नमस्कार

नमस्कार

Pages

Friday, 4 June 2010

तुमचा पाळीव प्राणी कोणता?

छतापासून खाली जमिनीपर्यंत माझ्या घराला भल्या मोठ्या खिडक्या आहेत.
त्या खिडक्यांमध्ये माझी झाडं. झाडं म्हणजे झुडपं. छोटी छोटी.
कारण आमचं घर कोणी 'उन्हात नाही बांधलं'.
म्हणून मग सावलीत जी झाडं वाढू शकतील अश्या झाडांची ही माझी, शहरातली, छोटेखानी बाग.
फुलं नसलेली. पण हिरवीगार.
तर या माझ्या बागेत दोनतीन कुंड्यांमध्ये, मातीत किडे वळवळताना मला दिसले. वेगवेगळ्या कुंड्यांमध्ये त्या किड्यांनी खुशीत ओल्या मातीत संसार थाटलाय. बघावं तेंव्हा वळवळ. बायकापोरं, सगळ्यांचीच वळवळ.
माझा माळी म्हणाला,"ताई, तुम्ही त्या झाडांना गरजेपेक्षा जास्ती पाणी घालताय. आधीच इथे ऊन नाही येत!"
म्हणजे हे किडे मी पाळलेतच म्हणायचं की. खाऊपिऊ घालून.

विचार करता मला माझ्या डोक्यातल्या, मेंदूतल्या किड्यांशी, ह्या किड्यांचे साधर्म्य जाणवले. तेही असेच वळवळत असतात. मी विनाकारण त्यांना खतपाणी घालत असते. मग त्यांची पिलावळ वाढते. झाडांच्या मुळापाशी असलेल्या किड्यांचा त्या झाडांना कदाचित फायदा होतही असेल. माती भूसभुशीत झाल्याने. पण माझ्याच डोक्यात दिवसागणिक वाढणाऱ्या वसाहतीचा मला काय उपयोग? नुसताच डोक्याचा भुसा!
त्यापेक्षा समजा डोक्यात मी एक सिंह पाळला, तर निदान तो कधीतरी डरकाळी तरी फोडेल. एखादा मोर पाळला, तर जेंव्हा आकाश फुटेल तेंव्हा एखाद्या गाण्याच्या रुपात माझ्या मनात नाचेल तरी! किंवा एखादी घार पाळली तर माझ्या कल्पना अवकाशात उंच भरारी तरी मारतील.

अणुबॉम्ब टाकायला हवा ह्या वसाहतीत.

5 comments:

अलका said...

मस्त ! डोक्यात देखील स्वच्छ प्रकाश पडायला हवा.. किडे न वळवळण्यासाठी..

Anagha said...

धन्यवाद अलका.
:)

भानस said...

माझी आजी नेहमी म्हणे, " अगं ही डोस्क्यातली डबकी एकदा व कायमची बुजवायला हवीत गं. पण माझे गोंजारणेच संपेना झालेयं. "

अनघा said...

भाग्यश्री,
हे तुझ्या आजीचं 'डबकी' म्हणणं मला खूपंच आवडलं...
:)

Writer & Filmmaker said...

your yesterdays post seems like a continuation of this post....as if 'when u open your mind and heart....the light will fill it up....remove all worms and make space for a new better prani to come in'...