नमस्कार

नमस्कार

Pages

Thursday, 15 July 2010

आमची पिढी

बालीच्या रस्त्यावरून सकाळी सात वाजता टॅक्सीतून जाताना खरं तर वेगळं काही वाटलं नाही. आपल्या कोकणातल्या एखाद्या रस्त्यावरून आपण जातोय असंच वाटत होतं. नजर जिथे पोचेल तिथे हिरवीगार झाडी, धावणारी निळीशार नदी, पांढरा शुभ्र ओढा आणि ती लालचुटुक कौलारू घरं. त्या कौलारू घरांच्या चारी टोकांवरून, आभाळाकडे रोखलेल्या, इंडोनेशियनच वाटाव्या अशा लाकडी कलाकुसर आकृतींमधून मात्र फरक नजरेत भरत होता. धावत्या दुचाकीवर आपल्या वडिलांना पाठीमागून घट्ट विळखा घालून, पाठीवर दप्तर अडकवलेली छोटी बच्चे कंपनी आपल्या मुलांसारखीच अजूनही डुलक्या काढत होती. हे सगळं बघत असता एक वेगळीच गोष्ट नजरेत भरली. आमच्या टॅक्सीजवळून अशीच एक दुचाकी गेली आणि नजर पडली ती त्या मुलाच्या मागे अडकवलेल्या झाडूकडे. मग नीट बघितलं तर लक्षात आलं सगळीच मुलं झाडू घेऊन निघाली होती. "गुंतूर, ही मुलं कुठे निघालीयत?" आमच्या अगदी भारतीयच वाटावा अश्या वाहकाला विचारलं.
"कुठे म्हणजे? शाळेत."
"पण मग... झाडू?"
"आधी जाऊन वर्ग नको का साफ करायला? रोजच ही मुलं घरून झाडू घेऊन निघतात आणि शाळा सुरु होण्याआधी आपापले वर्ग झाडून घेतात!"
आता हे ऐकल्यावर फारच आश्चर्य दाखवून चालणारं नव्हतं. तरच 'तुमच्या देशात असं नाही का करत' हा नकोसा प्रश्न टाळता येण्यासारखा होता.

परवा जेंव्हा एका दिवसाचा कोकणचा फेरफटका मारला तेंव्हा ही आठवण वर डोकावली. बाली आणि माझं कोकण, ह्यातील साधर्म्य शोधणारी माझी त्यावेळची नजर मला आज सत्याला सामोरं जायला भाग पाडू लावत होती. अर्धवट भरलेल्या माझ्या नद्या, किनाऱ्याशी असलेला प्लास्टीकचा कचरा फारश्या थोपवून धरू शकणार नव्हत्या. थरच्या थर कचरा. दुरून नजरेला टोचणारा, बोचणारा.

काय करणार....ना आम्हांला कोणी सकाळी प्रथम आमचा वर्ग झाडायला शिकवलं...ना ते आम्ही कोणाला शिकवलं.
आम्ही फक्त सकाळी रांगेत उभे राहिलो आणि देवाची स्तुती केली...पण देवाच्या कार्याचा मान राखायला कोणी नाही शिकवलं.
मी गाडीत माझ्या शेजारी बसलेल्या बहिणीला म्हटलं...."आपली पिढी फुकट गेली."
प्रत्तुत्तर मिळालं. "आपल्या चार पिढ्या फुकट गेल्यात."

4 comments:

Writer & Filmmaker said...

hey when we were younger...we were made to clean up the classroom...2 kids would stay back everyday (roll number wise) and clean up the class while the rest were attending assembly.

but today i guess if any school does this...they will be sued for child labour and what not...

अनघा said...

hmmmmm

श्रीराज said...

आपल्या लोकांची स्वच्छतेबाबत आणि एकूनच निसर्गाबद्दलची अनास्था बघून खरच खूप वाईट वाटतं गं!

akh said...

मला हा फरक इकडे बुस्सेल्तोन मधेय आल्यानंतर लगेच दिसला , कोंकनाच्या तुलनेत ऑस्ट्रेलिया मला फार्स सुंदर वाटत नाही कदाचित माझे गाव (आपला तो बाल्या आणि दुसर्याचे ते कार्टे म्हणी प्रमाणे ) जास्त निसर्गरम्य वाटते.
पण एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते, एकदा मला एक कचरा वाला दिसला, मी विचार केला हा एवढा म्हातारा आहे आणि अजून बिचारा नोकरी करतोई, रस्त्यात खाली झ्हाडांची सुकलेली पानं गोळा करतोई . पण नंतर समझला तो retire माणूस सकाळचा फेरफटका मारतो आणि त्याचबरोबर त्याचा गाव सुंदर ठेवण्याचा प्रयत्न पण करतो. नंतर मला असे बरेच लोक दिसले जे हे काम स्वताहून करतात .... कदाचित गाडगे महाराजांचे धडे शाळेत ह्यानि जास्त घेतलेले असावेत .......