नमस्कार

नमस्कार

Pages

Sunday 17 October 2010

हसू

एप्रिल महिन्यातील रविवार. उन्हं खंडाळ्यात कमीच तापतात. मुंबईहून मित्रमंडळी जमली होती. आपापल्या मैत्रिणींना सोबत घेऊन. राजू-गीता, शेखर-स्मिता, आनंद-स्नेहल, रवी-अस्मिता, संजय-नीता. सर्वच तसे पंचविशीतले. हॉटेलसमोरील बागेत हिरवळीवर गप्पा रंगल्या होत्या. पंधरा दिवसांवर, रवी-अस्मिताचं लग्न आलं होतं. बाकीच्यांच्या मनात लग्नाचा विचार अजून घोळत होता. जेवणे व्हायची होती. पुरुषांचे, मद्यपान चालू होते.

"मित्रांनो, रवी-अस्मिताचं लग्न आता अगदी उद्यावर येऊन ठेपलं. आपण, आज ना उद्या लग्न करणारच आहोत. तर इथे असलेल्या प्रत्येकाने, आज एका प्रश्नाचं उत्तर द्यायचे आहे." राजूला नेहेमी काही विचारी प्रश्न पडलेले असत.
"काय बाबा, आता कसली उत्तरं हवीत तुला?" संजयने घोट घेतघेत विचारलं.
"प्रत्येकाने सांगायचं आहे, आपापल्या जोडीदाराकडून आयुष्यात तिच्या वा त्याचा काय अपेक्षा आहेत?" राजूने कोडं टाकलं. "आणि लांबण लावायची नाही. एकाच वाक्यात सांगायचे." इति नियम. "चल आनंद, सुरुवात तुझ्यापासून."
आनंद विचारात पडला. स्नेहलच्या चेहेऱ्यावर उत्सुकता पसरली.
"मला वाटतं, माझ्या बायकोने घर उत्तम सांभाळावं. म्हणजे..."
"बस बस. कळलंsss! लांबण नको!" आनंद पुढे बोलणार तेव्हढ्यात राजूने त्याला तोडलं. "आता तू बोल स्नेहल."
"मलाही असंच वाटतंय...माझ्या नवऱ्याने घर उत्तम सांभाळावं." स्नेहल उद्गारली.
"अगं, मी घर सांभाळू, की पैसे कमवू?"
"शेखर, तुझी पाळी." राजूने एक होऊ घातलेला वाद थांबवत खेळ पुढे नेला.
स्मिताकडे नजर टाकत शेखर म्हणाला,"तिने, मला आणि घर, दोन्ही नीट सांभाळावं."
"माझ्या नवऱ्याने, मला सुखात ठेवावं." स्मिताच्या सुखाच्या कल्पना, जरी त्या भौतिक असल्या, तरीही अतिशय स्पष्ट होत्या.
राजूने एका वाक्याचे बंधन घातल्याने खेळ लवकर पुढे सरकत होता. आणि मोजक्या उत्तरातून स्वभावदर्शन होत होते.
आता पाळी संजयची.
"मला वाटतं, नीताला एकूण करियर करायची काही हौस नाहीये, तर मग माझी अपेक्षा देखील आनंदसारखीच आहे."
"असं उत्तरं चालणार नाही. नीट स्पष्ट बोल." राजू म्हणाला. नीताने त्याला दुजोरा दिला.
"अरे, म्हणजे मला वाटतं, ज्याने त्याने स्वतः ला आवडतं ते काम करावं."
"आणि मला वाटतं, माझ्या जोडीदाराने, स्वतः च्या करियरपुढे घराकडे दुर्लक्ष करू नये!" फुरंगटून नीता बोलली.
"सगळ्यांमध्ये भांडणं लावून देण्यापेक्षा राजू, आता तू बोल ना, तुझी काय अपेक्षा आहे, तुझ्या बायकोकडून?" संजयने राजूला पंचाच्या भूमिकेतून खेळात ओढले.
राजू हसला. "मला वाटतं, माझ्या बायकोने मला आणि स्वतः ला सुखात ठेवावं."
"हो का? म्हणजे ही दोन्ही कामं मीच करायचीत वाटतं? आणि मग तू काय करणार आहेस?" गीता खेकसली.
"अरे, ते तू सांग ना! मी काय करायचं ते?" राजू तसा हरणार नव्हता.
"मी सांगते, तू तुला वाटेल त्या नव्हे, तर मला वाटेल त्या सुखात तू मला ठेवणार आहेस!" गीता हट्टी होती आणि राजू राजकारणी आईबापाचा लाडावलेला लेक होता.
"बरं, बरं! अस्मिता, तू बोल आता."
अस्मिता विचारात पडली होती. ग्लास उचलून तोंडाला लावणाऱ्या रवीकडे प्रेमाने बघत ती उद्गारली,"माझा नवरा, आयुष्यभर, माझा मित्र असावा."
"अस्मिता, तू नेहेमीप्रमाणे एकदम वेगळं आणि विचार करून उत्तरं दिलंस हं!" राजू कौतुकाने म्हणाला.
"रवी, आता तू बोल रे?"
"माझं उत्तर त्याच्याच उलटं!" रवी घोट घेत म्हणाला.
"साल्या, तू ना!"
रवी मित्रांचा लाडका होता. सर्वांना हसवण्याची जबाबदारी नेहेमीच रवीची होती.

आणि हे रंगलेलं कोडं ऐकत हिरवळीवर पहुडलेली, नियती खोखो हसत सुटली.
हे तिचं नेहेमीचंच. विनोदबुद्धी शून्य. नको तिथे हसणार. आणि जसं वीज चमकते तेव्हा ती आधी दिसून येते, परंतु, भेदून टाकणारा गडगडाट बऱ्याच उशिरा आपल्या कानी पडतो. तेच गणित ह्या नियतीचं. ती हसते तेव्हा तो खळखळाट ऐकू येईस्तोवर किंवा ती हसली हे देखील कळेस्तोवर दशकं ओलांडून जावी लागतात. आणि तेव्हा कुठे नियतीचं हसू कानी पडतं.

अस्मिताला जेव्हां ते ऐकू आलं, तेव्हां रात्रीचा एक वाजून गेला होता. अजून जेवणाला अवधी होता. चार वर्षांचा लेक, यश बाजूला निजला होता. आणि रवी मद्याचे घुटके घेत समोर टीव्ही बघत बसला होता.

16 comments:

rajiv said...

२००व्या लेखाबद्दल अभिनंदन.!!
लेख खूपच सुंदर आहे.
किती सरळ अपेक्षा होती अस्मिताची... त्यात सहजिवनाचे सारे सार तिने सांगितलेय .
पण...
`ह्याचे नाव जीवन'.....

सौरभ said...

अस्मिताने स्वतःसाठीपण एक पेग बनवुन नवऱ्यामित्राला कंपनी द्यायला हवी. (माझ्यामते नवऱ्याला नवऱ्यासारखं ठेवलं असतं तर नवरोबा आणि यश दोघे झोपलेले असते आणि अस्मिता टीव्ही बघत असती.)

okay... now on serious note...
हि पोस्ट वाचल्यावर एक हुरहुर लागुन राहिली. अस्वस्थ व्हायला होतं. काय माहित का? :-S

BinaryBandya™ said...

शेवटच्या दोन परिच्छेद भरपूर काही सांगून जातात ...
सौरभशी सहमत .. खरेच कसलीतरी हुरहूर लागते

Anagha said...

बायनरी बंड्या, हुरहूर लागते म्हणजे लेख नीट झालाय म्हणायचा.

Anagha said...

सौरभ!hmmmm!

Anagha said...

राजीव, आभार! :)

Shriraj said...

माझं ही कधी कधी नियतीसारखंच होतं... एखादी सकाळी घडलेल्या घटनेचा उकल रात्री बिछान्यातंच होतो

Raindrop said...

it is an extremely beautiful story...twist in the end...well crafted...sagla kaahi khoopach avadla mala...especially the ganes everyone played....pan maybe I wasn't ready for another sad one....so me zara gappach zhale.

Anagha said...

Vandu, I have crafted it well na? मग जाऊ दे बाकी सगळं! :)

Anagha said...

श्रीराज, आणि मग कोणाकोणाची वाट लावतोस तू?? :)

THEPROPHET said...

हि पोस्ट वाचल्यावर एक हुरहुर लागुन राहिली. अस्वस्थ व्हायला होतं. काय माहित का?
:(

Anagha said...

विद्याधर, hmmm

THEPROPHET said...

>>
आणि हे रंगलेलं कोडं ऐकत हिरवळीवर पहुडलेली, नियती खोखो हसत सुटली.

हे वाक्य आणि कल्पना क्लासिक आहे! इथेच कथा वेगळ्या लेव्हलला पोहोचते!

Anagha said...

विद्याधर, तुला गोष्ट परत वाचावीशी वाटली हे खूप आहे मला! आणि तुझी बारकाईने वाचून दिलेली प्रतिक्रिया मला नेहेमीच चांगलं काही लिहायला प्रवृत्त करते. :)

संकेत आपटे said...

म्या म्हणजे अगदीच दगड आहे ब्वा... सगळ्यांनी एक अनामिक हुरहुर वगैरे लागते. मला मात्र फक्त एक प्रश्न पडतो... ‘म्हणजे काय?’ :-O

Anagha said...

बरं आहे, संकेत, आयुष्याची काही गणितं तुला नाही कळत तेच! :)