नमस्कार

नमस्कार

Pages

Wednesday, 4 August 2010

दुःख तुझे...सुख माझे

ती मुंबईतली रात्र होती...तिला जुना निद्रानाश होता. सूर्यास्त आणि सूर्योदय ह्यामधील कालावधीत टक्क जागी. अथांग पसरलेल्या आढ्याकडे नजर लावून.

सायनवरून ठाण्याकडे जाणारा तुडुंब भरलेला रस्ता त्यावेळी विमानातून बघितले असता कीबोर्डसारखा दिसत असावा. वेगवेगळ्या आकाराची, जागची न हलणारी कचकड्याची नुसतीच झाकणे. दूरवरून अॅम्बुलन्सचा क्षीण आवाज गाडीतील वाजणाऱ्या रॅप संगीतातून देखील त्याच्या कानावर आला. उजव्या हाताशी असलेल्या आरशात लाल दिवा फिरू लागला. त्या घट्ट अडकून बसलेल्या गाड्यांमधून ती कधी पुढे सरकेल कोणास ठाऊक. क्षीण आवाज, अतिशय मंद गतीने स्पष्ट होऊ लागला. डोक्यात भणभणण्याइतका. एखाद्या चित्रपटातील एखादं 'स्लो मोशन'च दृश्य असावं ह्या रीतीने ती अॅम्बुलन्स पुढे सरकू पहात होती. जशी ती त्याच्या गाडीला मागे टाकून थोडी पुढे सरकली तशी त्याची नजरभेट मागे बसलेल्या तरुण स्त्रीची झाली. पदराचा बोळा तोंडावर. नजरभेट एका क्षणाची. तिचा प्राण समोरच्या शरीरात अडकून बसला असावा. ती नजरभेट त्याला सांगून गेली.
अॅम्बुलन्स पुढे गेली. तिच्या मागून एक, दोन, तीन....न संपणाऱ्या गाड्यांचा ताफाच निघाला. अॅम्बुलन्स वाट काढत होती. ताफा तिचा मागोवा धरत पुढे जात होता. रस्त्याला उशिरा का होईना तिच्या अस्तित्वाची जाणीव झाली. 'टेन कमांडमेंटस' मधील समुद्र जसा दुभंगला तसा गाड्यांचा हा कीबोर्ड दोन दिशांना सरकला. मागे जवळजवळ पाच गाड्यांचा ताफा.
कोणी मोठी व्यक्ती दिसतेय. त्याची गाडी सहाव्या नंबरावर सरकू लागली. लाल दिव्याचा नियम अॅम्बुलन्सला नसतो. पाच गाड्यांमागून सहावी गाडी निघाली. आणि एका क्षणात त्या पाचही गाड्या आपापली गती पकडून समोरच्या रस्त्यावर नाहीश्या झाल्या. साखरेचा दाणा नाहीसा व्हावा आणि मुंग्यांनी आपापला मार्ग धरावा.

तो चक्रावला. त्या गाड्यांचा त्या मरणासन्न मनुष्यजीवाशी काहीही संबंध नव्हता?

एका क्षणात त्याला जाणीव झाली.
हे आपल्याकडून काय घडले?
त्या अॅम्बुलन्सची ढाल करत आपण ह्या ट्रॅफिक जॅम मधून मार्ग काढला?
ती हमसाहमशी रडणारी स्त्री...तिने एकवार आपल्यावर टाकलेली नजर.
मेलेल्याच्या टाळूवरचे लोणी खाण्याची ही वृत्ती आपल्यात कधी शिरली?
वाळवीचा छुपा शिरकाव व्हावा ..आणि आपल्या सदविवेकबुद्धीचा भुसाच उरावा?

आपल्या सुंदर पत्नीबरोबर 'कँडल नाईट डिनर' करण्याचा त्याचा बेत अतीव थकव्यामुळे मागे पडला.

16 comments:

rajiv said...

खूप सुंदर ! तुझ्या रोजच्या लिखाणात एक `श्रीयुत' असतोच !
(आर .के. लक्ष्मण यांच्या व्यंगचित्रातल्याप्रमाणे)
वाचकातला माणूस जागे करणारा !!

Raindrop said...

hindi mein it is called 'behti ganga mein haath dhona' but the difference here is that this ganga was someones tears and people still wouldn't mind wiping their hands off it, if it suited them.

so vividly described and written Anagha!

Deepak said...

अशा चुका सगळ्यांचाच हातून होतात परंतु ज्याला या चुकीची जाणीव होते
तोच खरा सज्जन माणूस .....कदाचित

shekhar said...

fharch chhan !
hrudaysparshi!!

श्रीराज said...

काय गं अनघा! मी एक बघितलंय!! मी कसल्याही मूडमध्ये असलो तरी तू मला गप्पच करतेस!!! पण हे चांगलंच करतेस तू... राजीव म्हणतो तसं माझ्यातला माणूस त्यामूळे जागा होतो.

akhalak said...

कदाचित कोंबडीच्या जिवंत पिळाला गिधाड जिवंत फाडत त्याच्यापेक्ष्या अमानवीय कृती आहे
Kevin Carter च्या पाहिलेल्या फोटोग्राफ ची आठवण झ्हाली
मन सुन्न करणारं लिखाण आहे .

भानस said...

रडणार्‍या स्त्रीची ती नजर वाळवीला भेदून गेली म्हणजे अजूनही धुगधुगी आहे तर.... परंतु,
माणुसकी हृदयात असली तरी वर्तनात जोवर दिसत नाही तोवर....

यथार्थ चित्रण.

अनघा said...

राजीव, आर. के. लक्ष्मण एकदा म्हणाले होते...जर मी व्यंगचित्रकार झालो नसतो तर मला वेड लागले असते...ह्या माध्यमातून मला, समाजातील पीडादायक गोष्टींमुळे झालेल्या मनस्तापाला मोकळी वाट मिळवून देता येते. त्यांच्यासारख्या इतक्या मोठ्या व्यक्तीशी बाकी साधर्म्य काही नाही परंतु डोकं ठिकाणावर रहाण्यासाठी मला लिखाणाची मदत होते हे मात्र नक्की.
:)

अनघा said...

वंदू, ह्या धकाधकीच्या आयुष्यात आपण माणूस व्ह्यायचेच विसरलोय. नाही का?

अनघा said...

दिपक, हल्ली आपण नाही का बघत...एखादा सज्जन माणूस बऱ्याच वेळा कसा बावळट ठरवला जातो! आणि त्याला ह्या समाजात जगणे नकोसे होऊन जाते. नाही का?

अनघा said...

भाग्यश्री, पावलोपावली ह्या गोष्टी घडताना दिसतात...आणि करणारे 'मग? त्यात काय झाले? एव्हढं काय त्यात' अशीच भूमिका बाळगून असतात.

अनघा said...

अखलक, तुला आता परदेशी राहिल्याने, इथे ह्या दररोज घडणाऱ्या गोष्टीची आठवण नक्कीच त्रासदायक झाली असणार.

अनघा said...

शेखर, तू येऊन माझं लिखाण वाचलंस, मला आनंद झाला. :)

Saurabh said...

हम्म्म... I greatly appreciate your observations and the way you put them into words... बाकी आपण चुप्प... न्हेमीसार्के

रोहन चौधरी ... said...

आर. के. लक्ष्मण एकदा म्हणाले होते..'समाजातील पीडादायक गोष्टींमुळे झालेल्या मनस्तापाला मोकळी वाट मिळवून देता येते'

खरच मनस्ताप कोणाचा जीव देखील घेऊ शकतो हे मला गेल्यावर्षी उमगले.. माझ्या एका मित्राने सध्याच्या एकंदरीत परिस्थितीवर वैतागून आत्महत्या केली. NCC बेस्ट कॅडेट आणि राजपथला सलामी देऊन आलेल्याला हे असले जगणे काही जमले नाही... 'आर्मी'मध्ये गेला असता तर... कदाचित .........

अनघा said...

रोहन! :(