नमस्कार

नमस्कार

Pages

Saturday 26 June 2010

'धडा लोकलचा'

सकाळी चालत्या लोकल मध्ये डोंबिवलीला चढून दादरला उतरायचे. आणि संध्याकाळी भर गर्दीत दादरला चढून डोंबिवलीला उतरायचे. ह्या एका कृती भोवती माझं दिवसभरंच गणित मांडलं जायचं.
सगळं कसं घड्याळ्याच्या काट्यावर. अगदी बॅले नर्तकीसारखा ताल. काटा इथे तर हातात ब्रश, काटा थोडा पुढे तर स्टोव्ह वर पाण्याचं पातेलं...जसं काही त्यात थोडी जरी चूक झाली तर ते घड्याळ, दोन काट्यांच्या चिमटीत मला धरून फेकुनच देईल.
ह्या मुंबईतल्या लोकलने रोजच्यारोज प्रवास करणाऱ्या बायकांकडून जगाने 'वेळ नियोजनाचे' धडे का घेऊ नयेत? प्रिन्स चार्लसला आमचे फक्त डबेवाले दिसले, आम्ही बायका नाही दिसलो!
जरी जायचं दादरला तरी देखील आधी जावं ठाकुर्लीला. जागा मिळण्याची शक्यता जास्त. खात्री नाही...पण शक्यता नाकारता येत नाही. त्यातून जर गरोदर असाल आणि अगदी सुरुवातीचे महिने असतील तर तुमची खैर नाही. मळमळतंय म्हणून मदतीच्या अपेक्षेने आपल्या भगिनीसमाजाकडे बघाल, अगदी तुम्हाला होणाऱ्या त्रासाबद्दल सांगाल देखील. परंतु, काय आम्ही नाही काढली पोरं? तूच राहिलीस का ग गरोदर? असेच भाव चेहऱ्यावर दिसतील.

जन्मल्यापासून दादरला रहाणाऱ्या मला हे सगळं शिकून घ्यायला थोडा वेळच लागला. आणि चढल्याचढल्या, बरोब्बर लवकर उतरणारी बाई हेरून आपली सीट रिझर्व करून ठेवणे तर शेवटपर्यंत नाही जमले! मी शिकू शकले अशी तंत्र हाताच्या बोटावर मोजता येण्यासारखी. जागा मिळाली आणि पुढच्या पाचव्या मिनिटाला झोप यायला लागली की आपले डोके आपल्याच ताब्यात ठेऊन कसे झोपायचे हे मी शेजारच्या बायकांच्या रोजच्या शिव्या ऐकून नशिबाने लवकर शिकले! आणि मग बरोब्बर 'दिवा' गेलं की डोक्यात कुठूनतरी गजर वाजायला लागायचा. घरच्या घड्याळाचे प्रताप असणार. नोकर न मी त्याची! मिनिटभर जास्त तरी का तो मला झोपून देईल? चालत्या आगगाडीत बसून भाजी निवडून ठेवणे हे जरी सुरुवातीला लज्जास्पद वाटले तरी देखील हळूहळू ती काळाची गरज ठरू लागली. गाडीत बाहेर लटकणे प्रथम भीतीदायक वाटले, पण मग हळूहळू ते जिमन्यॅस्टिक देखील अवगत झाले. शेवटी नियमित सरावाचाच तर सगळा प्रश्न!
पाकशास्त्रात नुकताच शिरकाव केल्यामुळे रोज घायाळ शरीर घेऊन मी ट्रेन मध्ये शिरले की बायका अगदी हिची सासरची माणसं हिला मारहाण करतात की काय ह्या शंकेनेच बघत असंत! कधी बोटं कापलेली तर कधी हातावर किळसवाणे पाण्याने भरलेले टपोरे मोठे मोठे फोड! तव्याच्या वेगवेगळ्या लांबीच्या जळक्या खुणा तर रोजच्याच.

आज जरी तो धकाधकीचा प्रवास माझ्या आयुष्यातून खूप दूर राहिला असेल....तरी देखील मुंबईच्या लोकलने त्या वेळी शिकवलेले ते धडे माझ्या नवीन, कोवळ्या संसाराच्या धड्यातीलच एक होते. एखादा धडा खूप महत्वाचा असतो तसा...

10 comments:

Guru Thakur said...

अरे संसार संसार
घड्याळाच्या काट्यावर
रुटीन हे जीवघेणे
फक्त मिळण्या भाकर..

अरे संसार संसार
जणू चरकात ऊसं
घ्यावं लागतं पिळून
जर हवा गोड रस...

rajiv said...

खूपच छान वर्णन केल्येस ग ! अग मुंबईचा लोकल प्रवास हा एक धडा नसून एक आख्खे पुस्तकच आहे.
त्या प्रवासापूर्वी, प्रवासात व उतरल्यावर येणारे अनुभव आपल्याला एकदम जगण्यास लायक व ज्ञानी करून सोडतो :)

रोहन... said...

मोजून २ वर्ष लोकल ट्रेनने ठाणे ते दादर असा नित्यनियमाने प्रवास केला... खूप काही शिकवणारा आणि आठवणी देऊन जाणारा... परवाच मला लक्ष्यात आले की ४-५ वर्ष झाली लोकलने प्रवास केलाच नाही आहे... डबल डेकर मध्ये वरती सर्वात पुढच्या सीटवर बसून फिरलोच नाही आहे. उगाच गेट-वे किंवा खाऊगल्लीमध्ये भटकलोच नाही आहे... मग ठरले आता आलो की एक उनाड दिवस साजरा करायचा... :)

हेरंब said...

अरे वा. तूही डोंबिवलीचीच आहेस? :)

Anagha said...

हेरंब, डोंबिवलीची नाहीये मी! पण लग्न झाल्यावर पाच वर्ष होते डोंबिवलीत! :)

संकेत आपटे said...

हेरंब आणि अनघा,

डोंबिवलीत म्हणजे मुंबईच्या बाहेर. अगदी खेडेगावात.... ;-)

Anagha said...

संकेत बुवा, तुम्हीं पण तिथलेच वाटतं? :)

संकेत आपटे said...

छ्या... मी गोरेगावचा.... म्हणजे मुंबईचा... ;-)

Anagha said...

व्वा! भाऊ, मारतील सगळे डोंबिवलीकर! ;)

संकेत आपटे said...

अहो मला मारल्याने डोंबिवली काही मुंबईत यायची नाही... हीहीही