नमस्कार

नमस्कार

Pages

Wednesday, 18 August 2010

विश्वास

मे महिन्याची उन्हाळी सुट्टी. दुपारच्या भर उन्हात खाली खेळायला परवानगी नाही. इमारतीच्या जिन्यावर वरच्या पायरीवर दोघी खेळत होत्या. वय वर्ष धाकटीचं चार तर मोठीचं दहा. चिंचोळ्या जागेत पकडापकडी! धाकटीचा तोल गेला. छोटासा जीव सहा सात पायऱ्या गडगडला. मोठीचा जीव घाबराघुबरा झाला. छोटीला इथे तिथे खरचटलं. डोक्याला एक टेंगुळ आलं. टपोरे डोळे डबडबले. मोठीने तिला हात धरून घरात आणलं.
सुधा करमरकरांच्या बालनाट्यात चेटकीण म्हणून शोभाव्यात अश्या एक बाई ह्या दोघींना सांभाळायला घरी ठेवलेल्या. डोळ्यावर जाड भिंगाचा चष्मा. कुरळे कुरळे कायम विस्कटलेले केस. पिवळे पुढे आलेले दात आणि मळकट साडीच्या पदराचा बोळा कमरेला खोचलेला. त्यांनी छोटीचा हात खेचून समोर उभं केलं. तोपर्यंत टेंगुळ बरंच उभारलेलं. मोठी मागे उभीच होती. "काय ग? काय झालं हिला? एव्हढं कसं लागलं?" पिवळ्या दातांतून प्रश्र्न फिस्कटला.
"जिन्यांवरून पडली ती!" घशात अडकलेल्या हुंदक्यातून उत्तर कसबसं बाहेर पडलं.
"पडली? अशी कशी पडली? तूच ढकलून दिलंस न तिला?"
ह्या अनपेक्षित हल्ल्याने मोठी हबकली. हे असं काही आपण करू शकतो ही मारेकऱ्याची भावना तिच्या मनाला स्पर्श न केलेली होती. बाईं मात्र झोपड्यांच्या दुनियेतील 'हाणामारी' गणितांत अतिशय तरबेज होत्या.
छोटीच्या रडणाऱ्या सुरात मोठीने सूर मिळवला.
संध्याकाळी आईबाबांच्या कानावर बाईंनी तावातावाने मोठीची तक्रार घातली.
आईने खाली मान घालून उभ्या असलेल्या मोठीकडे नजर टाकली. बाबांनी पाचसहा दिवसांत चेटकीणबाईंना बाहेरचा रस्ता दाखवला.

6 comments:

रोहन चौधरी ... said...

तू छोटी की मोठी ???? बहुदा मोठीच... :) करण पोस्ट छोटी आणि मतितार्थ खूप्पच मोठा... :)

अनघा said...

:D

श्रीराज said...

तुझ्या नावाला सार्थ असा तुझा स्वभाव आहे...माहितेय मला :)

अनघा said...

श्रीराज, शोधलास वाटतं माझ्या नावाचा अर्थ?? :)

संकेत आपटे said...

अनघा म्हणजे निष्पाप ना?

अनघा said...

हो संकेत! :)