नमस्कार

नमस्कार

Pages

Monday, 28 June 2010

पाटा आणि वरवंटा

काळा कुळकुळीत खरखरीत पाटा आणि गुळगुळीत वरवंटा.
रंगात साधर्म्य परंतु स्वभावात वैविध्य. एकमेकांना पूरक. म्हणतात ना संसारात हे असंच असावं. एकमेकांशी मग चांगलं सूत जमत. दोघेही गुळमुळीत किंवा दोघेही रुक्ष! काही खरं नाही!
हे मिक्सरंच युग येण्यापूर्वी आईकडे मी पाट्यावरवंट्यावरच वाटण वाटत असे. ती मजाच काही और. खोबरं, लाल मिरच्या, धने, लसूण सगळं कसं पाट्यावर घ्यावं आणि जरुरीपुरतं पाणी घालून तालात सुरुवात करावी.
डंगडग डडंगडग! जिम वगैरे करायची काही गरज नाही. चांगलं पोटाशी पाय घेऊन खाली बसावं आणि हातात जड वरवंटा घुमवावा. झाले की बायसेप्स तयार! आणि बरोबरच पोटावरची चरबी जळलीच म्हणायची!
वाटणाचं पोत आपल्या हाती. अगदी गंधासारखं मऊ हवंय की हातात ओली वाळू धरल्यासारखं हवंय. चटणी कधी मुलायम वाटणासारखी वाटू नये आणि वाटण कधी रवाळ असू नये. कालवणात तरंगताना माश्याला देखील कसं छान वाटायला हवं. त्याला वाटण बोचायला नको. तेच मिरचीचा ठेचा जर मऊसुत केलात तर काय उपयोग?
गल्लीत खाली टाकी घ्या टाकी अशी हाळी ऐकू आली की आई आम्हाला दामटवायची टाकीवालीला बोलवायला.
हा सगळा माझा तालमय आनंद एकदाच माझ्या अंगावर म्हणजे डोळ्यांवर आला होता.
झणझणित मिरचीचं वाटण वाटलं आणि नंतर लगेच, अगदी तळहाताचा तो वासही गेला नसेल इतक्यात त्याच तळहातावर धरून, स्वच्छ घासूनपुसून डोळ्यात लेन्सेस घातल्या तेंव्हा! डोळ्यात अंजन घालणे किंवा मिरचीची धुरी देणे हे अगदी ह्याची डोळा अनुभवले!

तरी देखील तुम्ही काही म्हणा...
ह्या यंत्रयुगात हे साधेसुधे नियमित करण्याचे व्यायाम नाहीसे गेले आणि मग चरबी जाळायला, घोटीव दंड कमवायला आधुनिक व्यायामशाळा गाठाव्या लागू लागल्या.
अर्थात त्यातून देखील नवनवीन नोकऱ्या निघाल्या, कामधंदे निघाले ही बाब अलाहिदा!

3 comments:

rajiv said...

एकदम स्वतच्या बालपणात घेऊन जातीयस वाचणाऱ्याला ! खरे तर एखादे चलचित्र ध्वनिसहीत बघतोय असेच वाटले!
एकदम जिवंत वर्णन व त्यावरील भाष्य पण!

Writer & Filmmaker said...

so nicely written...enjoyed every word of it. so simple that i understood every word too :)

अनघा said...

वंदू, तू माझ्या मराठी ब्लॉगवर आलीस, वाचलंस आणि तुला माझं लिखाण मनापासून आवडलं ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. :) धन्यवाद.