नमस्कार

नमस्कार

Pages

Wednesday, 16 June 2010

F.I.R.

मी माळरानात उभी. मान उचलली तर वर निळं आकाश.
समोर. मागे. आठही दिशांना. नजर पोचेल तिथपर्यंत.

एक दिवस जमिनीतून माझ्या समोर एक राक्षस हळूहळू वर आला.
काही क्षणात स्थिर झाला. तसाच दुसरा त्याहून मोठा. अजून एक त्याहून मोठा.
चारी बाजूने एकेक करून वेडेवाकडे, मोठे, भले मोठे, अक्राळ विक्राळ, अजस्त्र राक्षस उभे राहू लागले. चौरस, आयताकृती, उभे आडवे. मागेपुढे. न हलणारे. जागा न सोडणारे. भुकेले. त्यांची गर्दी वाढू लागली. एकमेकांच्या ते अधिकाधिक जवळ सरकू लागले. एकमेकांशी सलगी करू लागले.

साहेब, त्यांनी माझं क्षितीज कुरतडलं.
माझं आकाश ओरबाडलं.
लक्तरं फेकली माझ्या ढगांची...थोडी पूर्वेला, थोडी पश्चिमेला...

दुखरी मान ताणून वर नेली, तर आता मला खूप थोडं दिसतं...
त्या आकारांमधून थोडं थोडं.
कधी तुकडा आकाश. कधी तुकडा ढग.
कापलेला चंद्र... तोडलेला सूर्य.
तुटकं इंद्रधनुष्य...
एखादं गिधाड एक क्षण दिसतं...
एखादी घार, एखादा कावळा आणि एखादी चिमणी...
माझ्या बोटांच्या पेराइतकंच त्यांचं आकाश उरलं...

आजपर्यंत मला तुम्ही दिसला नाहीत,
आता तर आकाश देखील दिसत नाही.

तुम्हांला आता तुमची जमीनच दिसत नसेल,
मग आम्ही लिलिपुट तुम्हांला कुठून दिसणार?

स्वतःची काळजी घ्या साहेब...
तुमचा देखील 'view block' होतोय!

3 comments:

rajiv said...

त्या वरच्या साहेबांनापण आता घोर लागून राहणार ......
खिडकीतून काय बघायचे याचा ...... !

खूपचं छान लिहिलंस ,
विशेषतः " कधी तुकडा आकाश. कधी तुकडा ढग.
कापलेला चंद्र... तोडलेला सूर्य.
तुटकं इंद्रधनुष्य...
एखादं गिधाड एक क्षण दिसतं...
एखादी घार, एखादा कावळा आणि एखादी चिमणी...
माझ्या बोटांच्या पेराइतकंच त्यांचं आकाश उरलं...

अशीच छान छान लिहित राहा !

Saurabh said...

हे झाडांबद्दल लिहल आहे का? म्हणजे मला असं वाटलं वाचून...
don't mind if I've'nt interpreted it correctly. Quite abstract for me, but beautiful... :)

संकेत आपटे said...

मस्तच लिहिता हो तुम्ही. एकदम छान. मोजक्या शब्दांत खूप काही सांगता. :-)