नमस्कार

नमस्कार

Pages

Tuesday 31 August 2010

तळपट

विमानतळावरचा गोंधळ.
गजबजलेले फुटपाथ.
वाहतुकीची कोंडी.
चार दिशांना उडणारे उड्डाणपूल.
रंग बदलणारे सिग्नल.
उन्हात तळपत्या इमारती.
सगळं सारखंच तर होतं.
ड्रायव्हरला इंग्रजी नाही कळलं. पण पोलिसाने त्याला पत्ता समजावून सांगितला आणि टॅक्सी भरधाव निघाली. खिडकीबाहेरचं बीजिंगमधील दृश्य मोकळ्या जागा सोडल्यास काही विशेष वेगळं नव्हतं.

आमच्या दुर्दैवाने पुढच्या पाच मिनिटात वेगळेपण अंगावर आलं.

आमच्या पायाखालची जमीनच वेगळी होती!

आज ठाणे ते दादर गाडी चालवली.

जगभर सर्वसामान्य नैसर्गिकरीत्या, पाऊस न झाल्याने करपून गेलेल्या जमिनीला भेगा पडतात, तुटून तुकडे पडतात. उपाशीपोटी माणसे मारतात.
आमच्या मुंबईत पावसाने जमिनीला भेगा पडतात. तुटून तुकडे पडतात. आणि मग भरल्यापोटी माणसे मारतात.

कोणाच्या पापाची ही फळं? आम्ही का भरतोय? कोणाला शिक्षा का होत नाही? कोणाच्याच बापाचं का काही जात नाही? केलेल्या छोट्याश्या चुकीमुळे देखील दुसऱ्याला त्रास झालेला आपल्याला सहन होत नाही. मग रस्त्यावरील प्रत्येक खड्ड्याचा इतक्या हजारो माणसांना त्रास होत असताना, ह्यांना काहीच कसं वाटत नाही? शिव्याशापांचे भय का वाटत नाही? हे नरकात जातील, ह्यांच्या शरीरात किडे पडतील, तळपट होईल ह्यांचे.....ह्या अश्याच आणि ह्याहूनही भयानक शिव्या रोज हजारो नागरिक ह्यांना देतात. मग हे कधी मारतात? ह्यांचे मरण असते तरी कसे? किडे पडतात का ह्यांच्या शरीरात?

आणि हो. एक राहिलंच की! ते गुळगुळीत रस्ते, ते अवकाशात झेप घेऊन हलकेच जमिनीवर टेकणारे उड्डाणपूल आणि मी आंधळी कोशिंबीर सहज खेळू शकेन असे ते फुटपाथ...ह्यांची निर्मिती ज्यांनी केली त्यांच्या चेहेऱ्याची ओळख मात्र नाही झाली! ते कोण हुं चूं की फूं होते कोण जाणे! इथे कसे, प्रत्येक पावलाला ठेचाळणाऱ्या माझ्या नशिबाची जबाबदारी ज्या राजकारण्यांची आहे तो प्रत्येक चेहेरा त्याची किळसवाणी झलक रोज मला रस्त्यारस्त्यात लटकणाऱ्या फडक्यांवरून देत असतो! नाही का?

पुढच्या खड्ड्याची खोली न समजल्यामुळे पाताळात जाऊन वर आले.
"इतकं भयाण मरण येईल ह्यांना कि यमराजाला त्याच्या कल्पकतेचा अभिमान वाटेल!"

8 comments:

rajiv said...

अग सत्ता , मदीरा यांचा चढलेला कैफ याच रस्त्यावरून, त्यांच्याच मोटारींच्या `बम्पर' ला बांधून फरपटत नेले तर त्यांना कदाचित रस्ते किती गुळगुळीत आहेत ते समजेल.
हाताला हात, डोळ्याला डोळा, फरपटीला फरपट अशा शिक्षाच कदाचित आपल्यला वाचवू शकतील.


धान्य सडून गेले तरी चालेल पण कोणाच्या मुखी लावण्याचे पाप माथी घ्यायला तयार नसणारी हि माणसे, सर्वोच्च न्यायालयाला पण दुर्लक्षित करू शकतात , तर ह्यांच्या मुखी फक्त तेच धान्य का कोंबण्यात येऊ नये?

Raindrop said...

'No accountability' and 'no self quality control'...two reasons for such things.

rajiv said...

अग, अजूनही `दुसऱ्यांचे' राज्य असल्यामुळे सत्तेबाहेर असलेला प्रत्येक राजकारणी व त्यांचे (ना)कार्यकर्ते फक्त `काय दे (नाहीतर) भंग ' करण्याची चळवळ अजूनही सतत राबवीत असतात . अशांच्या लोकसंख्या वाढीमुळे आणि त्यामुळे स्वयंबेशिस्तीस असलेल्या लोकाश्रायामुळे हे पहावे लागतेय .

Shriraj said...

खरंच तीळ-पापड होतो अंगाचा..भौगोलिकदृष्ट्या काय कमी आहे गं इथे, पण आपल्या लोकांनी मिळून वाट लावलेय या देशाची

BinaryBandya™ said...

बागेत ४ बाकडी असतात ..
आणि बाकड्यावर " माननीय(?) नगरसेवक(?) **** ह्यांच्या अनुदानातून "

कधी सुधारणार माहित नाही ..

Maithili said...

अगदी मनातले लिहिलेत हो...!!! :(
BTW, पहिल्यांदाच आले इथे...मस्त आहे तुमचा ब्लॉग...खूप खूप आवडला....!!!

Anagha said...

मैथिली, छान वाटलं तुला माझं लिखाण आवडलं हे वाचून! धन्यवाद! मंडळ आभारी आहे! :)

Anagha said...

मला न खरंच कळत नाही कि ह्या सगळ्यावर उत्तर काय आहे? आणि हे असे कधीपर्यंत चालणार आहे?! हताश व्हायला होतं हे सगळं बघून!