नमस्कार

नमस्कार

Pages

Tuesday, 5 October 2010

असेही अतिक्रमण!

सकाळचे ९.२०. ऑफिसजवळचा मोठा सिग्नल. माझी गाडी, मी सिग्नल व झीब्रा पट्टयांचा मान ठेवून उचित जागी थांबवते. मला उजव्या दिशेला वळायचं असतं म्हणून त्या रांगेत. अचूकरित्या सांगायचं म्हटलं तर बरोब्बर १२० सेकंद माझी गाडी स्तब्धता पाळते. आणि इथेच रोज एक नाट्य घडते. तर आपण आता बघु या आजचा दिवस...

रोल...
कॅमेरा...
अॅक्शन...
फिल्म सुरु होते त्यावेळी पांढरी झेन शांत उभी आहे. चालकाच्या खुर्चीत बाई आहेत. लाल सिग्नल नुकताच पडला आहे. एफएमवर 'मुन्नी बदनाम हुई' आताच सुरू झाले आहे. बाई आजूबाजूला बघत आपला वेळ घालवायचा प्रयत्न करीत आहेत. उजव्या हाताला डोक्यावरून फ्लायओव्हर झेपावलेला आहे. खाली जवळजवळ ३० भिकाऱ्यांची वस्ती आहे...चूल, बॅगा, अंघोळी. समोरच्याच पदपथावर असलेल्या पोलिसांच्या नजरेला, का कोण जाणे, पण ही वस्ती कधी पडलेलीच नाही. बाजूला उभ्या असलेल्या बऱ्याच गाड्यांना, आता भिकाऱ्यांनी विळखा घातलेला आहे. आपल्या गाडीच्या उजव्या बाजूने काळा ६/७ वर्षांचा मुलगा पुढे आलेला आहे. हातात दगड आहे. काचेवर दगड आपटायला सुरुवात. बाईंच्या कपाळाला आठ्या. चेहेरा हताश...ठक ठक ठक. काचेवर चरे. बाईंचा भीक देण्याला कट्टर विरोध. सिग्नलकडे आशेचा दृष्टीक्षेप. रेडीओ बोलतो आहे...'मैं झेंडू बाम हुई'. सिग्नल खाली असलेला इंडिकेटर वेळ दाखवतो...९८. अजून ९८ सेकंद शिल्लक आहेत...गाड्यांसाठी हिरवा लागायला.
cut to...मुलाच्या जोडीला आता त्याच्याचसारखी दिसणारी चार पाच वर्षांची मुलगी आलेली आहे. गळकं नाक, झिपरे केस. हात काचेवर आपटून बाईंचे लक्ष वेधायाचा प्रयत्न चालू केलेला आहे. काचेवर शेंबडाचे ठसे. पुलाखाली बसलेल्या मध्यमवयीन बाईंशी गाडीवाल्या बाईंची नजरभेट...त्या बाईचा क्लोज-अप...चेहेऱ्यावर विजयी हसू...'है तुझमे पुरी बोतल का नशा...बोतल का नशा'...

cut to...गाडीवाल्या बाई. सिग्नलकडे दृष्टीक्षेप...7० सेकंद बाकी...
cut to...सिग्नल. हिरवा सिग्नल आता पडलेला आहे. वेगवेगळ्या हॉर्नच्या आवाजांनी आसमंतात अकस्मात घाई निर्माण झालेली आहे...'मुन्नी बदनाम हुई, डार्लीग मेरे लिये'. भाऊ आणि बहिण मागे सरलेले आहेत. बाईंनी पहिला गियर टाकलेला आहे. तेव्हढ्यात त्यांच्या डाव्या बाजूने एक साधारण पस्तिशीचा तरुण इयरफोन लावून, लॅपटॉपचे दप्तर पाठीला लावून पुढे आलेला आहे. त्याने बाईंना थांबण्याचा इशारा केलेला आहे. आणि रस्ता पार करायला सुरुवात केलेली आहे. बाई थांबलेल्या आहेत. तरुण गाडीपुढून गेलेला आहे...cut to...बाईंनी क्लचवरचा पाय उचललेला आहे...'डार्लिंग तेरे लिये'...आता एक तरुणी पुढे आली आहे. सलवार खमीज, भुरभुरणारे केस आणि हसरा चेहेरा. बाईंना अधिकाराने हात दाखवण्यात आलेला आहे...'गाल गुलाबी,नैन शराबी रे'....रस्ता पार करायला तरुणीने सुरुवात केलेली आहे. बाईंचा पाय ब्रेकवर आलेला आहे. बाई आता सिग्नलकडे बघत आहेत. इंडिकेटर वेळ दाखवतो...३० सेकंद. हॉर्नचा आवाज शिगेला पोचलेला आहे. सरळ जाणाऱ्या गाड्यांची रांग सूतभर पुढे सरकू शकलेली आहे...cut to...बाईंनी गाडीला गती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. गाडी थोडी पुढे आलेली आहे. डावीकडून आता पाचसहा स्त्री पुरुषांचा घोळका सरसावलेला आहे. बाईना थांबण्यास सांगण्यात आलेले आहे. हताश बाईंचा पाय ब्रेकवर आलेला आहे...'तू झेंडू बाम हुई'...बाईंची सिग्नलवर नजर...इंडिकेटर...१० सेकंद...cut to...मुंबईचा जगप्रसिद्ध डबेवाला आत्मविश्वासाने हातगाडी घेऊन सरसावला आहे. रस्ता पार करायची त्याला घाई आहे...इंडिकेटर...३सेकंद...Loud Sound प्यॅ प्यॅ प्यॅ...cut to...आता उजव्या बाजूने गाड्या पुढे येण्यास सुरुवात झालेली आहे.सिग्नल लाल...बाई आणि इतर सर्व गाड्या जैसे थे स्थितीत...'आयटम बॉम्ब हुई, डार्लिंग तेरे लिये'...

मधुर भांडारकरांचा 'ट्राफिक सिग्नल' होता सिग्नलपाशी भीक मागणाऱ्यांच्या दृष्टीकोनातून...हा शब्दरूपी सिनेमा एका वाहनचालकाच्या दृष्टीकोनातून. पादचाऱ्यांचे गाडीवरील आक्रमण, शब्दांत पकडण्याचा प्रयत्न.

पादचाऱ्यांचा हिरवा सिग्नल तोडून एखादी गाडी निघाली तर शिटी ऐकू येते. परवाना जप्त होतो. दंड बसतो. गाड्यांसाठी हिरवा असताना गाडीला थांबवून पुढे जाणाऱ्या पादाचाऱ्यांना रोखणारा काही नियम?

की अतिक्रमण आपल्या रक्तात शिरले आहे?
कधी गाडीचे माणसावर...
तर कधी माणसाचे गाडीवर!

'है ये दुनिया सब, मेरे लिये...है मेरे लिये!'

12 comments:

श्रीराज said...

अनघा, चित्रपट 'वाचताना' भारीच मज्जा आली :D :D

आणि हो! स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने तू प्रकाशित केलेल्या पोस्ट नंतर, मी तसा कधी वागलेलो नाही हां!! ;)

अनघा said...

श्रीराज, धन्यवाद! शहाण्यासारखे वागायला सुरुवात केल्याबद्दल!!:)

Raindrop said...

there is actually a fine for 'jaywalking' but as you know the lesser person (jiski gadi chhoti/no gadi) is always potrayed as the voctim, no matter whose fault it may be....hence the get away with it.

अनघा said...

I have never seen any cop fining a person for 'jaywalking'. We just don't believe in rules. And the main problem is according to us everything is someone else's responsibility and it's never mine! That's what I think.

सौरभ said...

Law is only meant for Followers of it. There is no Law for Law breakers...
you should not always abide with law, sometimes you need to go outlaw for the law...

Soumitra said...

Anagha,
such a wonderful way of expressing, every scene was in front of my eyes, i think we don't need camera to capture everything , your writing is much powerful tool than a camera thanks for posting such a wonderful drama/movie/ short film,thanks to god for gifting you with such a talent. hey but did u reach on time to office??? hahahah keep writing

अनघा said...

ए सौमित्र!! आभार आभार आभार! मंडळ आभारी आहे! :)

अनघा said...

अरे सौमित्र, नाही ना! कारण रस्त्यावर चालणाऱ्या माणसांच्या हे लक्षातच येत नाही कि गाडीत बसलेल्या माणसांना देखील 'मस्टर' असू शकतो!! hehe !!

रोहन चौधरी ... said...

चालणाऱ्या लोकांना कसलाच नियम लागू होत नाही. आणि चालणाऱ्या लोकांना आपण नियमन पाळायला हवेत हे समजत देखील नाही. समजते तेंव्हा ते स्वतः एका गाडीत असतात / बसतात तेंव्हाच समजते... :)

अनघा said...

रोहन, आणि हे दुष्टचक्र चालूच रहाते....हो ना?

THE PROPHET said...

>>समजते तेंव्हा ते स्वतः एका गाडीत असतात / बसतात तेंव्हाच समजते
+१
शंभर टक्के सत्य!
चित्रपट मस्तच लिहिलाय...एकदम मस्त स्क्रिप्ट! शॉर्टफिल्म बनवा की...२-३ मिनिटांची! खरंच सांगतोय!

अनघा said...

हो ना विद्याधर, खरंच! हँडीकॅम घेऊन केलंच पाहिजे हे!!