नमस्कार

नमस्कार

Pages

Wednesday 27 October 2010

सीने में जलन...

ना ती रात्र अमावस्येची, ना कोजागिरीची. काळ्याभोर आकाशात चंद्रकोर होती की नाही, आणि असलीच तर पंचमीची होती की अष्टमीची, काही कल्पना नाही. हवा थंड होती आणि नजर दूर टाकावी तर काळोखंच होता. नोव्हेंबर महिना. शांत सुस्तावलेलं जम्मू रेल्वे स्थानक.

रस्ता परतीचा होता. १८-१९ हे वय काही दमण्याचे नाही. अमृतसर, जयपूर, काश्मीर, पेहेलगाम, गुलमर्ग. तीस मुलामुलींची स्टडी टूर दिवसागणिक रंगत गेली होती. नुकत्याच उमललेल्या कळीसारख्या, नवथर चित्रकारांची ती टूर. आत्ताशी कुठे रंगांवर हात बसू लागला होता. समोर दिसणारा असीमित निसर्ग कागदावर उतरवणे, थोडं थोडं जमू लागलं होतं. अर्थात हे बालबुद्धीला वाटत होतं. मास्तरांनी त्याला संमती नव्हती दिली. सोनेरी देवळासमोरील सोनेरी पाणी, धुरसट दिसणारं दल सरोवर, काश्मिरी सुरेख तरुणी, टमाटर हेच गाल असलेली बाळं, शहाजहानच्या सदाबहार बागा आणि गुलाबी शहर. येताना भरलेल्या धोपटीतील स्केच बुकं आता शेवटच्या पानावर पोचली होती. चित्रं छोटी आणि पानावर गर्दी करू लागली होती. जलरंगाच्या सोंगट्या आता चवळीच्या दाण्याएव्हढ्या राहिल्या होत्या. पोस्टर रंगाच्या बाटल्या खडखडाट करू लागल्या होत्या. आणि दप्तरं निसर्गचित्रांनी भरून वहात होती.

रात्रीचे अकरा वाजत आले होते. जेवण आटपली होती. जम्मू तावी सकाळी निघायची होती. रात्र स्थानकावरच काढायची होती. आक्षेप कोणाचाच नव्हता. फक्त आजची रात्र संपूच नये एव्हढीच इच्छा मनोमनी. मुलं आणि मास्तर आपापल्या धोपट्यांवर विसावली. पिवळ्या दिव्यांखाली बस्तान, मुलींनी टाकलं. रातकिडे आसपासच कुठे सराव करत होते. इथेतिथे गप्पा रंगत होत्या. हास्याचे फवारे उडत होते.
"अभय, चल रे, मस्त हवा आहे. होऊन जाऊ दे एक!"
"नाही रे! थंडीने बसलाय घसा!"
सगळ्यांनी जोर धरला. अभयचा बसलेला घसा सुटला.

रात्रीच्या त्या काळोखात, मस्त गुलाबी थंडीत....'सीने में जलन'.

मंद आवाजात सुरु झालेली गझल पूर्ण स्थानकावर पसरली. दिल है तो धडकने का बहाना कोई ढूॅंढे...गहिरा सूर.
अंगावर शहारा. हृदयात तरंग तरंग. तन्हहाइसी ये कौनसी मंझील है रफी को....क्या कोई नयी बात नजर आती है हममें...आईना हमे देखके हैरांनसा क्यों है...नजर शून्यात. मुंबईतील गर्दीत हरवलेला फारुख शेख. आणि ते काळोखात हरवलेलं सुनसान जम्मू. आॅंखों में तुफानसा क्यूॅं है?

अचानक, त्याच पिसालेल्या मुंबईची ओढ!

१२ दिवसांचा कलाकारी, मुक्त संचार...
आता मात्र 'परेशान शक्स'वाल्या शहराचीच ओढ.

काही क्षणांपूर्वी रात्र संपू नये म्हणणारं मन...
नजरेसमोर मात्र ती गल्ली, तो जिना, त्या पायऱ्या...सताड उघडं दार.
...आणि सूर्यप्रकाशात लख्ख उजळून गेलेलं घर!

'बाबा येतील ना स्टेशनवर घ्यायला?'

14 comments:

अपर्णा said...

माझ फार लाडकं गाणं आणि गायक ..............गाण्याच्या आठवणी खरच ते सगळ वातावरण पुन्हा एकदा जिवंत करतात नाही???
"आईना हमे देखके हैरानसा क्यो है"...................क्या बात है...

Anagha said...

हो ना अपर्णा! नेहेमी हे गाणं कानावर पडलं, की जाऊन बसते मी मित्रमैत्रीणींबरोबर, जम्मू स्टेशनावर! :)

रोहन... said...

काही ऐकून आठवणींच्या गावा जावेसे वाटते... पण मुंबई पिसाट्लेली का??? :(

मुंबईची स्वतःची एक आठवण आहेच की... :)

Anagha said...

रोहन, काळवेळेचं भान नसलेली, सर्वांचीच परंतु कोणाचीच नसलेली, झपाटलेली...मुंबई.

सौरभ said...

व्वाह!!! क्या बात!!! कमाल!!! मी पहिल्यांदाच हे गाणं ऐकतो आहे. संध्याकाळ रंगवायला छान गाणं आहे.

Shriraj said...

एखादा सुंदर चित्रपट पाहतोय की काय असा भास झाला. masta!!! :)

Anagha said...

सौरभ, खूप खूप सुंदर आहे ही गझल. :)

Anagha said...

श्रीराज, धन्यवाद! आणि सुप्रभात!:)

Raindrop said...

ohhh main jab bhi ye gana sunti hoon....hubby background mein bolta gai....arey Digene, Gelusil ya koi accha antacid kyon nahi leti...seene ki jalan jhat se door ho jaayegi :)

i miss Mumbai!!!

Anagha said...

Vandu, u and your doctor hubby!! :)

THEPROPHET said...

मस्त गाणं आहे! धन्यवाद सांगितल्याबद्दल! :)

Anagha said...

मस्त आहे ना गाणं विद्याधर!? :)

हेरंब said...

अप्रतिम !! माझं जाम आवडतं गाणं आहे हे !

Anagha said...

वेळात वेळ काढून वाचलंस हेरंब! खूप खूप आभार! :)