नमस्कार

नमस्कार

Pages

Monday 1 November 2010

धुमश्चक्री, दिवस पहिलाच...

भाग १

पहाटे उठायचे आणि सोसायटीला प्रभात फेऱ्या घालायच्या हा नाबर आजोबांचा रोजचा क्रम. आजोबांचं घर तळमजल्यावर. घराचा पुढला दरवाजा सोसायटीच्या अंगणात. थोडेसे कमरेतून वाकलेले, धोतर नेसणारे आणि चष्म्याच्या वरून समोरच्याला आरपार बघणारे हे सार्वजनिक आजोबा. आजोबा चकरा मारायचे आणि वाकलेल्या आजी कमरेवर हात ठेवून दारातूनच आजोबांवर नजर ठेवून असायच्या. आता दोन मध्यम आकाराच्या त्या सायकली ढकलत मी आणि रश्मीने आत शिरावे आणि ते अगदी प्रवेशद्वाराशीच समोर यावे, ही वादळाची पूर्वसूचनाच होती काय?
"काय गं रश्मी, कुठून येतेयस?" दात नसलेल्या आजोबांचा स्वर थोडा बोबडासा होता.
"आजोबा, सुट्टी सुरू झाली ना! आम्ही ना ह्या सुट्टीत सायकल शिकणार आहोत!"
"आम्ही म्हणजे?"
"मी आणि ही, आजोबा!"
आता आजोबांची बारीक नजर, थोडं मागे उभी असलेल्या माझ्यावर पडली.
"आणि कुठे चालवणार?"
"आपल्या बिल्डींगखाली!"
"असें कसें?" सारस्वत सूर आला!
"का आजोबा?" आता रश्मीचा आवाज हळूहळू खोल जाऊ लागला होता.
"अगो, तुम्ही दोघी गोंधळ घालणार! कोणाला शांतता लाभू देणार नाही! हैदोस नुस्ता!"
"अहो, काय झालं?"
आजी दारातूनच डोकावल्या.
"आली!" आजोबा पुटपुटले. फक्त आम्हांला ऐकू आले!
"अगो, काही नाही! ह्या मुली सायकल चालवायचं म्हणतायत! सक्काळी सक्काळी आवाज नाही का होणार?"
"त्यांचं राहू द्या हो! तुम्ही या आता घरात! चहा थंड होतोय!" आजी आजोबांना ओरडल्या.
"शिंची कटकट!" आजोबा पुटपुटत घराच्या दिशेने चालू लागले. आम्ही परवानगी मिळाल्यासारखेच सायकली ढकलत आत शिरलो.

"रश्मी, किती वाजले असतील?"
"राहू दे ते! विचारू कोणाला तरी थोड्या वेळाने!"
"बरं. चल. आता ना आधी तू बस. मी धरते. हो ना?"
"चालेल. ती सायकल लाव तिथे भिंतीला."
मी कोपऱ्यात सायकल लावली. आमची रश्मी थोडी गुबगुबीत. बाईसाहेब पुढून सायकलवर बसल्या. तिने सायकलचे हँडल आणि मी तिची सायकल घट्ट धरून ठेवली. "अगं, पाय सोड ना जमिनीवरून! पॅडलवर ठेव!"
"तू धरलंयस ना?"
"धरलंय धरलंय!"
रश्मीने दोन्ही पाय पॅडलावर ठेवले, मी सायकल ढकलली. सायकल दोन इंच पुढे गेली आणि अख्खी रश्मी माझ्या अंगावर! "अगं अगं! सांभाळ!" मी किंचाळले. सायकल सावरू की हिला धरू! रश्मीच्या पायांनी पुन्हा धरणीचा ठाव घेतला! सायकल आणि रश्मी स्थिरस्थावर.
"तू धर पाहू नीट!" रश्मी ओरडली.
"अगं, नीटच धरलेलं मी!"
"नीट काय नीट? पडले असते मी!"
ही धरसोड दहा मिनिटे चालली. सायकल चार फूट पुढे सरकली. आरोळ्या किंकाळ्या सर्व झालं. मजल्यामजल्यावरून डोकी डोकावली. झाली का ह्यांची सुट्टी सुरू हा त्रासिक समभाव सहकारी सोसायाटीतील प्रत्येक सभासदाने चेहेऱ्यावर आणून आपल्यातील एकी दर्शवून दिली.
"आता तू बस गं!"
"झालं तुझं?"
"हो!" होकार जोरकसच होता.
अस्मादिक सायकलवर. हँडलवर सर्व शक्तीनिशी पकड. पाय जमिनीला घट्ट पकडून!
"अगं, माझ्यावर ओरडत होतीस ना? तू सोड ना पाय आता!"
"सोडते गं! पण तू पकडंयस का?"
सुट्टी सगळ्याच शाळांना पडली होती. हळूहळू एक एक पोर खाली उतरू लागलं होतं. समोर कोपऱ्यात, सोसायटीतील मुलांचा घोळका हळूहळू आकार घेत होता. आम्ही दोघी सहावी सातवीत तर मुलं आठवी नववीत. आम्ही आवाज जरा कमी केला असता तर हे संकट टाळता आलं असतं! सुट्टीत कशाला लवकर उठलीयत ही माकडं?!
"तू लक्ष नको देऊ! पाय उचल जमिनीवरून!"
"रश्मी, किती वाजले असतील गं?"
"खरंच! थांब. मी गुप्ते मावशींना विचारून येते!" रश्मी सायकल सोडून गेली. मी जमिनीवर पाय घट्ट रोवून उभी राहिले.
माकडं दुरून बघत होती. खिदीखिदी हसत होती. माकडं हसताना बिलकुल चांगली नाही दिसत! जसे काही हे जन्मल्यापासूनच ह्यांना येतेय सायकल!
"अगं, चल लवकर. आठ वाजले!" रश्मी धावत आली.
"पण आपल्याला काही आलंच नाही!"
"लगेच येणार होती ह्यांना सायकल! बावळट नुसत्या!" राजेश फिस्सकन हसून मुद्दाम मोठ्याने बोलला.
"लक्ष नको देऊ त्यांच्याकडे! वेडे आहेत ते! चल तू पटकन!" रश्मीने पिवळी ताब्यात घेतली. लालीला मी कोपऱ्यातून खेचून घेतलं आणि दोघी निघालो.
लाली आणि पिवळी लागल्या गरागरा आमच्या पुढे पळू. त्यांना ताब्यात ठेवताठेवता आणि रस्त्यातील गाडीघोड्यातून वाट काढत काढत पोचलो तेव्हा आठ पंचवीस होऊन गेले.
बाबूच्या दुकानात बाहेर तरी कोणीच नव्हतं. बाबू बहुधा शेजारच्या इराण्याकडे चहा प्यायला गेला होता.
संगनमताने गुपचूप कोपऱ्यात लालीपिवळीला टेकवून दिलं आणि धूम ठोकली!

जेव्हा दुकान नजरेआड गेलं तेव्हा धापा टाकत रश्मी म्हणाली," थांब गं, आता नको धावू! त्याला कुठे दिसणार आता आपण?"

"रश्मी?"
"काय?"
"अगं, आपण दोनदोन कशाला आणल्या होत्या सायकली?"
"म्हणजे?"
"अगं, आपल्याला येते थोडी?! म्हणजे एकावेळी कोणी एकच चालवू शकणार ना सायकल? आणि दुसरीला धरायला लागणार!"
"अरे हो! वेड्याच आहोत आपण! आता, उद्या ना एकच घेऊया!"
"हो! आणि ना, एक दिवस तू दे पैसे आणि एक दिवस मी देईन. म्हणजे रोजरोज मागायला नकोत आपल्याला आईकडे!"
"आणि आता पुढचे दोन तीन दिवस तो पोर्तुगीज चर्चसमोर आहे ना दुसरा सायकलवाला, त्याच्याकडून आणूया सायकल!"

तीन चाकी आणि थोडं मोठं झाल्यावर पाय मारायची स्कूटर, ह्या सुखसोयी मिळण्याचे काही ते दिवस नव्हते. हातात प्रथमच काही वाहन आले होते. दोघींना सायकलीवर बसायला अदमासे प्रत्येकी फक्त पंधरा मिनिटे मिळाली होती. पण काही बिघडले नव्हते...सख्ख्या मैत्रिणींनी गळ्यात गळे घालून आजची पडापडी आणि उद्याचे बेत ह्यांवर रस्ता पटकन संपवून टाकला.

क्रमशः

18 comments:

सौरभ said...

>> वाकलेल्या आजी कमरेवर हात ठेवून दारातूनच आजोबांवर नजर ठेवून असायच्या

हाsssहाsssहाsss (आज्जी ह्या वयात तरी सोडा त्यांना :P :D)

>> सुट्टीत कशाला लवकर उठलीयत ही माकडं?!

ख्यॅंकख्यॅंकख्यॅंकख्यॅंक (माकडोंकोभी टिवल्याबावल्या करना मंगता ना सुट्टी में)

>> "अगं, आपण दोनदोन कशाला आणल्या होत्या सायकली?"

हे लेडिज लोकांले नेमी उशीरा का शमजते हे काय आप्ल्या भेज्यात जात नाय डिक्रा :)) :P

Raindrop said...

majja ali vachun but end cha kramasha baghun thodi interest dip zhala vachtana :(

finish i
t in the next one ok...punaha kramasha nako...

Deepak Parulekar said...

माकडं दुरून बघत होती. खिदीखिदी हसत होती. माकडं हसताना बिलकुल चांगली नाही दिसत! जसे काही हे जन्मल्यापासूनच ह्यांना येतेय सायकल!

हे हे हे !! गुड वन !!
पुन्हा एकदा क्रमशः चा निषेध नाही !!!

Anagha said...

दीपक, आता आज जे लिहिन ते सायकल वर्गावरच नक्की शेवटचं असेल!! आणि त्या पोस्टमध्ये खरी धुमश्चक्री असेल! गेले दोन पोस्ट म्हणजे वातावरण निर्मिती होती! :p

Anagha said...

सौरभ, त्या माकडांमध्ये कोणी 'सौरभ' नावाचं होतं का हे मी आठवतेय!! ;)

BinaryBandya™ said...

छान लिहिलंय ...

Shriraj said...

अनघा, मला ना लहान मुलांच्या गोष्टी खूप आवडतात... त्यात तुझ्यासारखी लिहिणारी असेल तर आनंद द्विगुणीतच होतो.

कोणी पडलं कि हसायचं नसतं; पण ...

"रश्मीने दोन्ही पाय पॅडलावर ठेवले, मी सायकल ढकलली. सायकल दोन इंच पुढे गेली आणि अख्खी रश्मी माझ्या अंगावर! "
... हे वाचल्यावर मला आवरला नाही गं :D

Anagha said...

श्रीराज, फिदीफिदी हसत बसलास ना?! :)

Anagha said...

बायनरी बंड्या, धन्यवाद! :)

panda said...

अगं अनघा, खूप सुंदर लिहितेस...."धुमश्चक्री" वाचून तर स्वत:चे बालपण आठवले....

मी बऱ्याच दिवसापासून तुझा blog वाचतोय. पण कधी लिहिण्याचा योग आला नाही....तुझा प्रत्येक blog कुठे ना कुठे correlate होत होता. "हसू" वाचताना....कोणाच्या तरी डोळ्यातले "असू" आठवले....तर "शोध" वाचताना माझ्या एका मैत्रिणीचा चालू असलेला "शोध" आणि तिचा उडालेला "गोंधळ" आठवला. "डोक्यावर हात" वाचता वाचता मी स्वत:च "कपाळाला हात" लावला... Hats off to you...

Anagha said...

पांडा, अभिप्रायाबद्दल धन्यवाद! असेच येत रहा...:)

Anagha said...

वंदू, नाइलाज को क्या इलाज?! :)

THEPROPHET said...

>>>> वाकलेल्या आजी कमरेवर हात ठेवून दारातूनच आजोबांवर नजर ठेवून असायच्या

हाsssहाsssहाsss (आज्जी ह्या वयात तरी सोडा त्यांना :P :D)

सौरभा...अरे ह्या वयात सोडा नाही रे...पाणी लागेल ;)

(लेखावरची कॉमेंट शेवटावर देतो..इथे फकस्त हजेरीचा चावटपणा करायला आलो :) )

Anagha said...

hehe !! विद्याधर!! सोडा, चांगला होता! भारी बुवा तुमचं निरीक्षण!! :D

Apurva Patil said...

Rashmine vachale ka???

Anagha said...

बहिणाबाई, माहित नाही ग मला! मी पाठवलेली तिला ही पोस्ट! तू प्रतिक्रिया दिलीस म्हणजे आता तुला यायला लागलं नाही का प्रतिक्रिया द्यायला!? गुड!! :)

संकेत आपटे said...

हाहाहा... मस्त. लई भारी. :-D

Anagha said...

:) आभार, संकेत!