नमस्कार

नमस्कार

Pages

Monday 27 September 2010

तिकोना!


कधी 'तिढा' अनुभवला...
तर कधी बॉलीवूडच्या कृपेने प्रेमाचे विविध 'त्रिकोण' बघितले. पण हे असं तीन दिशांना तीन तोंडं करून उभं असलेलं 'त्रांगडं' नव्हतं बघितलं!

'तिकोना'. पुण्यापासून ६० किलोमीटरवर. कामशेत जवळ. ३५०० फुट उंच. जवळजवळ १२०० फुट उभा चढ. नेहेमी गड चढणाऱ्या आपल्या मावळ्यांना आणि झाशीच्या राण्यांसाठी हा तीन कोन असलेला 'तिकोना' म्हणजे किस झाड कि पत्ती! नवख्यांसाठी मात्र चढायला कठीण.

आजूबाजूला वेगवेगळ्या विजयगाथा ऐकून नेहेमीच वाटत आलेलं.... 'शारीरिक बळापेक्षा मानसिक बळ वरचढ असतं'. काल दिवसाभरात गड काबीज करून संध्याकाळी गडाच्या पायथ्याशी उभं राहिल्यावर ह्यालाच पुष्टी मिळाली. बारा महिने चोवीस तास कम्पुटरवर इमाने इतबारे प्रेम केल्याची परतफेड पाठदुखीने केलेली. त्याचा विसर पडावा अशी ही फत्ते मोहीम! चोवीस शिपायांच्या हसण्यात आणि एकमेकांना जोम देण्याच्या उत्साहात गड चढलो कधी आणि उतरलो कधी... नाही कळलं.

निसर्गराजा महाराष्ट्रावर खुष आहेच. अजून पाऊस रेंगाळतो आहे. निसर्ग बिनधास्त लवंडला आहे. मग आता काय करावं? तो बिनधास्त तर आपण टेचात! जाडजूड कुंचला घ्यावा. मनसोक्त फराटे ओढावे. फराटे मारताक्षणी खाली कागद रूप घ्यावा. नाही तर हे दृष्ट लागेलसं पैस रूप कागदात माववायचं कसं? कागद छोटा नको पडायला. आधी निळा रंग भरावा आणि त्यावर पांढरा रंग बेधडक फिरवावा. मग पोपटी रंग घ्यावा आणि जमीन भरून टाकावी. ओला लुसलुशीत हिरवा रंग कधी उभा मारावा तर कधी आडवा. त्यावर पिवळे ठिबके तर कधी गुलाबी शिंतोडे. झाली की हजारो, लाखो रसरशीत निसर्ग चित्रे!

ईजिप्तमधील मानवनिर्मित पिरॅमिडना मान खाली घालायला लावेल असा हा निसर्गनिर्मित 'तिकोना'. कित्येक वर्ष ताठ मानेने खंबीर उभा. तीन कोनांना भेदणाऱ्या निमुळत्या पायऱ्या. शेवाळलेल्या भिंती. पाण्याने भरलेले दगडी हौद. मधूनच कानी येणारा पाण्याचा नाद. खोल खोल दरी. एखादं चुकीचं पाऊल आणि सोक्षमोक्ष. माथ्यावर नंदीबैलाचे प्रथम दर्शन. त्याच्या पुढ्यात शंकर. तळाशी मंदिरांची डोकावणारी कळसे. एखादा ओढा तर एखादा जलाशय. पवना नदी आळसावलेली. सुस्त पसरलेली एक पाउलवाट. कौलारू घरे. सौंदर्याचे भरभरून वाटप. निसर्गाचा हात ना आखडता ना थोटका.

मावळे आणि हिरकण्या पटापट चढल्या आणि पटापट उतरल्या. आम्ही त्यांच्या मागोमाग. सेनापती रोहनच्या आदेशांची तात्काळ अंमलबजावणी. किंचितसाही कचरा करायचा नाही हा आदेश तर सर्वच मावळ्यांनी मनापासून पाळला. जरासाही मागमूस मागे न ठेवता सेना दुपारनंतर पसार.

रोहन, शमिका, अनुजा, भाग्यश्री आणि वीस शिलेदार...मानाचा मुजरा!
आत्मविश्वास द्विगुणित केलात.
मनापासून आभार!
:)



















24 comments:

Shriraj said...

वाव!!! माझ्या मित्रांना सांगायला हवं या ठिकाणाबद्दल :)

Anagha said...

अरे श्रीराज, मला उलटंवाईट वाटलंय कि तुला ह्या ट्रेक बद्दल कळवायला मी कशी विसरले! sorry! :(

Kanchan Karai (Mogaraafulalaa) said...

मस्त लिहिलंयंस. फोटो तर छानच. सगळ्य़ांनी मज्जा केली.
मला यायला मिळालं नाही :-(
सगळ्यांचे वृत्तांत वाचून आता माझं मन ’मी पण, मी पण..’ म्हणत माझ्याकडे ट्रेकला जायचा हट्ट करेल की काय असं वाटायला लागलंय.

धवल said...

वाह अनघा बाई... गड किल्ल्यांची आणि या महाराष्ट्राच्या मोहक निसर्गाची नशा चढली तर तुम्हाला. आता पुढची मोहीम कुठे?

Anagha said...

तू पण आली असतीस कांचन, तर भेट झाली असती ना? भाग्यश्रीशी (भानस) झाली भेट! मज्जा आली पण! आता परत सेनापती रोहनच्या मागे लागुया आपण! :)

Anagha said...

धवल, चल तुझी ती तू सर केलेल्या ठिकाणांची यादी मला झटकन मेल कर पाहू! :)

THEPROPHET said...

जबरा झाला ट्रेक एकदम!
बाकी ठिकाणहूनही खबरा आल्या :P
सहीच!

Anagha said...

हो! आणि विद्याधर, प्रत्येकाची तो किंवा ती miss करत असणाऱ्यांची नावे वेगवेगळी होती! ह्याचा अर्थ जर सगळे आले असते तर बहुधा शिरगणती पन्नासाच्या वर गेली असती! :)

रोहन... said...

मस्तच पोस्ट... आणि धन्यवाद वगैरे कसले गं... तू तर चढताना आणि उतरताना सर्वात पुढे होतीस... :)

Raindrop said...

nobody clicked ur pix??

Anagha said...

Vandu, how will I have my pics? You need to visit my co trekker's blogs to see my pics! :)

Anagha said...

रोहन, तुला दिसतंय न लवकरच तुला अजून एका ट्रेकची आखणी करायला लागणार आहे! :)

सौरभ said...

क्या बात है!!! क्या बात है!!! मोहिम चांगलीच फत्ते केली म्हणायची की... seems like the climate was awesome too... आता पुढची मोहिम कुठे???
I wish I was there... :(
हाहा आणि हो... ते चित्र झक्कास काढलय. :D तुम्ही खरच 'हर हर महादेव' म्हणुन आरोळी ठोकलीत कि काय??? :D

Anagha said...

एकदम मज्जा सौरभ! खूप छान झाला आमचा ट्रेक! तू मायदेशी येण्याची काही तारीख वार असेल तर सेनापतींच्या कानावर आत्ताच घालून ठेव!
:)

विक्रम एक शांत वादळ said...

एकंदरीत ट्रेक मस्त झाला तर सर्वांनी मजा केली ना :)

फोटो मस्त आहेत :)

Anagha said...

हो विक्रांत...खूप मजा आली! आणि फोटो आवडल्याचे सांगितल्याबद्दल धन्यवाद! :)

Anonymous said...

अनघा, माझी ही पहिलीच भेट ब्लॉगवर.. (देर आये दुरुस्त आये म्हण...)
ट्रेकतर मस्तच झाला, नवीन ट्रेकचे प्लान्स सुरू झालेत, दिवाळीनंतर असेल सध्या ओक्टॉबर हीट जाउ दे..
छान झाली पोस्ट, सगळ्यांना भेटून खूप आनंद झाला.
शुभेच्छा :)

सौरभ said...

ह्हा स्वतःच्या लॅपटॉपवर आरामात फोटो बघण्यात काय सुख असते... वाह वाह... हि प्रतिक्रिया अगदी निवांत होऊन... ह्या ट्रेकबद्दल एक विस्तृत लेख येऊदे... अगदी तुमच्या आखणी पासुन ते मिटींग्स मग ट्रेकची सुरुवात, प्रवास, एकंदर ट्रेक आणि मग परत... अर्थात अथः पासुन इति पर्यंत...
ते कशाची तरी तहान कशावर तरी भागवतात ना (आयला विसरलो मी!!! plijj fill thos words for me...) तेवढंच आम्हाला सुख.

Anagha said...

सुहास, तुझे स्वागत आहे. आपल्या तिकोना ट्रेक कारणाने नवनवीन ओळखी झाल्या! नाही का? :)

Anagha said...

सौरभबुवा, 'दुधाची तहान ताकावर भागवाल' खरे पण आपल्याला त्यासाठी सेनापती रोहनच्या पोस्टची वाट बघायला हवी! त्याने म्हटलंय कि तो त्याच्या प्लानिंगपासून ट्रेकच्या शेवटपर्यंत लिखाणाची मस्त पोस्ट करणार आहे! मीही वाटच बघतेय त्याच्या त्या पोस्टची! :)

अपर्णा said...

aare waa tu geli hotis ka treck la....sahi aahe..Rohan barobar cha ek treck plan karayala aata mi parat kadhi yenar mahit nahi......majja yete na sahyadrichya angawar bagdayla???
Enjoy!!! (Post masta jhali aahe)

Anagha said...

हो! खूप मजा केली आम्ही अपर्णा! :) पावसाने नुकतंच अंग काढून घेतल्यामुळे सगळं कसं एकदम हिरवागार होतं! :)

संकेत आपटे said...

फोटो एकदम झक्कास... अप्रतिम.

Anagha said...

ट्रेक पण मस्त झाला होता आमचा संकेत! :)