नमस्कार

नमस्कार

Pages

Saturday 16 October 2010

उभे आयुष्य

इतक्या उंचीवरून किती सुंदर दिसते ही नगरी. दूरदूरपर्यंत समुद्र पसरलेला. रस्ते निमुळते होत जाणारे. आणि माणसं. ना उंच ना बुटकी. जसे काही हलते ठिपके. आणि गाड्या? बोटाच्या एक पेर...दोन पेर...जास्तीतजास्त तीन पेर एव्हढ्या. बघत रहावी ही दुनिया. इमारती. खिडक्या. जश्या काही काडेपेट्या. उभ्या ठेवलेल्या. सोसाट्याचा वारा सुटला तर पडतील की काय असंच मनात येतं. कधीतरी एखाद्या खिडकीत हालचाल दिसते, तेव्हां त्या क्षणापुरती तिथे जाग येते. नाहीतर फक्त आकाश बदलतं....दिव्यांची उघडझाप होते...बस्स इतकंच.

ह्या नगरीतलं प्रेम देखील ह्या किनारीच येऊन बिलगतं. ना भान वेळेचं. ना स्थळाचं. वरून लाटांच्या उंचीचा पत्ताच नाही लागत. फक्त पांढरी झालर असलेला निळा पदर, पुढे सरकतो...आणि जाऊन किनाऱ्याशी विसावतो...पुन्हा जातो उलट्या पायी माघारी....जसा कोणी पदर सावरावा. एखादी बोट आणि त्यावर जाळं हवेत फेकणारे कोळी. सगळं छोटं. बघत राहावं आणि कळू देखील नये, कधी सूर्याने पाण्यात डुबकी मारली. मी जातो अजून वर आणि दिसतं दुसरं जग. मी उभा चंद्रावर. आणि पृथ्वी खाली. दूर एखादं विमान ढग कापत जातं. कापलेले ढग पुन्हा जातात मिसळून...वनिला आइसक्रिम आणि त्यातून फिरावी सुरी.

आकाशात हा असा मी रोज हरवतो. पहाटे पहाटे दिवस सुरु होतो. सरसर वर. कधी पूर्वेला. सरसर वर. कधी पश्चिमेला. आजूबाजूचं जगच निराळं.

झालं आता साठ वय. भंडारी आम्ही. शाळेत मीही गेलो. अभ्यास करत देखील होतो. दहावी केली तोपर्यंत बाप दारू पिऊन मेला. मुंबईत तेंव्हा वाड्या होत्या. विहिरी होत्या. माड होते आणि माझ्यात माकड होता. हुप्प. माडावर चढायचो तेव्हा बाप वरून दिसायचा. दारू पिऊन राडा करताना. बाप चढायचा, माडी घेऊन खाली यायचा. ठरलेली केंद्र त्याची. तिथे जाऊन विकायचा. म्हणायचा माझं काम भगवान शंकरासाठी. दुनियेला सांगत फिरायचा. "शंकर चालेला लढायला. दमला भागलेला. त्याच्या घामातून माझ्या आज्याचा जनम झाला. शंकऱ्याला पियाला पानी हवं व्हतं. आजूबाजूला कुटंबी नाय मिळालं. मंग चढला माजा आजा माडावरी. आणली माडी! दिली त्या शंकऱ्याला. झाला खुश! तवापासून ह्येच काम धरलया आमी! देवाचं काम हाय!" मेला तो मेला, पण आयशीला एकटी टाकून गेला, पदरात दोन पोर घालून. मग कसली शाळा आणि कसलं काय. माकडाचे पैसे झाडावर. लागलो मी माडी विकायला. मग उशिरा का होईना पण बायको आणली...आणि पोरं झाली. डोलते माड आणि माझं चालतं घर.

रोज पहाटे माडावर चढतो आणि हा असा हरवून जातो. म्हातारा झालो पण हे वेड नाही सुटलं. सुटणार पण कसं म्हणा. ही वरची दुनियाच अशी...तरंगती. वारा सुसाटला कि माड माझा झोपाळा. नाहीतर रहातो बसून इथेच वर....खालची मजेशीर दुनिया बघत!

"आई, हे बघ लावलं मी रोप. चांगली पाच सात वर्ष लागतील नाही का माड उभारायला?"
"होय रे बाळा. पण हे तू खूपच मोठ्ठ काम केलंस पोरा. ह्यांच्या अस्थी इथे वाडीत आणल्यास आणि हे माडाचं रोप पेरलस. भारी प्रेम त्यांचं माडांवर. कसा रे पण ह्या माडांनेच जीव घेतला त्यांचा? इतक्या वर्षात कधी नव्हतं रे घडलं असं! कसा पाय घसरला ह्यांचा आणि कसे आपटले रे हे जमिनीवर?" आजींनी डोळ्याला पदर लावला.
"अगं आई, बाबा खुश असतील. वर बसले असतील माडावर चढून. मस्त समुद्राकडे ध्यान लावून!"
आजींच्या चेहेऱ्यावर हसू आलं..."तू पण त्यांचाच पोरगा! बरा रोप घेऊन आलास!"
"आई, मी काही माडावर चढणार नाही! पण उंचीवरून समुद्र मात्र नक्की दाखवेन तुला! अजून आठ दहा वर्ष!"

हे बरिक राह्यलं माझं. हिला नाही कधी दाखवू शकलो माझं जग. पण हा माझा शिकलेला पोरगा दाखवणार आईला आणि बहिणीला समुद्र! विसाव्या मजल्यावरून! मी आहेच तोपर्यंत असा वर माडावर लटकत!

18 comments:

सौरभ said...

पांढरी झालर असलेला निळा पदर - एवढी खुबसुरत, नजाकत असलेली लाटेची अदाकारी... सुभान अल्लाह... गोष्टीतली वळणं सहजतेने हाताळणं, कमीत कमी शब्दांत खुप काही सांगणं कसं जमतं मला ह्याचं खरंच अप्रुप वाटतं आणि खुप हेवापण. व्वाह रे व्वाह.

THEPROPHET said...

एकतर कुठल्याही गोष्टीचं सहज सुचणार नाहीत अशा उपमा देऊन किंवा सुरेख अलंकारिक भाषेतलं वर्णन आणि नेहमीच साधीशीच वाटणारी पण परिणामकारक कलाटणी!
लय भारी!

Raindrop said...

i remembered farhan akhtars poem about a tree and how everyone in the colony was so sad that the tree was being cut but the moment the huge tree got cut everybody was extremely joyous coz now they could see the samudra clearly, without any obstruction. And everyones houses went gone up in price coz of this. I remember it vaguely.

Somehow this story reminded me of that. beautifully written anagha.

Anagha said...

सौरभ, हे माडी काढणारे ना बाबांच्या घरातून रोज दिसत असतं...वर्षांनुवर्ष! आणि त्या घरासमोर आम्हांला न दिसणारा समुद्र आहे ना. तो त्या माडी काढणाऱ्यांना तरी नक्की दिसत असणार! ते कुठेतरी डोक्यात बसून राहिलं होतं वाटतं. :)

Anagha said...

विद्याधर, मला आपलं नेहेमी वाटतं, ह्या पृथ्वीवर जन्माला आलेला प्रत्येकजण आपापली कथा घेऊन आलाय! आणि प्रत्येक कथा अनोखी! :)

Anagha said...

Vandu, I don't know the poem...I am so happy that you like reading my posts... my writing! खरंच! खूप खूप! :)

Raindrop said...

and thanks to u ... now i can read and understand long stories too...in marathi :)

रोहन... said...

मस्त लिहिले आहेस. तुझ्या लिखाणात सहज जादू आहे. आमच्या गावाला (केळवे-माहीम) ताडी-माडी खूप. तुला गम्मत वाटेल पण लहानपणी मी सुद्धा ताडाच्या झाडावर चढलेलो आहे... :D मला ताडी खूप आवडते प्यायला.. :D

Anagha said...

रोहन, प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद. आणि ताडी काय किंवा माडी काय, मी काही ती अजून प्यायलेली नाही. म्हणतात कि ती आरोग्यदायी असते! :)

BinaryBandya™ said...

apratim

Anagha said...

धन्यवाद बायनरी बंड्या! :)

Shriraj said...

तुला माहितेय, तुझ्या कथा वाचून माझी कल्पनाशक्ती तसू-तसूभर वाढत चाललेय...या कथेची धाटणी वेगळीच वाटली. मी अजून पर्यंत वाचलेल्या कथांपेक्षा वेगळी अशी

Deepak said...

खूपच छान!!!!! इतक्या कमी आणि सुंदर शब्दात कोकण दर्शन आणि माडावर चढून बसलेले... उभे आयुष्य ..........अप्रतिम

Anagha said...

धन्यवाद दीपक! :)

संकेत आपटे said...

छान, सुंदर, मस्त ;-)

Anagha said...

तू असे डोळे मारलेस ना संकेत, कि मला कळतंच नाही की तू दिलेली कमेंट खरी आहे की विनोद आहे! ;)

संकेत आपटे said...

कमेंट खरी आहे हो. एकच प्रतिक्रिया पुनः पुनः दिल्यामुळे स्मायली टाकली आहे.

Anagha said...

:)