले ...
१ नंबर लेख आहे ...

"आणि डफ्फरच ते! त्यांना कशाला न्यायचं शाळेत?" ...
भारी idea आहे ...
आम्ही डफ्फरला हंटर म्हणायचो ...
माझ्याकडे एक मडके होते त्यात आम्ही हंटर लपवत असू ..
सगळ्या जुन्या आठवणी जाग्या झाल्या
thanks :)

अपर्णा said...

अंगठा कापून देण्याचा अतिप्रसंग ...sahi....

मस्त...........

अनघा said...

बायनरी बंड्या, हे भारीच आहे! एकाच गोष्टीला आपण सगळयांनी वेगवेगळी नावं दिलीयत!! सौरभ त्याला कोयबा म्हणायचा, तू हंटर आणि मी डफ्फर!! हेहे! आणि धन्यवाद रे. :)

अनघा said...

अपर्णा, धन्यवाद! :)

THE PROPHET said...

मस्त आहे...
चित्र एकदम मस्त उभं राहिलं..
मी एकदा गावाला गेलो होतो तेव्हा हा खेळ खेळलो होतो...
पण महत्वाचा प्रश्न..
फोनवाला फोटो का बदलला? :P

अनघा said...

:) हेहे! विद्याधर, आभार! आणि अरे माझ्या मैत्रिणीला अजिबात नाही आवडला तो माझा फोटो! मी माझ्या वेबकॅमवर काढला होता!! मग हा तिनेच काढलेला टाकला! म्हणजे उगाच परत नावं नको ठेवायला! :)

श्रीराज said...

पण बरं झालं हा फोटो लावलास...हा फोटो तुझ्या या पोस्टला अगदी सुट होतो... म्हणजे खेळकर, मस्तीखोर etc etc ;)

अनघा said...

हेहे!! श्रीराज बुवा, म्हणजे असे वेगवेगळे फोटो निवडून ठेवायला हवेत! रडका(हा तर सारखाच लागेल मला! :)), हसरा आणि मस्तीखोर!! :p

श्रीराज said...

Idea changli ahe!!!! :D

संकेत आपटे said...

मस्त मस्त मस्त

अनघा said...

संकेत, आभार! :)

रोहन चौधरी ... said...

धमाल... माझा आवडता खेळ.. आपण एकदम मास्टर आहे ह्यात.. अजून सुद्धा.. (शेवटी डफ्फर ना!!! हेहे.. ) 'नोकुच - सब्कुच' आणि ८० चा टणटणित टोला / ९० ची गल... :)

अनघा said...

रोहन साहेब, परदेशात पोचलात वाटतं?! बऱ्याच दिवसांत तुझी काही प्रतिक्रियाच नव्हती! आभार आभार! :)