नमस्कार

नमस्कार

Pages

Sunday 8 August 2010

देणं

काळं करडं गुबगुबीत कबुतर. धुळीत मान टाकून भूमिगर्भातून येणारे आवाज ऐकत सुन्न पडून राहिले होते. उड्या मारत धावत येताना तिची नजर त्याच्यावर पडली आणि ती तिथेच थबकली. एखादी कलाकुसर असावी तश्या त्याच्या करड्या रंगावर काळ्या दोन पट्ट्या होत्या. आणि चोच तशीच करड्या रंगाची. त्याचे अर्धवट मिटलेले डोळे. पण तिला माहित होतं. पोट हलणारी माणसं जिवंत असतात. आणि त्याचं पोट हलत होतं. म्हणजे तो जिवंतच होता. त्याला मदतीची गरज होती. तशीच पळत ती घरी गेली आणि पाच मिनिटात पाण्याची वाटी घेऊन परतली. दचकून तिने बघितलं. त्याचं फुगीर पोट आता हलत नव्हतं. लालसर पाय हवेत ताठ उभे राहिले होते. म्हणजे? मागे तिची मैत्रीण येऊन उभी राहिली तेंव्हा तिचे डोळे पाण्याने डबडबलेले होते.
"अगं, ते मेलय."
हिच्या तोंडून शब्द न फुटल्याने मैत्रीण समोर येऊन उभी राहिली. कमरेवर हात धरून.
"तुला रडायला काय झालं?"
पाण्याची वाटी जेमतेम हातात राहिली होती.
"आता काय करायचं आपण?"
"काय करायचं म्हणजे?"
ओघळणारे डोळे आणि वाहणारं नाक पुसून ती म्हणाली," अगं, आता आपल्याला त्याला पुरायला नाहीतर जाळायला हवं न?"
"काय? तुला कोणी सांगितलं हे?"
"मला माहितेय. असं आपण केलं तरच ते देवाघरी जाऊ शकेल."
"नाहीतर काय होईल त्याचं?" मैत्रिणीचा जरब असलेला आवाज आता थोडा उतरला होता.
"नाहीतर त्याचं भूत असंच इथे फिरत राहील!"

पुढच्या दहा मिनिटांच्या आत त्या कबुतराच्या आत्म्याला शांती मिळवून देण्यासाठी त्याचं ते फुगीर शरीर कचऱ्यातून जमवलेल्या कागदांवर पसरलं आणि घरातून पळवून आणलेल्या आगकाडीने ते पेटून निघालं.

कबुतराच्या आत्म्याने विलीन होताहोता गुढघ्याच्या खाली लोंबकळणाऱ्या झग्याच्या बाह्यांना वारंवार डोळे पुसणाऱ्या मुलींचे शतशः आभार मानले.
काही देणी गेल्या जन्माची असतात.

6 comments:

Shriraj said...

काय गं अनघा, रडवलंस ना मला!!

Raindrop said...

some balancesheets carry on for lifetimes before the credit and debit can face each other with an equal smile. it takes an expert to know even the slightest of debt hanging on. she recognised it and cleared it that day.

Deepak said...

अगदी बरोबर !
काही देणी गेल्या जन्माची असतात ...
परंतु बरीचशी देणी याच जन्मात फेडावी लागतात आणि ती फेडलेलीच बरी .....

भानस said...

Deepak +1

rajiv said...

हे देणे होते? छे छे, मला तर हे जमवणे वाटले ! पुण्य गोळा करणे !
दुसऱ्या जीवाप्रती असणारी ममता व परोपकारी वृत्त्ती !
हे पुण्यच या व पुढच्या जन्मी (असला तर) आपल्या मनास कठीण काळात आधार देत असते!

Anagha said...

वंदू, दिपक, राजीव, भाग्यश्री आणि श्रीराज ....धन्यवाद प्रतिक्रियांबद्दल..आणि इतक्या उशिरा उत्तर देण्याबद्दल माफी! :(