नमस्कार

नमस्कार

Pages

Thursday, 24 June 2010

ओलावा

ऑफिसमधील खिडकीपाशी दोनच जीव... मी आणि माझं चिमुकलं रोप.
खिडकी निळ्या काचेची...वर्षाचे बारा महिने बाहेरचं जग अंधारून टाकणारी. म्हणजे काम करताना माणसाला पत्ता लागू नये दिवस संपला कधी ह्याचा!
रोजच्यासारखं आल्याआल्या, रोपाला मी पाणी घालायला गेले. पण आज त्याची नजर बाहेर लागून राहिलेली. त्याच्या नजरेला धरून मी देखील बाहेर बघितलं. बाहेर आमच्या अंधारलेल्या जगात पाऊस लागला होता.

ही खिडकी म्हणजे एखादं भलंमोठं एकसुरी चित्रच टांगून ठेवलेलं. काळसर निळा, गडद करडा आणि काळपट हिरवा...एकसुरीपण तोडणारी एकंच गोष्ट. पावसात स्नान करून शुचित झालेली लालबुंद कौलं.
मी माझ्या रोपाकडे बघितलं...पिंजऱ्यात जखडून ठेवलेला पक्षी भकास नजरेने बाहेरच्या मोकळ्या दुनियेकडे बघत असतो. हे माझं रोप एकटक, त्या वरून पडणाऱ्या मुसळधार पाण्याकडे बघत होतं...माझ्या हातात होती माझी शिळ्या पाण्याची बाटली....

मन आसुसलेलं ओलाव्यासाठी...जटेतून जोशात निघालेला आणि मार्गात अडसर न घेता माथ्यावर पडणारा...

मग मी माझ्या रोपाचं दृश्यच बदललं...त्याला उचलून माझ्या घराच्या उघड्या खिडकीत आणून बसवलं...

पावसाचे थेंब अंगावर पडल्यावर ते थरथरलं...
निदान मी त्याचं तरी भविष्य बदललं...

6 comments:

भानस said...

यस्स... बंदिस्त विश्व कोणालाच साहवत नाही. मग ते रोप असू दे नाहितर माणसाचे मन...

rajiv said...

अग, खिडकी बदलली कि `चित्र , परिसर व त्यामुळे भविष्य पण बदलतंच '! आणि बदल हा तर निसर्गाचा स्थायीभाव आहे.
प्रत्येक खिडकीला स्वतःची अशी एक दिशा असते! त्यामधून डोकावत त्याच दिशेने बाहेर जाऊन प्रगतीचा मार्ग प्राप्त करायचा का नाविन्याच्या शोधात राहून अनोळखी खिडक्या बदलत बदलत मार्ग आखून भविष्याची कास धरायची ? ............

याचे उत्तर हे समयसापेक्षच असणार ! !

balkrishna said...

kharach aaplyala farshi toshish n padta aapan kityekanchi bhavishya badlu shakto.

garaj aahe ti fakta JANIVECHI!

faarch chhan.

रोहन चौधरी ... said...

हे भन्नाट आहे... मला खूपच भावले...

एखादा क्षण शब्दात पकडण्याची आणि सहजतेने व्यक्त करण्याची तुला कला लाभली आहे... लिहिते रहा... आम्हाला असेच वाचू दे... :)

संकेत आपटे said...

खूपच छान. म्या पंखा झालोय तुमच्या लेखनाचा... :-)

अनघा said...

धन्यवाद संकेत. पण हल्ली जरा लांबी वाढलीच आहे ना लेखांची? काबूत आणायला हवंय स्वत:ला! :)