नमस्कार

नमस्कार

Pages

Friday, 8 October 2010

पृथ्वीवरील संध्याकाळ

मुंबईतील एखादा कलाविष्कार बघण्यासाठी सर्वोत्तम... पृथ्वी थिएटर. मुख्य रस्त्यावर वाहन असेल तर लावावं आणि समोरच्या बोळात शिरावं. सूर्यास्त होत आला असले तर वातावरणनिर्मितीत भरच. झाडाखाली वसलेले कँटीन, पिवळे कंदील, वर बांबूंचं छप्पर आणि त्यातून तिरीपीने अंगावर पडणारा केशरी प्रकाश. बाजूला माडांना लगडलेल्या नाजूक दिव्यांच्या माळा. झकास. आपण थोड्याच वेळात जो अनुभव घेणार आहोत त्यात कसं आधीपासूनच शिरायला होतं. एक मात्र धोका! आपण देखील कोणी बुद्धिजीवी आहोत असं उगाच वाटू लागतं!

आत नाट्यगृह ग्रीक अॅम्पी थिएटरचे छोटेसे रूप. जे कलाकार त्यांची कला प्रदर्शित करणार आहेत ते जसे काही आपल्यातीलच वाटावेत अशी त्याची रचना. नसरुद्दिन शहा हाताच्या अंतरावर. आविर्भाव करताना त्याच्या चेहेऱ्यावरची रेषा न रेषा दिसावी. आपण दिलेली दाद अगदी त्यांच्या कानी पडावी. इस्मत चुगताईंची कथा, हिबा शाहच्या तोंडून ऐकावी आणि अंगावर रोमांच उभे राहावे.

परवा योग आला. मकरंद देशपांडेंचे "पोहा गॉन राँग' हे हिंदी नाटक. संध्याकाळी सहाचा प्रयोग.

पोहे म्हटले की मुलगी बघायला गेलात कि लाजत लाजत समोरून येणारी; नाजुकशी, सुरेखशी मुलगी समोर येण्याचे दिवस तर आता गेले. आणि महाभारतातील सुदाम्याचे पोहे तर त्याहून जुने! परंतु, इथे एक मनुष्यजीव असा आहे, ज्याला पूर्ण खात्री आहे की तोच तो महाभारतातील सुदामा! सुदामा, त्याच्या बालपणीच्या दोघी मैत्रिणी आणि त्या मैत्रिणींना धरून येणारी इतर व्यक्तिमत्वे.
ह्या सुदाम्याचे काही आक्षेप आहेत. त्याच्या जिवलग मित्राबद्दल तक्रारी आहेत.
सर्वप्रथम त्याला महाभारतात त्याचे व्यक्तिचित्र नक्की का रंगवले गेले हेच कळत नाही. फक्त कृष्णाच्या व्यक्तिमत्वाला अजून एक कंगोरा देण्यासाठी हे व्यक्तिमत्व तयार केले गेले हा पहिला आक्षेप. म्हणजे बघा... इतका मोठा कृष्ण, तरी देखील आपल्या बालपणीच्या गरीब मित्राचा त्याला विसर नाही पडला!
दुसरा आक्षेप... कृष्णाने आपल्याला सोडून अर्जुनाला का युगपुरुष केले? मी जर बुद्धिमान आहे तर मलाच का नाही सांगितली गीता? मला सांगितली असती तर कदाचित उगाच १८ अध्याय उगाळत बसायला नसते लागले! लवकर तरी संपली असती. आणि हे इतके १८ अध्याय जेव्हा कृष्ण सांगत होता, त्यावेळी बाकीचे योध्ये रणभूमीवर, काय झोपा काढत होते?
हे आणि असेच काही इतर आक्षेप, म्हणजेच अनेक फोडण्या देऊन हे पोहे, चविष्ट होण्याचा प्रयत्न करतात. परंतु, वाटले सपकच. म्हणजे थोडे बिनचवीचे. पंधरा मिनिटाचे मध्यांतर टाळता आले असते. एक अंकी नाटक जरा बरे वाटले असते. दोनतीन प्रसंग अगदी उचलून ट्रॅशबिनमध्ये टाकता आले असते. मकरंद देशपांडे मात्र सुदामा म्हणून सही! आता ह्यापुढे कधीही सुदाम्यावरील काही लिखाण वाचनात आले तर मकरंद देशपांडे डोळ्यासमोर उभे रहाणार हे नक्की!

आपण एखादं अतिशय सुंदर नाटक बघितलं असा आनंद हे नाटक नसेल देऊ शकलं...पण ते पृथ्वी थिएटरचं मातीशी जवळीक साधणारं वातावरण...त्या वातावरणाने त्या भावनेवर कधीच मात केलेली असते!

मग पृथ्वीची गंमत काय इथेच संपली?

मी बाहेर येते, उजव्या हाताला वळते आणि तिथे असलेल्या पुस्तकांच्या दुनियेत डोकावते. तो अनुभवही वेगळाच. हिंदी, उर्दू, इंग्रजी भाषेतील, एखाददुसरं पुस्तक तरी मी विकत घेते.

जेव्हां बटव्यामधून लेखणी काढून, मी माझ्या नव्या पुस्तकावर स्थळकाळ लिहिते, तेव्हा कुठे माझी सोनेरी संध्याकाळ पूर्ण होते!

18 comments:

Irawati said...

Khoop Chhaan!!:-)
Let's go for another play really sooon! Hope this time Vandu will be there to join us:-)

अनघा said...

अरे वा! इरावती मॅडम, तुमचे स्वागत आहे! धन्यवाद तुमच्या प्रतिक्रियेबद्दल! आणि आता वंदू आली ना की जे कुठचं लागलं असेल ना ते नाटक बघुया आपण! :)

rajiv said...

`अनेक फोडण्या देऊन हे पोहे, चविष्ट होण्याचा प्रयत्न करतात. परंतु, वाटले सपकच....'


तुझ्या पोह्यांना पण कधी फोडणीची गरजच नसते.....
ते चाविष्ट्च असतात नेहमी ..... !!!
एकदम मस्तय आज , जरा कुरुक्षेत्रावर फेरफटका मारून आल्यासारखे वाटले !!

Soumitra said...

kal ani aaj tuja blog vachun solid bar vatle, karan jast complication navti ekdun staright from the heart, so i didn't use my Brains to understand it, it directly communicated with the heart , keep writing

अनघा said...

ओ सौमित्र बुवा, म्हणजे नेहेमी मी तुझ्या डोक्याला त्रास देते वाटतं?! :)

Soumitra said...

hahahahahaa nahi ga tras kahi nahi, i really love to read u r blog daily or whenever i find time its so relaxing from routine work its always a gr8 break for me thats why i always tell you to keep writing , dokyala tras zala tar tuja kathe pramane Zandu baam lavin hahahaha

अनघा said...

:D :D

THE PROPHET said...

सही!!!
मला जायचंय एकदा पृथ्वीवर...खूप दिवसांपासूनची इच्छा आहे!

अनघा said...

विद्याधर, खरंच खूप छान वाटतं तिथे! प्रत्येकाने घ्यावा असा एक अनुभव! :)

Raindrop said...

OMG Iru ne likha blog pe???? Vijay aso vijay aso :)

But really...very nice!! So what if pohe were sapak...the evening was mast na :) I think it also had to do with the beautiful company u had :)

अनघा said...

:) Yes of course Vandu! And as usual, we were missing you!! :(

सौरभ said...

मला ह्या नाटकाची संकल्पना अज्जिबात पटली नाही. अशी "नाटकं" पृथ्वी थेटरात पाहण्याऐवजी मी थेटराबाहेरची नाटकीय संध्याकाळ बघणं पसंत करेन. :D

सौरभ said...

हि पुस्तकावर स्थळकाळ लिहण्याची पद्धत मला आवडली. :)

अनघा said...

सौरभ, एखादे सुंदरसे नाटक 'पृथ्वी'च्या अर्धवर्तुळाकार गृहात बसून बघण्याची मजा काही औरच! :)

अनघा said...

सौरभ, मग आपोआप त्या पुस्तकाला असंख्य आठवणी लगडून जातात! :)

श्रीराज said...

अनघा, घटना वाचायला मज्जा आली. ब्लॉगचे पालटलेले रूप ही सहीच. एकदम झक्कास!!!

अनघा said...

श्रीराज, आवडलं ना तुला हे नवं रूप?! विद्येची देवी सरस्वती आणि बाबा! दोघांचा आशिर्वाद घेऊन, रोज माझा दिवस आता सुरु होईल! नाही का? :)

श्रीराज said...

Amhala hi Saraswati cha aaytach darshan honar :) sahi na!!!