नमस्कार

नमस्कार

Pages

Sunday 3 October 2010

डुप्लिकेट

"डुप्लिकेट करून घ्यायला हवं."
ड्रायव्हिंग परवान्याच्या पत्रावळ्या जवळजवळ वर्षभर सविताने सांभाळल्या होत्या. परंतु आता त्यातील छायाचित्राचे पानच गहाळ झाल्यामुळे त्वरित उपाय करणे गरजेचे झाले होते. एका शनिवारी, वेळात वेळ काढून ती तिच्या जुन्या ड्रायव्हिंग शाळेत पोचली होती. तेथील तरुण कारकुनासमोर तिने त्या पत्रावळ्या मांडल्या होत्या. त्याने छायाचित्राचे पान नसल्याबद्दल तक्रार न करता, मन लावून पत्रावळ्या क्रमवार लावल्या.
सविताने शरमेने विचारलं,"मग काय करायला हवंय मला त्यासाठी?"
त्याने खणातून फॉर्म काढला. तिच्याकडून भरून घेतला. २ फोटो, पत्रावळ्या आणि ६५० रुपये जमा करून घेतले आणि सोमवारी RTO च्या कार्यालात येण्याचे फर्मान काढले. पुढचा महिनाभर तो सोमवार आलाच नाही. तो महिना सविताने परवान्याशिवाय गाडी चालवली. नेहेमीच कसोशीने नियम पाळणाऱ्या सविताचा आणि वाहतूक पोलिसाचा त्या महिनाभरात संबध देखील आला नाही. शेवटी एक दिवस ड्रायव्हिंग शाळेतून फोन आला आणि RTO मधून आता तुमचा फॉर्म रद्दबादल केला जाईल अशी तंबी दिली गेली. मग सोमवार नाही तरी एक शुक्रवार उजाडला.
काळी पिवळी घेऊन RTO ला सविता पोचली तेंव्हा दुपारचे अकरा वाजले होते. वरुणराजाने आमच्या शहरातून आता काढता पाय घेतलेला आहे आणि सूर्यमहाराज विजयोत्सव साजरा करत आहेत. सविताला दूर उभी असलेली, ड्रायव्हिंग शाळेची गाडी दिसली. तिला दिलेल्या सूचनांचे पालन करित ती गाडीपाशी जाऊन उभी राहिली. चढती उन्हं असह्य व्ह्यायच्या थोडं आधी, एक गृहस्थ तिच्या दिशेने येताना तिला दिसले.
"काय काम आहे?"
"डुप्लिकेट करून घ्यायचंय. म्हणून तुमच्या माणसाने इथे तुमच्या गाडीपाशी उभं राहायला सांगितलंय."
"बरोबर. पण आमचे मास्तर इथेच होते इतका वेळ. आताच कुठे गेलेत."
पुढची पंधरा मिनिटे सूर्याचे शरसंधान तिने झेलले. मास्तर आले.
"डुप्लिकेटसाठी आलेय."
"हो. थांबा दोन मिनिटं."
मास्तरांनी नवीन परवान्यासाठी आलेल्या त्यांच्या विद्यार्थ्यांना गोळा करून त्यांची उजळणी घेतली व त्यांच्या परीक्षेसाठी त्यांना तयार केलं. मग मास्तर तिच्याकडे वळले.
"चला मॅडम."
मॅडमांना एका खोलीत नेण्यात आलं. तिथे पुढच्या पाच मिनिटांत; फोटो काढणे, डाव्या आंगठ्याचा शिक्का घेणे आणि सही घेणे ही कामे उरकली गेली.
"मॅडम, सोमवारपर्यंत मिळून जाईल तुम्हांला डुप्लिकेट."
सविता सुटकेचा श्वास सोडत तिथून निघाली तेंव्हा साडे बारा झाले होते.

'डुप्लिकेट'या कथेचा पूर्वरित भाग इथे संपला.
उर्वरित भाग, पुढच्या पाचव्या मिनिटाला सुरु होणार होता.

जुन्या टॅक्स्या मोडीत काढण्याच्या आदेशामुळे RTO च्या परिसरात नव्या चकचकीत ताज्या काळ्यापिवळ्या दिसत होत्या.
"टॅक्सी!"
कोरी टॅक्सी सुळकन येऊन सवितासमोर थांबली. आत म्हातारेसे दिसणारे, पांढरी टोपी घातलेले काका ड्रायव्हर सीटवर बसले होते. आत शिरली तेव्हा दिसले, गाडीचे अजून प्लास्टिक देखील निघाले नव्हते.
"काका, नवीन गाडी?"
सविताचे निरीक्षण अचूक होते. काका मराठीच होते.
"हो. आताच रिसीट घेतली आणि पहिलं गिऱ्हाइक म्हणून तुम्ही सवाष्ण मिळालात!"
तरुण सविताच्या पोटात खड्डा पडला. घशात आवंढा आला. सतीविरोधी कायदा नकोसा झाला. कपाटात कडीकुलपात बंद करून ठेवलेलं मंगळसूत्र डोळ्यांसमोर गरकन फिरलं. पाच मिनिटे कोसळलेल्या डोंगराखालून जिवंत बाहेर पडण्यात गेली. काकांचा हात वारंवार हॉर्नवर पडत होता. आणि तो कर्कश आवाज सविताला खोल गर्तेत ढकलून देत होता. "काका, आपण हॉर्न कमी वाजवूया." काका हसले. "ठीक."
पाच मिनिटांच्या स्तब्धतेनंतर सविताने काकांना विचारले,"कोकणातले का तुम्ही?"
"नाही. पुण्याचा. गावी शेतीभाती आहे. घर आहे. चार मुलं आहेत. दोन मुलं. दोन मुली."
"मुलं शिकली?"
"एक मुलगा शेती सांभाळतो. एक भिमाशंकरला कारखान्यात काम करतो."
थोडा वेळ शांतता.
"मुलींची लग्न करून दिली. एका मुलीला दोन मुलं आहेत."
"थकला असाल नाही का काका, संसाराचा भार उचलून?"
"थकलो खरा. पण स्वतःचे पैसे स्वतःच मिळवलेले बरे म्हणून मुंबईत येऊन टॅक्सी चालवतो."
सविताचा हुंकार. मुंबईच्या चिकटलेल्या गर्दीत, टॅक्सी संथ गतीने सरकत होती.
"एक मुलगी तिच्या घरी सुखी आहे. दुसरी परत आलीय."
"काय झालं?"
"नवरा खूप दारू पितो. हिने सोडचिठ्ठी दिली. आणि घरी परत आली."
"केव्हढी आहे?"
"बत्तीस."
"मुलं?"
"नाही. पोरंबाळं नाहीत. मी म्हटलं तिला, तुझं दुसरं लग्न करून देतो. नको म्हणते."
काका नंतर गप्प होते. ऑफिसपर्यंत टॅक्सी पोचली. सविताने पैसे दिले आणि पर्स उचलली.
"मुलगी म्हणते...ओरिजिनल तो ओरिजिनल. आणि डुप्लिकेट तो डुप्लिकेट!"
"अं?"
सविता वर गेली. खुर्चीत जाऊन बसली. पाण्याबरोबर जड आवंढा गिळला.

कोण जाणे, सविता डुप्लिकेट लायसन्स कधी ताब्यात घेईल.

(सत्यकथेवर आधारित)

8 comments:

THEPROPHET said...

छोटीशीच पण अस्वस्थ करणारी कथा!!

Anagha said...

धन्यवाद विद्याधर.

सौरभ said...

कधी कधी प्रतिक्रिया नं देणं हिच सगळ्यात मोठी प्रतिक्रिया असते... म्हणुन एक मूक प्रतिक्रिया...

Anagha said...

:'( :)

Shriraj said...

अनघा, ही कथा वाचताना माझ्या डोळ्या समोर आमच्या चाळीतली एक बाई येत होती. तिचा नवरा एका आजारात वारला. हातात कुठचीही डिग्री नसताना दोन मुलांचा सांभाळ तिने ज्या समर्थपणे केलाय...मी मानतो तिला. अर्थात अशा स्त्रिया तू ही पाहिल्या असशीलच.

असो, तुझी कथा अतिशय भावूक झालेय. I simply loved it!

Anagha said...

श्रीराज, पाहिल्या तर...आणि त्यांचं रोजचं मरण त्याच जाणो!

संकेत आपटे said...

हृदयस्पर्शी

Anagha said...

:)