नमस्कार

नमस्कार

Pages

Monday, 9 August 2010

दप्तर

खांद्याला अडकवलेलं शाळेचं दप्तर. त्यात फक्त आकारात लहानापासून मोठ्ठा इतकाच काय तो बदल अपेक्षित. त्यावेळी आतासारखी दप्तरांमध्ये विविधता नव्हती. आणि बहुतेक वेळा तरी मध्यमवर्गीयांच्या घरातून सगळे आलेले असल्याने सगळ्यांची दप्तरे जवळपास सारखीच असायची.

अंदाजे पाचवीत असेल आशी तेंव्हा. तिच्या बाबांनी उत्तम प्रतीची चामड्याची बॅग खास बनवून आणली. बॅग अतिशय सुंदर होती. महाग होती पण मित्राला त्यांनी दर महिन्याच्या पगारातून थोडेथोडे करून लवकरच पूर्ण पैसे देण्याचं वचन दिलं होतं. आणि माधवरांवाच्या वचनावर कोण अविश्वास दाखवेल? कामावरून येताना ट्रेनच्या गर्दीतून ती नवीकोरी हातभार लांबीची बॅग, खूप जपून ते घेऊन आले होते. त्यांना आठवत होतं तो त्यांनी डोक्यावर धरलेला त्यांचा शाळेच्या पुस्तकांचा ढीग आणि ती गावातील मळवाट. त्यांची मुलगी मात्र सुंदर चामड्याचं दप्तर घेऊन, शाळेच्या बसमधूनच प्रवास करणार होती.

घरी पोचल्यापोचल्या माधवराव आशीची सगळी पुस्तकं घेऊन बसले. व्यवस्थित रचून त्यांनी ती बॅगेत भरली. कोपऱ्यात पेन्सिलची डबी देखील ठेवली. बक्कल बंद करून बॅग उभी केली. सगळं कसं अगदी मनासारखं झालं होतं. गोंधळून बाजूला उभ्या असलेल्या आशीच्या हातात त्यांनी ती सुपूर्त केली. बॅग छान होती. तिने हातात धरली. खांद्याला न लावता ती हातात धरून न्यायची बॅग. म्हणजे बसमध्ये बसल्यावर मांडीवर घेऊन बसता येण्यासारखे होते. ती बाबांकडे बघून हळूच हसली.

दुसऱ्या दिवशी तिच्याबरोबर बॅग प्रवासाला निघाली. बसमध्ये मांडीवर बसली. सगळ्यांच्या नजरा बॅगेवर गेल्या. कोणी काहीच बोललं मात्र नाही. मुलांना गोळा करत तासाभराचा फेरफटका मारत बस शाळेबाहेर उभी राहिली. सगळ्यांच्या खांद्याला कापडाचं दप्तर आणि आपल्या हातात चामड्याची बॅग हे पाहून आता तिला थोडं धडधडायला लागलं. जागेवर आशी पोचली तेंव्हा रोज शेजारी बसणारी मैत्रीण तिच्या हातातल्या बॅगेकडे बघू लागली. आशीने नेहेमीच्या सवयीने समोरच्या बेंचच्या खालच्या कप्प्यात बॅग सरकवली. पण बॅग त्या निमुळत्या तोंडात शिरली नाही. कोंबायच्या पहिल्या प्रयत्नात बॅगेला पहिला ओरखडा गेला. मग आशीने बॅग पायाशी ठेवली.

घरी परतल्यावर आपली वह्यापुस्तके पुन्हा जुन्या दप्तरात ठेवली तेंव्हा ते जुनं दप्तर जरी खुश झालं तरी नवी बॅग खिन्नच झाली. माधवराव आले तेंव्हा त्यांनी कोपऱ्यात रुसून बसलेल्या चामडी बॅगेकडे नजर टाकली. आशीने गृहपाठ करताकरता चोरून बाबांकडे बघितले.
"बाबा, मला दिवसभर दहावेळा वाकून बॅग उघडायला लागते आणि दहा वेळा बंद करायला लागते!" खरं तर वह्या आणि पुस्तकं सकाळी पोचल्यावर एकदाच बॅगेतून काढून कप्प्यात ठेवली तर काम भागण्यासारखं होतं.
परंतु, अशी बॅग अख्ख्या शाळेत कोणाकडेच नव्हती आणि जगावेगळं करायचं धैर्य तिच्यात अजूनतरी आलेलं नव्हतं.

त्यानंतर बरेच महिने माधवराव आपल्या तुटपुंज्या पगारातून हे चामडी कर्ज फेडत होते. आणि मग काळाच्या ओघाने जेव्हा चामडीवर पांढरट बुरशी धरू लागली, चकचकीत बक्कल लालसर गंजू लागले तेव्हा रद्दीवाल्याने त्यांना त्याचे मोजून तीस रुपये दिले.

12 comments:

श्रीराज said...

Anagha, chanach ahe ga!!! Halli loksatta chya agralekhanpeksha mla tuze posts jasta vachniya vatu laglet. Fakta mla rumal gheun basava lagta (dole pusayla)

Deva, tuze abhar...mla Anagha chya blog cha rasta dakhavlya-baddal

अनघा said...

श्रीराजबुवा, रडका सूर लागतोय वाटतं माझा पुनः??

Gouri said...

मी तर कुणालाच सांगितलं नव्हतं. तुला कसं समजलं ग?

अनघा said...

:)

भानस said...

हे असं जगावेगळं करायचं धारिष्ट्य न होणं अनेकदा आपल्या माणसांना दुखावून जातं. खरं तर जगाला आपल्याशी काहीच देणंघेणं कधीच नसतं. पण त्याचा आपणच केलेला बागुलबुवा मात्र आपला व आपल्या माणसांचा आयुष्यभर छ्ळ करत राहतो.

अनघा, पोस्ट छान.

सावधान said...

asa baryachada ghadata aapalya aayushyat naahi kaa? Mi lapatop sathi katadi bag aanali aani mag ticha 1kilocha ojha vatu lagal mhanun kapadi bagcha vaparu lagalo.aata hi 500/- chi bag dhool khat padaleli asate.
Chhan ! lihita tumhi ham!!

Vandana Natu said...

sometime at a loss of words...and the more i think, the more i feel that i want to give a spectacular comment...but kahi suchatach nahi.

very very nice :) and this is the longest piece in marathi i have read till date :)

Deepak said...

खूपच छान...आई वडील नेहमी आपल्या मुलांसाठी त्यांचा खिशाला न परवडणाऱ्या सोयी उपलब्ध करून देत असतो कारण त्यांनी कष्टाने घालवलेल बालपण आपल्या मुलांच्या वाट्याला येऊ नये हाच त्यांचा उद्देश असतो...

अनघा said...

खरं आहे गं तुझं भाग्यश्री, अश्या किती टोचण्या लागून राहिल्यात!

अनघा said...

सावधान, धन्यवाद! मंडळ आभारी आहे! :)

अनघा said...

वंदू, कशी तू वाचू लागलीस ना मराठी?! मस्त!! एकदम खुश झालेय मी स्वतःवरच! :)

अनघा said...

दिपक, फक्त आईबाबांनी आपल्यासाठी काढलेल्या खस्ता अश्या उशिरा ध्यानी येतात!